रजोनिवृत्ती (स्‍त्रियांची मासिक पाळी बंद होणे) आणि त्‍यावरचे उपाय !

‘आंतरराष्‍ट्रीय महिलादिना’च्‍या निमित्ताने विशेष लेख

रजोनिवृत्तीपूर्वी, म्‍हणजे पाळीचा त्रास जाण्‍याच्‍या अगोदरचा  काही काळ, मग पाळी जाते, त्‍या वेळचा काळ आणि पाळी गेल्‍यानंतरचा काळ या कालावधीत स्‍त्रियांना असणारी चिंता ही अतीचिंता या स्‍वरूपात होत आहे. त्‍याचा परिणाम तिचे आरोग्‍य आणि मन यांवर व्‍हायला लागतो अन् तिला ते त्रास अतिरिक्‍त प्रमाणामध्‍ये भोगावे लागतात.

वैद्य समीर मुकुंद परांजपे

१. रजोनिवृत्तीपूर्वी होणारी काही लक्षणे

रजोनिवृत्ती म्‍हणजे मासिक पाळी थांबणे. आता खरेतर ही एक नैसर्गिक अशी घडणारी घटना आहे. शरिरात उत्‍पत्ती, स्‍थिती आणि लय अशी नैसर्गिक घटना घडत असते. स्‍त्रीची पाळी १२ व्‍या वर्षी चालू होणे, मधल्‍या सगळ्‍या कालावधीमध्‍ये ती नियमित येणे आणि योग्‍य वेळेमध्‍ये (स्‍त्रीच्‍या वयाच्‍या साधारण ४० ते ५५ वर्षे या कालावधीत) ती बंद होणे, ही नैसर्गिक घटना आहे. यामध्‍ये खरेतर अनेक लक्षणांची निर्मिती किंवा अनेक त्रास व्‍हायला नको; पण तसे प्रत्‍यक्ष होतांना मात्र दिसत नाही. आपण कितीही नैसर्गिक म्‍हटले, तरी स्‍त्रियांना हे त्रास मात्र प्रत्‍यक्षात बघायला आणि भोगायला लागतात. मग ते त्रास शारीरिक किंवा मानसिक असतात. या वयोगटातील स्‍त्रियांना पाळीची अनियमितता, अंगावर कमी जाणे किंवा योग्‍य वेळी पाळी न येणे, काही वेळा २ – ४ मासांचा खंड पडतो. मग पाळी परत येते. साधारण एक वर्षभर पाळी आलीच नाही, तर समजायचे की, ‘मोनोपॉज’ (मासिक पाळी थांबणे) झालेला आहे.

पाळी जाण्‍याच्‍या अगोदर म्‍हणजे ‘फ्रिमिनॉपॉयझल पिरिएड’मध्‍ये काही लक्षणे निर्माण होतात. शारीरिक लक्षणे काय काय होतात ? तर शरिराला कोरडेपणा यायला लागतो. आतापर्यंत स्‍त्रीच्‍या त्‍वचेची कांती ही तेजाची आणि स्निग्‍धतेची अशी असायची, ती तिला रूक्ष जाणवू लागते. अशा वेळी मनाला वाईट वाटणे, हे अगदी नैसर्गिक आहे. अशा काळात स्‍त्रीला तात्‍काळ गरम होते आणि काही क्षणांत ते तापमान तात्‍काळ न्‍यून होते. काही वेळा घाम येतो आणि थंडी वाजायला लागते. अचानक अनामिक भीती वाटत रहाणे, छातीत धडधडणे, उगाच घाम फुटणे, अनेक स्‍त्रियांना भीती वाटणे आणि शरिराला उगाचच थकवा येणे आदी अनेक लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे ‘हॉर्मोन्‍स’मध्‍ये (संप्रेरकांमध्‍ये) होणार्‍या पालटामुळे होत असतात. या वयामध्‍ये थकवा येण्‍यामागे अनेक कारणे असतात. कुणाला ‘अ‍ॅनेमिया’, म्‍हणजे रक्‍ताची कमतरता असते. अनेकदा ‘थायरॉईड हॉर्मोन्‍स’ही मासिक पाळीच्‍या वेळी वाढलेले असल्‍यामुळे थकवा येतो. कुणाला धडधड जाणवते, तर ती हृदयासंबंधी असू शकते. त्‍यामुळे या काळात होणार्‍या शारीरिक आणि मानसिक लक्षणांना न्‍यून करण्‍यासाठी उत्तम प्रकारची चिकित्‍सा आयुर्वेदामध्‍ये नक्‍की आहे; पण या त्रासांमागील कारणांचा अभ्‍यास करून तो कशामुळे होत आहे, ते बारकाईने शोधले पाहिजे.

२. रजोनिवृत्तीपूर्वी होणारी बद्धकोष्‍ठता आणि तत्‍संबंधी विकार

रजोनिवृत्तीपूर्वीच्‍या अवस्‍थेमध्‍ये असणार्‍या म्‍हणजेच ४० ते ५५ वर्षे या वयोगटामध्‍ये असणार्‍या स्‍त्रियांच्‍या त्‍वचेवर आणि शरिराच्‍या अनेक अवयवांमध्‍ये ही रुक्षता वाढायला लागते. तसेच ही रुक्षता आतड्यांमध्‍येही वाढायला लागते आणि मग अनेक स्‍त्रियांना पोट साफ न होण्‍याचे लक्षण बघायला मिळते. पोट साफ नसले की, स्‍त्रियांना बेचैन वाटते, पोटामध्‍ये ‘गॅसेस’ (वायू) पकडून रहातात, मलाला दुर्गंधी असणे, गॅसेसला दुर्गंधी असणे, त्‍यामुळे मूड (स्‍वभाव) चांगला नसणे, अशा लक्षणांचा एक समुच्‍चय सिद्ध होतो. अनेक वेळा स्‍त्रियांना मांस पेशी आणि पोटर्‍या यांमध्‍ये गोळे येतात. ते घट्ट होऊन दुखायला लागतात. अनेक स्‍त्रियांना डोकेदुखीचा त्रास होतो, कुणाला सर्दी होते, नाक बंद रहाते, तर अनेक स्‍त्रियांचे पचन बिघडते. अनेक वेळा मलाचा खडा झाल्‍यामुळे संडासला जोर लावायला लागल्‍यामुळे काही स्‍त्रियांना ‘फिशर्स’चा (गुदाच्‍या ठिकाणी कापल्‍यासारखी वेदना) त्रास होतो. काही स्‍त्रियांना मुळव्‍याधीचा त्रास होतो. सगळ्‍याच्‍या पाठीमागे पोट साफ नसणे एवढेच कारण असते. या सगळ्‍यामुळे स्‍त्रियांची चिडचिड होऊन मानसिक स्‍थिती बिघडते.

या सर्वांवर सगळ्‍यात सोपा उपाय, म्‍हणजे आहार आणि दिनचर्या यांमध्‍ये पालट करणे. रात्रीचे जागरण, भ्रमणभाषचा अतिरिक्‍त वापर करणे, अतिरिक्‍त प्रमाणात चहा घेणे; खाण्‍यात बिस्‍कीट, बेकरीचे पदार्थ (पाव, टोस्‍ट, खारी) यांचा अतिरिक्‍त वापर हा रुक्षता वाढवण्‍यासाठी पूरक ठरतो.

तसेच अनेक वेळा स्‍त्रिया तेला-तुपाचा वापर ‘कोलेस्‍ट्रॉल’ (चरबी संदर्भातील घटक) वाढेल म्‍हणून बंद करतात. गायीचे तूप हे ‘कोलेस्‍ट्रॉल’ वाढवणारे नसून म्‍हशीचे तूप हे नक्‍की ‘कोलेस्‍ट्रॉल’ वाढवणारे आहे. हे लक्षात घेऊन आहारामध्‍ये दूध, तूप या पदार्थांचा समावेश नक्‍की असला पाहिजे. मनुका, आवळा, सोयाबीन, शेंगतेल अशा स्निग्‍ध पदार्थांचा वापर केला, तर शरिरामध्‍ये स्निग्‍धता टिकून रहाते.

तसेच रुक्षता न्‍यून करण्‍यासाठी वैद्यांच्‍या सल्‍ल्‍याने (समादेश) ‘बस्‍ती चिकित्‍सा’ करू शकतो. यात दूध-तूपाचे किंवा अन्‍य काही सिद्ध औषधी घृतांचे (तूप) किंवा तेलाची अशी बस्‍ती घेऊन शरिरातील ही रुक्षता झटकन न्‍यून करता येते.

३. हाडांच्‍या ठिकाणी येणार्‍या रुक्षतेवर नित्‍य अभ्‍यंगाद्वारे मात करा !

४० ते ५० वर्षे सगळ्‍या वयोगटामध्‍ये रजोनिवृत्तीची लक्षणे ज्‍या स्‍त्रियांमध्‍ये निर्माण होतात, त्‍यांच्‍यामध्‍ये ‘ऑस्टिओपोरासीस’, म्‍हणजे हाडे ठिसूळ होणे असे होते. त्‍याला कारणे अनेक आहेत. मग ती पौष्‍टीक अन्‍न (न्‍यूट्रिशन), ‘व्‍हिटॅमिन डी’ किंवा ‘होर्मोन’संबंधीच्‍या कमतरतेमुळे असू शकतील ? येथे एक गोष्‍ट लक्षात हवी की, हाडे ठिसूळ होतात म्‍हणजे काय ? तर हाडांच्‍या ठिकाणी असणारा स्नेहगुण न्‍यून होतो, म्‍हणजे हाडांमधील रुक्षता वाढते. हाडे पोकळ होऊन ठिसूळ होतात.

याच्‍यासाठी अत्‍यंत आवश्‍यक गोष्‍ट असते ती म्‍हणजे नित्‍य अभ्‍यंग. ‘अंगाला नित्‍य तेल लावून ते हाडांपर्यंत पोचू शकते’, असे आयुर्वेदाचे तत्त्वज्ञान आहे. रस, रक्‍त, मांस, मेद, अस्‍थी असे क्रमाने धातू आहेत. प्रत्‍येक धातूला ५-५ मिनिटांमध्‍ये स्नेह पोचतो, याचे वर्णन आहे. त्‍वचेला तेल लावले की, अस्‍थीची रुक्षताही न्‍यून होणारच आहे. हाडाचे घनत्‍व वाढू शकते आणि हाडांना बळकटी मिळू शकते. अशा ठिसूळ हाडांना जर पोषण मिळाले, तर सांधे आणि कंबर दुखी, मान अन् मणका यांचे विकार यांवर विजय मिळवता येऊ शकतो.

त्‍यामुळे स्‍त्रियांना माझा छोटासा संदेश आहे की, ४० वर्षांच्‍या पुढच्‍या वयोगटातील स्‍त्रियांनी अंगाला नित्‍यनेमाने तेल लावावे. अभ्‍यंग करा आणि वातदोष जिंका.’  (२६.२.२०२३)

– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी.

(ई-मेल : [email protected])