राज्यातील सर्व औषधालयांमध्ये ‘जनौषधी कक्ष’ चालू करणार ! – आरोग्यमंत्री विश्वजित राणे, गोवा

५ व्या ‘जनऔषधी दिवस- वर्ष २०२३’ च्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांच्या डाव्या बाजूला आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि इतर मान्यवर

पणजी, ६ मार्च (वार्ता.) – गोव्यातील सर्व औषधालयांमध्ये जेनेरिक औषधांच्या विक्रीसाठी कक्ष चालू केला जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी यांनी ५ व्या ‘जनऔषधी दिवस- वर्ष २०२३’ या कार्यक्रमात केली. भारत सरकारच्या रसायने आणि खते मंत्रालयाच्या सहकार्याने गोव्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने ६ मार्च या दिवशी आयोजित केलेल्या ‘प्रधानमंत्री जनऔषधी योजने’च्या अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (जेनेरिक म्हणजे अशी औषधे ज्यातील औषधाचे प्रमाण, गुणवत्ता आणि उपयोग हे नामांकित औषधांसारखे असते; पण त्याला विशिष्ट नाव नसते. या औषधांचे मूल्य अत्यल्प असते.)

मंत्री राणे याविषयी म्हणाले, ‘‘आम्ही जनऔषधी दिवसाच्या वेळी गोव्यातील सर्व औषधालयांमध्ये जनऔषधी कक्ष चालू करणार आहोत. येत्या ४८ घंट्यांमध्ये याविषयीचे परिपत्रक काढले जाणार आहे. गोव्यातील अन्न आणि औषध व्यवस्थापनाचे संचालक यावर लक्ष ठेवणार आहेत. यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला उच्च दर्जाची ‘जेनेरिक औषधे’ उपलब्ध होतील, याची काळजी घेतली जाईल. गोव्यातील सर्व औषधालयांनी या सूचनेचे पालन केले पाहिजे.’’ ३१ जानेवारी २०२३ च्या आकडेवारीनुसार संपूर्ण भारतात एकूण ९ सहस्र ८२ ‘प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रे’ आहेत.

आधुनिक वैद्यांनी रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून द्यावी ! – मुख्यमंत्री

जेनेरिक औषधे आणि ‘ब्रँडेड’ आस्थापनांची औषधे यांमध्ये कोणताही फरक नाही; परंतु त्यांच्या दरांमध्ये ५० ते ९० टक्के इतका मोठा फरक आहे, ही औषधे सामान्य नागरिकांना परवडणारी आहे. मूल्य अल्प असले, तरी या औषधांची गुणवत्ता तितकीच चांगली राखली गेली आहे. सर्वसामान्यांना ही औषधे उपलब्ध करून देणे, हा केंद्र सरकारचा प्रयत्न असून सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. आधुनिक वैद्यांनी रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून द्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमात केले.

आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. गीता काकोडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. ज्योती सरदेसाई यांनी ‘प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजने’ची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमात ‘जनऔषधी केंद्र’ चालवणार्‍यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य खात्याचे ‘हेल्थ एज्युकेटर’ रावजी पाळणी यांनी आभार व्यक्त केले.