एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत ‘मूलतत्त्ववाद’ हा विचार आला. ‘मी मूलतत्त्ववादी आहे’, असे मी सहज म्हणताच सूत्रसंचालक दचकला. त्याने विचारले, ‘‘हे तुम्ही सहस्रो प्रेक्षकांसमोर खुलेपणाने मान्य करत आहात ?’’ त्यावर मी हसून म्हटले, ‘‘हो. मी हिंदु आहे आणि मूलतत्त्ववादी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटते; कारण हिंदु मूलतत्त्वे तुम्ही जाणून घेतली नाहीत. सत्य, अहिंसा, शांती, अस्तेय आदी गोष्टी या मूलतत्त्वांमध्ये येतात. अन्य धर्मियांची मूलतत्त्वे आणि हिंदूंची मूलतत्त्वे यांत मुळातच भेद आहे.’’
अपरिहार्यता ही आहे की, पृथ्वीवर केवळ मनुष्यच नाही, तर जीवसृष्टी टिकवायची असेल, तर बहुसंख्य माणसे सनातन विचारांनी जगणारी हवी; कारण अहिंसा हे हिंदु धर्माचे सर्वांत मोठे तत्त्व आहे. प्रत्येक जिवात ईश्वरी अंश असल्याने प्रत्येकाचा जगण्याचा अधिकार सनातन धर्म मानतो. ‘स्वतःच्या जिवासंबंधी आपत्ती (धोका) नसेल, तर कुणीही कुणाचीही हिंसा करू नये’, असेच सनातन धर्म सांगतो; मात्र हे विस्तारवादी आणि राजसत्तावादी पंथ कधीच सांगत नाहीत. हे म्हणणे अलीकडच्या काळात सहज शक्य झाले आहे. पूर्वी ‘आपण हिंदु आहोत’, असे सांगतांनाही कित्येक जण संकोचत. जणू हिंदु असणे, म्हणजे काहीतरी गुन्हा केल्याची जाणीव असे.
१. स्वातंत्र्योत्तर काळातील नेत्यांनी ‘हा देश सर्वांसाठी’ असल्याचे सांगत हिंदूंचा दैदिप्यमान इतिहास दडपला !
वर्ष १९४७ मध्ये देश विभाजित होऊन स्वतंत्र झाला. धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन झाले. पापस्तान हा मुसलमानांसाठी बनला म्हटल्यावर स्वाभाविकपणे उर्वरित देश हा ‘हिंदु देश’ बनायला हवा होता. तत्कालीन नेत्यांनी हिंदूंना न विचारताच ‘हा देश सर्वांसाठी’, असे घोषित केले. त्यानंतर मतांसाठी अल्पसंख्यांकांच्या अनुनयाचे जे पर्व चालू झाले, ते अद्यापही संपलेले नाही. त्याने इतके टोक गाठले की, हिंदूंना आपणच या देशात उपरे असल्याची भावना निर्माण व्हावी.
घुसखोर परधर्मियांनी जो क्रूर संहार केला, धर्मांतरे घडवली, बलात्कार केले, मंदिरे पाडली या टोकदार इतिहासाचा मागमूसही शालेय वा महाविद्यालयीन पुस्तकांत येणार नाही, याची पक्की काळजी घेतली. अगदी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला जाणेही पंडित नेहरूंनी नाकारले. या काँग्रेसी धोरणावर डाव्या विषवल्लीने अत्युच्च टोक गाठले. अनेक दशके शिक्षणक्षेत्र हे त्यांच्या हाती असल्याने त्यांनी हिंदूंचा दैदीप्यमान इतिहास नाकारून खोट्या माहितीची जंत्री भरलेली पुस्तके लिहून अनेक पिढ्यांमधील राष्ट्रवाद एक प्रकारे मारला. जातीयवाद पसरवला आणि हिंदूंमधील जाती एकमेकांविरुद्ध कशा उभ्या रहातील ? ते पाहिले.
२. हिंदु धर्म आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांची खिल्ली उडवणारे तथाकथित बुद्धीवादी अन् हिंदूंच्या संघटनांवर बंदी घालणारे तत्कालीन नेते !
स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंचे देव, धर्म, उपासना, परंपरा, आदर्श आदींची खिल्ली उडवणार्या लोकांना बुद्धीवादी म्हणून सातत्याने पुढे आणले गेले. हे कथित बुद्धीवादी अन्य धर्मांच्या आदर्शांची मात्र खिल्ली उडवू धजत नव्हते. तसे केले, तर आपले काय होईल ? ही रास्त चिंता त्यामागे असावी. हा दुहेरी मापदंड पहाणारा हिंदू गोंधळला आणि खवळलाही होता; पण मुळात सहिष्णु असणारा हा मोठा वर्ग ‘सर तन से जुदा’ (डोके शरिरापासून वेगळे करणे) अशी ललकारी देत नव्हता; कारण ते त्याच्या धर्माने त्याला कधीच शिकवले नव्हते. मुळात फारच उदारमतवादी असलेल्या या सहिष्णुवर्गाने ‘सर्वांसाठी देश’ हे मान्य केले, तरी ‘या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा’ हे मात्र मान्य होण्यासारखे नव्हते. तरीही हे मुकाटपणाने ऐकून घेतले.
वर्ष १९२५ मध्ये हिंदुहितार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. अर्थात् त्या वेळी त्यांना राजाश्रय कसा मिळेल ? स्वराज्य मिळाल्यावर आमचे तत्कालीन नेते हे तरी संघाला जवळ कसे करणार होते ? कारण देश सर्वांसाठीचा झाला होता ना ! मग डाव्यांनी संघाला आपलेच इटलीतील नाव देऊन ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाही) ठरवले. फाळणीच्या काळात झालेल्या निर्घृण नरसंहारात संघ स्वयंसेवकांनी (हिंदूंना वाचवण्यासाठी) पुष्कळ कार्य केले. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून गांधीहत्येनंतर संघ आणि हिंदु महासभा यांच्यावर बंदी घालण्यात आली. हिंदु महासभा हा हिंदुहितार्थ स्थापन झालेला राजकीय पक्ष होता. हिंदू मुळातच मवाळ धोरणाचे असल्यामुळे ते महासभेच्या मागे सर्व शक्तीनिशी उभे राहिले नाहीत. त्याचे पूर्व अध्यक्ष असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काँग्रेस आणि डावे या जोडीने भारतीय राजकारणात अकारण वादग्रस्त व्यक्तीमत्त्व ठरवले. ‘रस्त्यातून हत्ती चालत असतांना त्याच्यावर कुत्रे भुंकतात’, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. तथापि ‘ते का भुंकतात ?’, ते समजून घेणे महत्त्वाचे ठरते. हत्ती चालतांना साहजिकच त्या विशालकाय देहाकडे लक्ष जाणे स्वाभाविक असते. त्यामुळे लोकांचे लक्ष तिथे वेधले जाते. अशा वेळी कुत्र्यांना असे वाटते की, आम्ही पण येथे आहोत; मग आमच्याकडे का बघितले जात नाही? या मत्सरापोटी लक्ष वेधून घेण्यासाठी ते भुंकत रहातात. त्यामुळे हत्तीचे काहीच बिघडत नाही आणि कुत्र्यांना कदाचित् पेकाटात एखादी लाथ बसू शकते. सावरकर विरोधकांचे काहीसे तसे झालेले दिसते. त्यामुळे सावरकर यांच्यावरील एका आक्षेपाला उत्तर दिले की, त्यांचे आणखी आक्षेप घेणे चालू रहाते. यात त्यांना सावरकर समजून घ्यायचे नसतात, तर आपणही ‘हुशार’ आहोत इतकेच दाखवायचा एक केविलवाणा प्रयत्न करायचा असतो.
३. समाजमाध्यमांचा दणका !
जवळपास गेली ६०-६५ वर्षे सातत्याने एकमार्गी आणि वैचारिक वा बुद्धीवाद यांचे कातडे पांघरून होणार्या आक्रमणांमुळे सामान्य हिंदू विचलित होत होता; मात्र पुरेसा अभ्यास आणि वाचन नसल्यामुळे, तसेच जे राष्ट्रविचारक आहेत, त्यांच्या लेखनाला फारशी प्रसारमाध्यमे स्थान देत नसल्याने, त्याला सुयोग्य उत्तरे मिळत नव्हती. ती क्रांती सामाजिक माध्यमांनी घडवून आणली. हे दुधारी शस्त्र आहे, हे मान्यच आहे. तथापि अनेक अभ्यासकांना त्यावर व्यक्त होता येऊ लागले. याखेरीज हिंदूंना खडबडून जागे करण्यात काँग्रेस आणि डावे (साम्यवादी) यांचेही योगदान आहेच, ते नाकारून कसे चालेल? त्यांच्याच खोट्या प्रचाराच्या मार्याने अखेर वर्ष २०१४ मध्ये केंद्रीय सत्तापालट झाला. यामुळे पिसाटलेले डावे निरर्गल (बेताल) बडबड करून अधिक उघडे पडू लागले. लोकांना सत्य कळू लागले. डाव्यांच्या बुद्धीभेदाच्या प्रयत्नांचा पडदा फाटून त्यांचा ‘सिलेक्टिव्ह’ (ठराविक) दृष्टीकोन उघडा पडू लागला.
४. हिंदी चित्रपटांमधून उर्दू शब्दांचा अनावश्यक वापर करून आणि हिंदूंच्या भावना दुखावून मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचे वाढते प्रमाण !
फाळणीनंतर लगेच तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनल स्टेशनच्या बाहेर फिरणार्या घोडागाडी चालवणार्या चालकांच्या टोप्या पालटल्या. हे सर्व प्राय: मुसलमान होते आणि डोईवर (डोक्यावर) लाल गोंड्याच्या तुर्की टोप्या धारण करणारे होते. ‘फाळणीनंतर उर्वरित भारत हा हिंदु देश झाला’, असे समजून त्यांनी त्या टोप्या फेकून गांधी टोप्या धारण केल्या. ८-१५ दिवसांतच त्यांना वस्तूस्थितीची जाणीव झाली आणि त्यांच्या डोईवर पूर्वीप्रमाणे तुर्की टोप्या दिसू लागल्या. पुढच्या काळात त्यांचे कपड्यात आणि दिसण्यात आपला वेगळेपणा दाखवणेच नव्हे, तर मिरवणे वाढू लागले. त्यात लांगूलचालन करणार्या सर्वपक्षीय नेत्यांची भर पडू लागली. साहजिकच आपण अल्पसंख्यांक म्हणजे कुणीतरी विशेष आहोत, अशी धारणा होणे स्वाभाविक होते. यात बॉलीवूड (हिंदी चित्रपटक्षेत्र) कसे मागे राहील ? पूर्वी ‘चित्रलेखा’सारख्या मासिकात शुद्ध हिंदीत गाणी लिहिणारे शायर नंतर हळूहळू उर्दू शब्दांची पेरणी करू लागले. त्याला सुमधुर संगीताची साथ लाभल्यावर लोक त्या संगीतात हरवू लागले आणि शब्दांकडे दुर्लक्ष करू लागले. ‘आपकी नजरोने समझा प्यार के काबील मुझे’, हे अभिनेत्री माला सिन्हा यांच्या तोंडचे; पण लतादीदींनी (लता मंगेशकर यांनी) गायलेले आणि गाजलेले गीत ऐकतांना आपल्याला कधीच काही खटकले नाही; कारण आपण गाणी नुसतीच ऐकतो अथवा पडद्यावर पहातो आणि विसरून जातो. अशा वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘अन्य भारतीय भाषाभगिनींपैकी एक म्हणून आम्ही उर्दूचा यथोचित सन्मान करू; पण तिने आपली मर्यादा ओलांडून आम्हाला (म्हणजे मराठीला) डोईजड ठरू नये’, हे मत आठवते.
‘एक अशिक्षित सोज्वळ हिंदु स्त्री गाण्यात ‘बंदा परवर शुक्रीया’ कसे म्हणेल ? नजर, काबील, मंजूर, फैसला आदी उर्दू शब्द तिला कसे ठाऊक असतील ?’, हा विचार ना गीतकाराने ना गायिकेने केला. प्रयत्न केला वा स्मरणशक्तीवर थोडा ताण दिला, तरी अशी अनेक गाणी आठवतील. असे का होते ? याचा विचार व्हावा. सारांश या नियतकालिकाच्या संपादकीयमध्ये नव्हे, तर ‘संतापकीय’मध्ये ज्येष्ठ संपादक, कवी, रांगोळीकार, चित्रकार आणि मराठीत नव्या शब्दांची भर टाकणारे श्रीकृष्ण बेडेकर यांनी हा विचार मांडला.
५. चित्रपटात हिंदु शास्त्रज्ञांना आस्तिक दाखवल्यावर कथित पुरोगाम्यांना पोटशूळ उठणे; मात्र ते मुसलमानांच्या श्रद्धास्थानांविषयी काही न बोलणे
‘विज्ञानवादाची पूर्वअट नास्तिकता ही असते का ?’, याचाही विचार करायला हरकत नसावी. ‘रॉकेट्री’ या सध्या गाजत असलेल्या हिंदी चित्रपटात शास्त्रज्ञ असलेले नंबी नारायण हे देवपूजा करत असलेले दाखवताच येथील पुरोगाम्यांचा पोटशूळ उसळला. ‘इस्रो’च्या (भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या) प्रमुखाने यानाची प्रतिकृती बालाजीसमोर ठेवल्यावरही असेच झाले होते. व्यक्तीगत जीवनात आपल्या श्रद्धा जोपासण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य शास्त्रज्ञ मंडळींना नसते का ? जगातील बहुतेक प्रमुख शास्रज्ञ हे आस्तिकच होते आणि त्याविषयी त्यांच्या देशातील कुणी त्यांना दोष दिला नव्हता, हे सोयीस्करपणे दृष्टीआड करणे याला आपल्याकडे ‘पुरोगामित्व’ म्हणतात.
‘दिवार’ या गाजलेल्या हिंदी सिनेमामध्ये, देवळात देवदर्शनाला जाण्याचे तर दूरच; पण केवळ देवळातील प्रसाद खाण्यासही नकार देणारा नास्तिक अमिताभ बच्चन ‘786’ क्रमांकाच्या (इस्लाममधील पवित्र आकडा) बिल्ल्यावर मात्र श्रद्धा ठेवतो. त्या बिल्ल्यामुळेच अनेकदा संकटातून वाचतो आणि शेवटी बिल्ला हातून हरवल्याने मरतो. संपूर्ण हिंदु वातावरणात वाढलेला हिरो ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’ या ओळीपुढे ‘अल्ला अल्ला इन्कार तेरा’ सहजपणे म्हणतो आणि देशातील ८० टक्के हिंदूंना यातील विसंगती वर्षानुवर्षे खटकली नाही. इतका टोकाचा सहिष्णुपणा हिंदूंनी दाखवला; पण हिंदी (नव्हे उर्दू !) चित्रपट सातत्याने हिंदूंच्या भावना तुडवत राहिले. त्याच वेळी मुसलमान म्हणजे गावासाठी वा मित्रासाठी प्राण देणारे, असे चित्र रंगवत राहिले. याचा अचूक लाभ टॉलीवूडने (दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीने) उचलला. हिंदु मूल्ये, संस्कृत श्लोक, सभ्यता यांचा उपयोग करत चित्रपट बनवले आणि ते हिंदीतही भाषांतर केले. बॉलिवूडच्या खोट्या प्रचाराला अक्षरशः उबलेला प्रेक्षक ते चित्रपट डोक्यावर घेऊ लागला.
६. बहुसंख्यांकांच्या अपमानाच्या कहरातून हिंदुत्वाचे उत्थान आणि त्यातून सत्तापालट !
बहुसंख्यांकांना प्रत्येक माध्यमातून अपमानित करण्याचा कहर लोटला, तेव्हा हिंदुत्वाचे उत्थान होणे अगदी स्वाभाविक होते. तसेच झाले. मतपेटीतून लोकांनी निषेध व्यक्त करत वर्ष २०१४ मध्ये सत्तापालट केला. आता जरा हिंदु इतिहासही समोर येऊ लागला. अन्यथा ‘या देशाचा इतिहास जणू मोगलांपासून चालू झाला’, असेच भासत होते. रामायण-महाभारताला डाव्यांनी मिथक (खोटे) ठरवून टाकले होते. चंद्रगुप्त, विक्रमादित्य, शालिवाहन, ललितादित्य आदी सम्राट कधी शिकवले गेले नव्हते, तर विविध राजवंश कुठून शिकवले जाणार ? अनेक संशोधक आणि वैज्ञानिक असलेले ऋषी शिकवले गेले नव्हते. अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, युद्धशास्त्र, औषधशास्त्र आदी अनेक प्राचीन गोष्टी कधी समोर येऊच दिल्या नाहीत. ‘गणराज्ये असली, तरी भारत हे एक राष्ट्र होते’, ही जाणीव होऊ दिली नव्हती.
सामान्य माणसाच्या हिताचे आणि कल्याणाचे मार्ग याच देशात शोधले गेले. आज फुकाचा आव आणत ‘मानव धर्म’ असे ज्याला म्हणतात, तो खरे म्हणजे ‘सनातन’ धर्मच आहे, याची खूणगाठ सर्वांना पटेल, तो सुदिन जवळच आहे !’
– डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली. (वर्ष २०२२)