मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था : २० मार्चला मुंबईत जनआक्रोश आंदोलन

चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेविषयी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २० मार्चला मुंबई येथील आझाद मैदानात जनआक्रोश आंदोलन केले जाणार आहे. यासाठी जनआक्रोश समितीने पुढाकार घेतला आहे. या आंदोलनासाठी मुंबईतील ४५ सहस्रांहून अधिक जणांनी  सह्यांच्या माध्यमातून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे, अशी माहिती अधिवक्ता ओवेस पेचकर यांनी दिली.

मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था

पेचकर म्हणाले, ‘‘जनआक्रोश आंदोलन आता गावागावांत आणि वाडीवाडीत वणव्यासारखे पेट घेत आहे. मुंबई-गोवा महामार्गाची इतकी वर्ष दुरवस्था झाली आहे की, त्याकडे सरकार लक्ष देत नाही. हे आम्ही लोकांना पटवून सांगत आहोत. सरकार कुणाचेही असो, आपण रस्त्यावर उतरून सरकारला जाग आणू आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून घेऊ. कोकणात अनेक मंडळे, संघटना आणि विविध घटकांवर काम करणार्‍या विविध समित्या आहेत. सर्वांचा उद्देश एकच आहे; पण या सर्वांनी एक कोकणकर म्हणून एकत्र येऊन शासन-प्रशासनाला जागे करूया.’’

संपादकीय भूमिका

मुंबई-गोवा महामार्गासाठी जनतेला पुन:पुन्हा आंदोलन करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !