सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज अँड नॉटिकल इंजिनीयरिंग ट्रेनिंग (सिफनेट)ची शाखा रत्नागिरीत चालू करा

भाजपचे सचिन वहाळकर यांची केंद्रीय मत्स्यमंत्री परशोत्तम रुपालाजी यांच्याकडे मागणी

रत्नागिरी – केंद्रीय मत्स्य मंत्रालयाची सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज अँड नॉटिकल इंजिनीयरिंग ट्रेनिंग (सिफनेट) ही मत्स्यव्यवसायाच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असून ‘सिफनेट’ची शाखा रत्नागिरीत चालू करावी, अशी मागणी दक्षिण रत्नागिरी भाजपचे सरचिटणीस सचिन वहाळकर यांनी केली आहे.

दक्षिण रत्नागिरी भाजपचे सरचिटणीस सचिन वहाळकर

पश्‍चिम किनारपट्टीवरील गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या चार राज्यांत मोठी किनारपट्टी असूनही येथे सिफनेटची एकही शाखा नाही. सिफनेटद्वारे १५ दिवसांच्या ‘सर्टिफिकेट कोर्स’पासून नॉटिकल इंजिनीयरींग मधील ४ वर्षांच्या पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम शिकवले जातात. याचा लाभ येथील मासेमार, तसेच अनेक तरुणांना होऊ शकतो. ‘स्किल डेव्हलपमेंट’च्या अभ्यासक्रमांमुळे या व्यवसायात आधुनिक तंत्रद्यान येऊन या व्यवसायात मोठी वाढ होऊ शकते, तसेच अनेकांना मर्चंट नेव्ही सारख्या क्षेत्रात रोजगार मिळू शकतात. या चारही राज्यांना रत्नागिरी हे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी सिफनेटची शाखा चालू झाल्यास मासेमारांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक व्यवसाय विकसित होऊन मोठ्याप्रमाणात रोजगारातही वाढ होईल, असा विश्‍वास सचिन वहाळकर यांनी व्यक्त केला.