ताण हा प्रत्येकाच्या जीवनात असतोच, मग तो कार्यालयीन अधिकारी असो वा विद्यार्थी असो ! विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परीक्षा म्हटले की, नकळत ताण आलाच. मग तो वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याच्या मनाची काहीशी स्थितीही पहिल्यांदा १० वीची बोर्डाची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यासारखीच असते. याला काही मोजकेच लोक अपवाद ठरतात. भ्रमणभाषवर बोलत बसल्यामुळे वेळ घालवला; म्हणून स्वयंपाक करायचा राहिला. त्यानेही ताण येतो. कार्यालयात जातांना वाहतूक कोंडीत अडकलो; म्हणून ताण आला. परराज्यात जातांना विमान ४ घंटे विलंबाने आल्याने ताण आला. कार्यालयातील कर्मचारी सुट्टीवर गेल्याने ताण आला. अयोग्य वेळी पाऊस पडल्याने ताण आला. ही उदाहरणे पाहिल्यास प्रत्येक जण ताण या गोष्टीला कुठे ना कुठे सामोरे जातोच. मुळात ताण येतोच का ? याचे उत्तर दैनंदिन जीवनात लहान लहान गोष्टींतूनही मिळेल. या सगळ्यात कुठेतरी मनाविरुद्ध झाले; म्हणून, तर कुठे नियोजनाचा अभाव, अशी काही मुख्य कारणे दिसून येतात.
शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे; पण अभ्यासासमवेत आलेली परिस्थिती स्वीकारून धैर्याने आणि ईश्वरावरील श्रद्धेने सामोरे गेले, तसेच दैनंदिन कृतींचे नियोजन केले, तर निराशेने कुणी आयुष्य संपवले, असे होणार नाही. ताण किंवा निराशा हा मनाच्या नकारात्मकतेचा अंतिम टप्पा आहे. जो ईश्वरावरील श्रद्धेने, नियमित योगाभ्यासाने आणि नियोजन कौशल्याने सहजच पार करता येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांना घेऊन अनेक कठीण लढाया यशस्वी केल्या, त्या केवळ ईश्वरावरील श्रद्धेने आणि नियोजन कौशल्याने ! आताचेच उदाहरण बघायचे झाल्यास कोरोना महामारीच्या काळात जगभर नैराश्य पसरले असतांना इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या भारतात स्थिती हाताबाहेर गेली नाही, याचेही कारण ईश्वरावरील श्रद्धा आणि नियोजन हेच आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न बनता, आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग आपले जीवन चांगले करण्यासाठी केला पाहिजे, तसेच आपले राष्ट्र प्रगतीपथावर नेण्यासाठी केला पाहिजे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवून नियोजनपूर्वक मार्गक्रमण केले, तर ताण हा शब्द कुणाच्याच शब्दकोशातही रहाणार नाही अन् सर्वजण आनंदी रहातील !
– सौ. प्रांजली विजय ब्रह्मे, नागपूर