माझ्या भ्रमणभाषची हेरगिरी केली जाते ! – राहुल गांधी यांचा केंब्रिज विश्‍वविद्यालयात दावा

भारतातील विरोधी पक्षनेता म्हणून असा दबाव मला नेहमीच सहन करावा लागतो – राहुल गांधी केंब्रिज विश्‍वविद्यालयामध्ये बोलतांना

लंडन (ब्रिटन) – माझ्या भ्रमणभाषची हेरगिरी केली जाते. भारतातील विरोधी पक्षनेता म्हणून असा दबाव मला नेहमीच सहन करावा लागतो. बहुतांश राजकीय नेत्यांच्या भ्रमणभाषमध्ये पेगासस (हेरगिरी करणारी प्रणाली) आहे. माझ्या भ्रमणभाषमध्येही पेगासस होते. मला गुप्तहेर अधिकार्‍यांनी बोलावून सांगितले होते, तुम्ही भ्रमणभाषवर बोलतांना सावधगिरी बाळगा; कारण आम्ही ते रेकॉर्ड करत आहोत. हा एक असा दबाव आहे, जो आम्हाला नेहमीच जाणवतो, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विश्‍वविद्यालयात राहुल गांधी यांना निमंत्रित पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याचा एक व्हिडिओ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी शेअर केला आहे. त्यात गांधी यांनी वरील दावा केला आहे.

या व्हिडिओमध्ये राहुल गांधी पुढे म्हणतात की, विरोधकांवर गुन्हे नोंदवले जातात. माझ्याविरोधातही अनेक फौजदारी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यातील अनेक गुन्हे चुकीच्या कारणांसाठी नोंदवण्यात आले आहेत. देशातील प्रसारमाध्यमे आणि लोकशाही व्यवस्था यांवर अशा प्रकारचे आक्रमण होत असेल, तर विरोधक म्हणून तुमच्यासाठी बोलणे अवघड होते. लोकशाहीसाठी आवश्यक असलेली संसद, स्वतंत्र प्रसारमाध्यमे, न्यायपालिका या सर्वच संरचना विवश झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही भारतीय लोकशाहीच्या मूळ संरचनेवरील आक्रमणाचा सामना करत आहोत. भारतीय राज्यघटनेत भारताला राज्यांचा संघ म्हटले आहे. त्या संघाशी चर्चा आवश्यक आहे. आता हा संवादच संकटात सापडला आहे. विरोधी पक्षांचे नेते काही सूत्रांवर चर्चा करत होते. त्यांना कारागृहात डांबण्यात आले. असे ३-४ वेळा झाले. ते अत्यंत हिंसक होते.

 (सौजन्य : CAPITAL TV) 

राहुल गांधी परदेशात जाऊन विदेशी मित्रांच्या साहाय्याने भारताला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करतात ! – भाजप

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या दाव्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, पेगासस अन्यत्र कुठेही नाही, तर राहुल यांच्या डोक्यात आहे. त्यांनी कोणत्या भीतीने त्यांचा भ्रमणभाष अन्वेषण यंत्रणांकडे तपासणीसाठी जमा केला नाही ? त्यामध्ये असे काय होते ?

सततचे पराभव त्यांना पचत नाहीत. राहुल परदेशात जाऊन परदेशी मित्रांच्या साहाय्याने भारताला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करतात. काँग्रेसचे धोरण काय आहे ?