रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण : युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम !

रशिया-युक्रेन युद्धाचे संधीत रूपांतर करणे, ही भारताच्या पालटलेल्या परराष्ट्र धोरणाची यशस्वी कूटनीती !

रशिया-युक्रेन युद्धाचे संग्रहित चित्र

रशिया-युक्रेन युद्धाला १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्याची किंमत केवळ रशिया, युक्रेन आणि भारतच नाही, तर संपूर्ण जग चुकवत आहे. या युद्धाचे आतापर्यंत नेमके काय झाले ? त्याचा भारतासह जगावर काय परिणाम झाला आहे ? अशा विविध सूत्रांचे विश्लेषण या लेखात पाहूया.

१. रशिया-युक्रेन युद्ध अनिर्णित स्थितीत

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

‘एक वर्षापूर्वी युद्ध चालू केले, तेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना हे युद्ध अधिकाधिक २ ते ३ आठवडे चालेल आणि त्यांच्या प्रचंड सैन्याला घाबरून युक्रेन शरणागती पत्करेल, असे वाटले होते; पण तसे झाले नाही. रशियाकडे प्रचंड सैनिकी बळ होते; तरीही ते युद्ध जिंकू शकले नाहीत; कारण युक्रेनचे नेतृत्व चांगले होते आणि त्यांना जनतेची साथ होती. त्यामुळे युक्रेनची जनता देशासाठी लढण्यास अजूनही सिद्ध आहे. युक्रेनला ‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’

(नाटो – उत्तर अटलांटिक करार संघटना) यांनी शस्त्रास्त्रे पुरवली; पण अन्य कोणत्याही देशाचे सैनिक या युद्धात सहभागी झालेले नाहीत.

आजची अशी स्थिती समजली जाते की, रशियाचे २० टक्के युक्रेनवर नियंत्रण आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रशिया युक्रेनची कीव ही राजधानी जिंकू शकला नाही. त्यामागे युक्रेनने दाखवलेले युद्ध कौशल्य, त्यांचे सैन्य आणि सेनापती यांची युद्ध क्षमता हे कारण आहे. त्यामुळे सध्या त्याला एक अनिर्णित युद्ध म्हणता येईल. रशियाला हवे असलेले काहीही मिळालेले नाही आणि अजूनही युक्रेन लढण्यासाठी सिद्ध आहे. रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्यानंतर लगेचच युरोप आणि अमेरिका यांनी रशियावर आर्थिक बहिष्कार घातला; पण त्याचा फारसा लाभ झाल्याचे दिसले नाही.

२. युद्धात विविध अत्याधुनिक शस्त्रे आणि युद्धतंत्र यांचा वापर

या युद्धामुळे युरोप, रशिया, अमेरिका, चीन या देशांमध्ये आर्थिक मंदी आलेली आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर युरोपात झालेले हे सर्वांत मोठे युद्ध आहे. या युद्धात अत्यंत अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करण्यात आला. विविध लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले. रशिया, अमेरिका, युरोप अशा राष्ट्रांकडील नवीन अत्याधुनिक शस्त्रेही यात वापरली गेली. या युद्धात असे लक्षात आले की, जेव्हा तंत्रज्ञान विरुद्ध सैनिक यांच्यात लढाई होते, तेव्हा सैनिक लढायला सिद्ध असेल आणि त्यांचे नेतृत्व चांगले असेल, तर ते उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचाही पराभव करू शकतात. या युद्धात माहिती युद्ध, अपप्रचार, दुष्प्रचार, आर्थिक आणि डिप्लोमॅटिक (कूटनीती) यांचे युद्ध, अशा सर्व प्रकारच्या युद्धांचा वापर करण्यात आला. तरीही या युद्धाचा निर्णय झाला नाही.

३. रशिया-युक्रेन युद्धात दारूगोळ्याची कमतरता

रशियाचे सैनिक हे लढण्यास पुरेसे सिद्ध नाहीत. दोन्हीकडील सैनिकांना दारूगोळा अल्प पडत आहे. जेव्हा असे वर्षभर युद्ध चालते, तेव्हा संबंधित राष्ट्रांकडे असलेला दारूगोळ्याचा साठा महत्त्वाचा असतो, तसेच त्यांची अर्थव्यवस्थाही सुदृढ असावी लागते. आता युरोप आणि अमेरिका यांचा संपूर्ण दारूगोळा संपल्याचे दिसत आहे. या युद्धात रणगाड्यांवर ‘अँटी-टँक’ (रणगाडाविरोधी) शस्त्रांनी विजय मिळवलेला आहे. रशियाचे वायूदल फारसे वापरले गेले नाही; कारण ते युक्रेनकडे असलेल्या ‘ॲन्टी एअरक्राफ्ट’ (शत्रूच्या लढाऊ विमानांवर आक्रमण करण्यासाठी वापरली जाणारे) क्षेपणास्त्रांना घाबरले. अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी युक्रेनचा मोठा भाग उद्ध्वस्त केला; परंतु त्यांच्या सैनिकांची लढण्याची विजिगीषु वृत्ती ते तोडू शकले नाहीत. या युद्धामुळे विध्वंस पुष्कळ झाला; पण युद्ध अजूनही अनिर्णित आहे.

४. मानवी अधिकारांचे मोठ्या प्रमाणात हनन

या युद्धात रशियाचे अनुमाने १ लाखांहून अधिक, तर युक्रेनचेही १ ते दीड लाख सैनिक ठार झाले असावेत. युद्धकैद्यांची संख्याही पुष्कळ आहे. या युद्धात सर्व प्रकारच्या मानवी अधिकारांचे मोठ्या प्रमाणात हनन होत आहे. यात सहस्रो लोक, तसेच ३० सहस्रांहून अधिक लहान मुले ठार झाली आणि अनेक महिलांवर अत्याचार झाले.

५. भारताकडून संकटाचे संधीमध्ये रूपांतर

हे युद्ध जगासाठी एक मोठे संकट होते; परंतु भारताने या संकटाचे रूपांतर एका संधीत केले. जगाची अर्थव्यवस्था मंदीकडे जात आहे; पण भारत हा एकमेव देश आहे की, ज्याची अर्थव्यवस्था ६ ते ७ टक्के दराने वाढत आहे. एवढेच नाही, तर भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या २४ सहस्र भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणले. त्यासाठी काही काळ दोन देशांचे युद्ध थांबवले. रशिया आणि युक्रेन हे देश धान्य पिकवत असल्यामुळे त्यांच्या किंमती पुष्कळ वाढल्या होत्या; पण भारताने स्वतःजवळील धान्याचा साठा वापरून अन्नधान्याच्या किंमती स्थिर ठेवल्या. एवढेच नाही, तर भारताने धनधान्य जगाला निर्यात करण्याचाही प्रयत्न केला.

या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती पुष्कळ वाढणार होत्या; पण भारताने त्याचे इंधनाचे मूल्य वाढू दिले नाही. भारताने संधी साधून रशियाकडून इंधन आयात करणे चालू केले. त्यामुळे त्यांचे मूल्य फारसे वाढलेले नाही. भारत आता कच्च्या इंधनावर प्रक्रिया करून ते युरोप आणि अमेरिका यांना निर्यात करत आहे. भारताने दोन दगडांवर पाय ठेवले होते. अमेरिकेला वाटत होते की, भारताने त्याच्या बाजूने रहावे आणि रशियाला वाटत होते की, भारताने त्याच्या बाजूने जावे; पण भारताने संतुलन ठेवून दोन्ही देशांशी मैत्री कायम ठेवली. अर्थातच भारताने या युद्धाच्या कठीण परिस्थितीत राष्ट्रीय हिताचे चांगल्या पद्धतीने रक्षण केले.

६. रशिया-युक्रेन युद्ध थांबणे हे संपूर्ण जगाच्या भल्यासाठी आवश्यक !

आज भारताचे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे हे युद्ध थांबवण्यासाठी जगाला भारताखेरीज पर्याय नाही. भारताच्या साहाय्याने हे युद्ध थांबले, तर ते मुत्सद्देगिरीचे मोठे यश असेल. त्यामुळे भारताची जगात पत वाढेल. अनेक देश ‘मेक इन इंडिया’च्या (भारतात वस्तूंचे उत्पादन करणे) अंतर्गत शस्त्रनिर्मिती करायला सिद्ध आहेत. भारताने एका संकटाचे चांगल्या संधीत रूपांतर केले आणि आपल्या अर्थव्यवस्थेला वेगाने पुढे नेले. युक्रेन आणि रशिया दोघेही शांतीच्या दिशेने पाऊल टाकायचा प्रयत्न करतील, अशी आशा करूया. हे युद्ध थांबले, तर त्याचा संपूर्ण जगावर चांगला परिणाम होईल.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.