पणजी, २ मार्च (वार्ता.) – पाण्याचे देयक एकरकमी भरण्यासाठीच्या (वन टाईम सेटलमेंट) योजनेला १६ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘राज्यात देयक न भरणार्या एकूण ५२ सहस्र ५२१ ग्राहकांपैकी २९ सहस्र १३९ ग्राहकांनी (म्हणजेच ५५.४८ टक्के ग्राहकांनी) त्यांचे प्रलंबित पाण्याचे देयक भरलेले आहे, तसेच २९ सहस्र १३९ ग्राहकांपैकी २१ सहस्र ८४३ ग्राहकांनी एकरकमी योजनेचा लाभ घेऊन, तर उर्वरित ७ सहस्र २९६ ग्राहकांनी योजनेचा लाभ न घेता देयक भरले आहे. पाणीदेयक प्रलंबित ठेवणार्या ५२ सहस्र ५२१ ग्राहकांपैकी २३ सहस्र २०२ ग्राहकांना २ सहस्र रुपयांहून अल्प देयक आले आहे, तर १० सहस्र ३७४ ग्राहकांचे देयक १० सहस्र रुपयांहून अधिक आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला प्रलंबित देयकांचे सुमारे ११ कोटी रुपये मिळाले, तर उशिरा देयके भरल्याने असलेला दंड माफ केल्याने १२ कोटी रुपयांचा फटका बसला. प्रलंबित देयकांची एकूण रक्कम १३१ कोटी रुपये आहे.’’
(सौजन्य : Prudent Media Goa)
२ मास पाणीदेयक न भरल्यास पाणीपुरवठ्याची जोडणी तोडणार
यापुढे प्रलंबित देयके भरण्यासाठी पुन्हा एकरकमी योजना काढली जाणार नाही आणि पाण्याचे देयक २ मास न भरल्यास तिसर्या मासाला संबंधित ग्राहकाची पाण्याची जोडणी तोडण्यात येणार आहे. खात्याचे अभियंता ही जोडणी तोडण्यात अपयशी ठरल्यास त्यासंबंधीची माहिती खात्याच्या संबंधित अभियंत्याच्या वार्षिक अहवालामध्ये येईल आणि संबंधित अभियंत्याची बढती रोखली जाईल.’’
पाणीदेयक न भरल्यावरून सत्तरी तालुक्यात १०० ग्राहकांची जोडणी तोडली
पणजी, २ मार्च (वार्ता.) – पाणीदेयक न भरल्यावरून सत्तरी तालुक्यातील सुमारे १०० ग्राहकांची पाणीपुरवठा जोडणी सार्वजनिक बांधकाम खात्याने तोडली आहे. या प्रकरणी स्थानिक आमदार तथा मंत्री विश्वजीत राणे यांनी पाणीदेयक न भरलेल्या ग्राहकांना देयके भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत द्यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली आहे. ‘प्रतिमास १६ सहस्र लिटरहून अल्प पाणी वापरणार्या ग्राहकाला पाणी विनामूल्य देण्याची सरकारची योजना असतांना संबंधित १०० ग्राहकांना पाणीदेयक अधिक रकमेचे कसे आले ?’, असा प्रश्न मंत्री विश्वजीत राणे यांनी उपस्थित केला.