जळगाव जिल्ह्यात बनावट नोटा छपाईची एका वर्षातील चौथी घटना !
जळगाव – ‘यूट्यूब’वरील व्हिडिओ पाहून बनावट नोटा छापणार्या तरुणाला जळगाव पोलिसांनी २ मार्च या दिवशी धाड टाकून अटक केली आहे. कुसुंबा येथील देविदास आढाव (वय ३० वर्षे) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पथकाने त्याच्याकडून १ लाख ६८ सहस्र ९०० रुपयांच्या १००, २०० आणि ५०० रुपये किमतीच्या नोटा, प्रिंटर, रंग आणि नोटा छापण्याचे कागद हस्तगत केले आहेत. (पोलीस यंत्रणा केवळ गुन्हे नोंदवणार कि अशा गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईही करणार ?, असे सर्वसामान्य जनतेला वाटते. जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत अशा घटनांना चाप बसणार नाही. – संपादक)
जिल्ह्यात यापूर्वी घडलेल्या घटना
१. याच वर्षाच्या जानेवारी मासात जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील शहनाज अमीन भोईटे या महिलेच्या घरातून २१ सहस्र ७०० रुपयांच्या बनावट नोटा प्राप्त झाल्या होत्या.
२. जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील हनिफ अहमद शरीफ देशमुख याच्या घरातून २० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा, त्यासाठी वापरण्यात येणारा कागद (बाँड पेपर) आणि एक कार जप्त करण्यात आली. देशमुख हा प्रतिदिन २० ते २५ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा सिद्ध करत होता.
३. जामनेर तालुक्यातील पहूर बसस्थानक परिसरात १९ मे या दिवशी उमेश चुडामण चव्हाण नावाचा २२ वर्षे वयाचा संशयित युवक पोलिसांना आढळला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात २०० रुपयांच्या ३ नोटा मिळाल्या. त्यातील एक नोट बनावट होती. कसून चौकशी केली असता त्याने स्वतः रंगीत प्रिंटर आणि बाँड पेपर यांच्या साहाय्याने या नोटा सिद्ध केल्याची स्वीकृती दिली. पोलिसांनी त्याच्या हिंगणे या गावी जाऊन सखोल चौकशी केली असता त्याने आतापर्यंत ५ ते ७ सहस्र नोटा जामनेर तालुक्यात वितरित केल्या आहेत. तो गेल्या ७ मासांपासून हा उद्योग करत आहे. रंगीत प्रिंटर, कागद, अन्य साहित्य आणि संशयित आरोपी यांना पोलिसांनी कह्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४८९ (अ)(ब)(क)(ड) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.