श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या संदर्भात साधिकेला आलेल्‍या अनुभूती आणि त्‍याबद्दल साधिकेने व्‍यक्‍त केलेली भावपूर्ण कृतज्ञता !

१. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सूक्ष्मातून समवेत आहेत’, असे जाणवणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई, या वेळी मी रामनाथी आश्रमातून निघतांना आपली भेट झाली नाही. मला तुम्‍हाला भेटण्‍याची आतून इच्‍छा होत नव्‍हती. मला वाटत होते, ‘तुम्‍ही सूक्ष्मातून माझ्‍या समवेत आहात. तुम्‍ही मला सूक्ष्मातून (आतून) मार्गदर्शन करत आहात.’ मी डोळे मिटून तुमचे स्‍मरण केले की, ‘तुम्‍ही डोळे मिटून ध्‍यानावस्‍थेत आहात’, असे मला दिसते. मी प्रयत्न करायला असमर्थ असतांना ‘तुम्‍ही मला शक्‍ती प्रदान करत आहात’, असे मला जाणवते.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यातील गुरुकार्याच्‍या ध्‍यासाचे स्‍मरण होणे

तुमच्‍या चेहर्‍यावरील आनंद आणि उत्‍साह माझ्‍या डोळ्‍यांसमोर सतत येतो. तुमचे स्‍मरण केल्‍यावर ‘तुम्‍ही सर्व साधकांसाठी आणि गुरुकार्यासाठी डोळ्‍यांत तेल घालून कशी सेवा करत असता !’, याचे स्‍मरण होते. मला गुरुसेवा करण्‍यासाठी माझ्‍यात सर्व गुण आणायचे आहेत. तुमच्‍यासारखा साधकांविषयीचा सेवकभाव मला मनात रूजवायचा आहे.

३. घरी गेल्‍यावर नामजपादी उपाय केल्‍याने सत्‌च्‍या विचारांत राहू शकणे

मला घरी जाण्‍यापूर्वी त्रास होत होता. त्‍या वेळी आणि मी घरी गेल्‍यावरही तुम्‍ही मला नामजपादी उपाय करायला सांगितले होते. मला घरीही चांगले अनुभवायला आले. सद़्‍गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय मी शक्‍य तितके करण्‍याचा प्रयत्न केला. मी घरी गेल्‍यावरही अधिकाधिक सत्‌च्‍या विचारांत होते. मी ज्‍या ठिकाणी गेले, तेथे सत्‍संगच झाला.

४. घरी आई-वडिलांच्‍या अडचणी जाणून घेऊन त्‍यांना साधनेच्‍या स्‍तरावर सांगता येणे

देवानेच माझ्‍याकडून आई-अप्‍पांना (श्री. विलास आणि सौ. कांचन पुजारी) साधनेच्‍या स्‍तरावर सांगण्‍याचा प्रयत्न करून घेतला. मला त्‍यांच्‍या सर्व अडचणींकडे त्रयस्‍थ म्‍हणून पहाता आले. ‘ते त्‍यांचे प्रारब्‍ध आहे. सर्वांनीच साधनेचे प्रयत्न करणे आवश्‍यक आहे’, हे देवाने माझ्‍या लक्षात आणून दिले. मी माहेरी गेल्‍यावर मला तेथील परिस्‍थिती पाहून वाईट वाटून दुःख न होता सर्वांना साधनेच्‍या दृष्‍टीने सांगता आले.

‘हे माते, तूच या पामराकडून साधनेचे प्रयत्न तुला आणि गुरुमाऊलींना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) अपेक्षित असे करून घे. मला मिळालेल्‍या सेवेचा आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ करून घेता येऊ दे. या सेवेच्‍या माध्‍यमातून माझ्‍यामध्‍ये जे गुण येणे अपेक्षित आहेत, त्‍यासाठी आपणच माझ्‍याकडून प्रयत्न करून घ्‍यावेत. पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्‍या सत्‍संगाचा लाभ तुम्‍हाला अपेक्षित असा मला करून घेता येऊ दे’, अशी आपल्‍या चैतन्‍यमय अशा कोमल चरणी आर्त प्रार्थना आहे.

सुंदर ते रूप तुझे, नित्‍य माझ्‍या स्‍मरणी असावे ।
सूर्यकिरणांप्रमाणे तेजस्‍वी चैतन्‍य तुझे नित्‍य मी ग्रहण करावे ।
प्रेमळ तुझ्‍या कुशीत घेतले आहेस माते ।
कृतज्ञता मनी सदैव असावी, कृतज्ञता मनी सदैव असावी ॥

– तुमचीच, सौ. कीर्ती जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१२.२०२२)

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या गुणांचे स्‍मरण झाल्‍यावर आलेल्‍या अनुभूती

१. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची विविध रूपे डोळ्‍यांसमोर येऊन आनंद होणे

सौ. कीर्ती प्रतीक जाधव

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई,

नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये मी वैयक्‍तिक कामे करतांना मला तुमची आठवण येत होती. तुम्‍ही ज्‍या वेळी हसता, आमच्‍याकडे प्रेमाने पहाता आणि सेवा करता, त्‍या वेळची तुमची वेगवेगळी रूपे, तुमच्‍यातील भाव आणि सेवेची तळमळ, तुमचे चैतन्‍य यांचे स्‍मरण होऊन मला पुष्‍कळ आनंद होत होता. माझा भाव जागृत होत होता. ‘मला तुमच्‍याप्रमाणे झोकून देऊन प्रयत्न करायचे आहेत’, असा आपोआपच आतून विचार येत होता. तुमच्‍या स्‍मरणाने आनंद होऊन आपोआपच माझ्‍या चेहर्‍यावर स्‍मितहास्‍य उमटत होते.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या स्‍मरणाने चैतन्‍य मिळून स्‍वतःचे डोळे निळे झाले आहेत, हे साधिकेच्‍या लक्षात येणे

माझे आवरून झाल्‍यावर अकस्‍मात् माझे डोळ्‍यांकडे लक्ष गेले. तेव्‍हा माझ्‍या लक्षात आले, ‘माझे डोळे निळे झाले आहेत.’ मी यजमानांना (श्री. प्रतीक यांना) याविषयी सांगितले. तेव्‍हा त्‍यांनाही माझ्‍या डोळ्‍यांतील पालट लक्षात आला. तेव्‍हा भगवंताने लक्षात आणून दिले, ‘मनामध्‍ये तुमचे (श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे) स्‍मरण चालू होते आणि त्‍या कालावधीत माझे डोळे निळसर झाले.’ ‘आपल्‍या केवळ स्‍मरणानेही किती मोठ्या प्रमाणात ऊर्जा, चैतन्‍य आणि आनंद मिळत आहे !’, असे वाटून आपल्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

ही सुंदर अनुभूती दिल्‍याबद्दल आपल्‍या चरणी कृतज्ञता !’

– सौ. कीर्ती जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.१२.२०२२)

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी चूक सांगितल्‍यावर साधिकेला हलकेपणा वाटून आनंद जाणवणे

कु. माधुरी दुसे

‘दिवाळीच्‍या आधी माझ्‍याकडून एक चूक झाली. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी (सद़्‍गुरु ताईंनी) ती चूक मला सांगितली आणि ‘अहंचा भाग आहे’, असेही सांगितले. सद़्‍गुरु ताईंचे हे वाक्‍य ऐकल्‍यावर मला हलके वाटले आणि ‘डोक्‍यावरचा भार अल्‍प झाला’, असे जाणवले. दुसर्‍या दिवशी सद़्‍गुरु ताई सप्‍तर्षींच्‍या सांगण्‍यानुसार ध्‍यानमंदिरात डाव्‍या पायाने लिंबू चिरडण्‍यासाठी आल्‍या. त्‍यांनी लिंबू चिरडल्‍यावर ‘‘मी लादीवरील लिंबाचा रस पुसते’’, असे सांगून मी तो रस पुसला. तेव्‍हा माझ्‍या मनात विचार आला, ‘सद़्‍गुरु ताईंनी काल अशाच प्रकारे माझ्‍यातील अहंला सूक्ष्मातून नष्‍ट केले आहे. आता मला केवळ स्‍वयंसूचना सत्रे आणि भावजागृतीचे प्रयत्न वाढवायचे आहेत.’ त्‍यानंतर मला पुष्‍कळ आनंद झाला. ‘ज्‍याप्रमाणे मी वरील लिंबाचा रस पुसला, त्‍याप्रमाणे सद़्‍गुरु ताईंनी माझ्‍यातील अहं संपूर्ण पुसून काढला’, असा भाव ठेवल्‍यामुळे मला दुसर्‍या दिवशीही ताण न येता त्‍यांच्‍याप्रती कृतज्ञता वाटली.’

– कु. माधुरी दुसे, कोल्‍हापूर (२८.१२.२०१६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक