रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सेवेच्या कक्षाचे नूतनीकरण करण्यापूर्वी आणि केल्यानंतर जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ज्या कक्षामध्ये सेवा करतात, त्या कक्षाचे ऑक्टोबर २०२१ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. हे नूतनीकरण करण्यापूर्वी आणि केल्यानंतर साधकाला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देत आहोत. 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ केवळ १ घंटा खोलीत बसल्यानंतर तेथे विजेचे केवळ २ दिवे असतांनाही खोली पुष्कळ प्रकाशमान जाणवणे

श्री. आकाश कदम

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करण्यासाठी बसत असलेल्या खोलीचे नूतनीकरण करत असतांना विजेचे ६ दिवे लावले होते, तरीही ‘खोलीत पुरेसा प्रकाश नाही’, असे वाटत होते. ती खोली सिद्ध झाल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ तेथे १ घंटा बसल्या. त्यानंतर त्या खोलीत केवळ २ दिवे असतांनाही ती खोली पुष्कळ प्रकाशमान जाणवत होती.

२. खोलीत गेल्यावर काळ्या (त्रासदायक) शक्तीचे आवरण नष्ट होऊन उपाय होणे

खोलीत गेल्यावर ‘माझ्यावर आलेले काळ्या (त्रासदायक) शक्तीचे आवरण आणि माझ्या मनातील विचार नष्ट होत आहेत’, असे मला जाणवते. मला जांभया येऊन ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे जाणवते.

३. तेथे गेल्यावर मला भावस्थिती अनुभवता येते.

४. ‘खोलीतील प्रत्येक वस्तूत भाव जाणवतो. ‘त्या वस्तूंचे वेगळे वैशिष्ट्य आहे’, असे वाटते.

५. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ खोलीत वापरत असलेल्या चपला हातात घेतल्यानंतर ‘त्यांतून चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवते आणि त्यांतून दैवी स्पंदने प्रक्षेपित होतात.’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करत असलेल्या नूतनीकरण झालेल्या खोलीत अनिष्ट शक्तींनी केलेल्या आक्रमणांविषयीची उदाहरणे

१. पूर्वी भिंतीवर उमटलेले हाताचे ठसे रंग लावल्यानंतरही पुन्हा दिसणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीचे नूतनीकरण करण्यापूर्वी तिच्या भिंतीवर हाताचे ठसे उमटलेले होते. नूतनीकरण करतांना भिंतींना रंग लावल्यावर ते ठसे ४ – ५ दिवस दिसले नाहीत; पण आता पुन्हा त्याच ठिकाणी ते दिसत आहेत.

२. खोलीतील काही लाद्यांवर गंजल्याप्रमाणे लाल डाग पडले आहेत.

३. खोलीतील चैतन्य सहन न झाल्याने किडे खोलीच्या खिडकीच्या बाहेर मरून पडणे

खोलीच्या खिडकीला नेटलॉन (जाळी) लावलेले असूनही खोलीचे नूतनीकरण करण्यापूर्वी खोलीत किडे येत असत.

सकाळी खोलीची स्वच्छता करायला गेल्यावर मला खोलीत मरून पडलेले पुष्कळ किडे दिसत असत. खोलीचे नूतनीकरण झाल्यानंतर २७.१०.२०२१ या दिवशी मी सकाळी खोलीची स्वच्छता करायला गेल्यावर खोलीत मरून पडलेल्या किड्यांचे प्रमाण पूर्वीपेक्षा अत्यल्प असल्याचे माझ्या लक्षात आले. त्या वेळी खिडकीच्या बाहेरच्या बाजूच्या कट्ट्यावर मरून पडलेल्या किड्यांचे प्रमाण पुष्कळ होते. त्या वेळी ‘खोलीतील चैतन्यामुळे किडे खिडकीतून आत येऊ शकले नाहीत. खोलीतील चैतन्य सहन न झाल्याने ते तेथेच मरून पडले’, असे मला वाटले.

४. काहीही कारण नसतांना परात्पर गुरुदेवांच्या पादुकांना मुंग्या लागणे आणि नंतर त्या आपोआप न्यून होणे

१३ आणि १४.१०.२०२१ या दिवशी खोलीत ज्या ठिकाणी परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) पादुका ठेवलेल्या आहेत, त्या ठिकाणी काहीही कारण नसतांना पुष्कळ मुंग्या पादुकांच्या जवळ दिसल्या. नंतर २ दिवसांनी त्या आपोआप न्यूनही झाल्या.’

– श्री. आकाश कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक