(‘यूपीआय’ म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस – ज्याद्वारे अनेक बँकांच्या अनेक खात्यांना भ्रमणभाषच्या एकाच ‘ऑनलाईन’ ॲपद्वारे एकत्र आणून पैसे हस्तांतर करण्याची प्रक्रिया सरकारकडून उपलब्ध करण्यात आली आहे.)
१. ‘यूपीआय’ ॲप्सच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ व्यवहार करतांना सतर्कता बाळगणे आवश्यक !
‘गेल्या १० वर्षांपासून ‘ऑनलाईन’ व्यवहार करणे थोड्याफार प्रमाणात चालू झाले. प्रारंभी असे व्यवहार करणारा वर्ग हा तंत्रज्ञान अवगत असलेला होता. या ‘ऑनलाईन’ व्यवहारासाठी बँकेतून ‘इंटरनेट’ सुविधा चालू करणे, त्याचा ‘आयडी’ बनवणे, ‘बेनीफिशीअरी’, म्हणजे लाभार्थ्याचे तपशील भरणे, ‘ट्रांजेक्शन पासवर्ड’ (व्यवहार करण्यासाठी संकेतांक) घालणे आणि शेवटी ‘ओटीपी’च्या (वन टाइम पासवर्ड – एक वेळच्या व्यवहारासाठीचा संकेतांक) माध्यमातून व्यवहार अधिकृत करणे या सर्व गोष्टी कराव्या लागत होत्या. ही सर्व प्रक्रिया करणारा वर्ग तंत्रज्ञानाची माहिती असणारा होता आणि त्याचे प्रमाण फार अल्प होते; पण ‘यूपीआय’ने हा सर्व खेळच पालटला. रस्त्यावरील भाजीवाला, चहावाला, वडापाववाला यांच्यापासून अगदी सप्ततारांकित हॉटेलपर्यंत ‘यूपीआय’ कुणालाच वर्ज्य राहिलेले नाही. कोरोना महामारीच्या काळात ‘यूपीआय’ वापरणार्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. आजकाल लोक ‘गूगल पे’, ‘फोन पे’, ‘पेटीएम्’ अशा असंख्य ‘यूपीआय’ ॲप्सच्या माध्यमातून सहजपणे पैशांचे हस्तांतरण करू शकतात.
हे तंत्रज्ञान वापरण्यास कितीही सहज असले, तरी त्याचा वापर करतांना काही चुका होण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. घाई गडबडीत चुकीचा ‘यूपीआय आयडी’ किंवा क्रमांक टंकलिखित झाल्याचे लक्षात आले आहे, तसेच फसवणुकीचे प्रकारही पुढे आलेले आहेत. त्यामुळे ‘यूपीआय’द्वारे चुकीच्या खात्यामध्ये पैसे पाठवले गेल्यास काय करावे ?’, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. अशा वेळी स्वतःचे पैसे परत मिळवण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करू शकतो.
२. ‘यूपीआय’द्वारे चुकीच्या खात्यामध्ये पैसे पाठवले गेल्यास काय करावे ?
अ. जर तुम्ही ‘गूगल पे’, ‘फोन पे’, ‘पेटीएम्’ यांसारख्या ‘यूपीआय’ ॲपच्या माध्यमातून हस्तांतरण व्यवहार करतांना चुकीच्या खात्यात पैसे पाठवले असल्यास सर्वप्रथम त्या ॲपच्या ग्राहक सेवेशी संपर्क करून साहाय्य मागा. त्याच कालावधीत तुमच्या अधिकोषाच्या ‘हेल्पलाईनशी’ही संपर्क साधून व्यवहाराची माहिती द्या.
आ. सर्वप्रथम तुमच्या भ्रमणभाष संचावर त्या चुकीच्या व्यवहारामुळे पैसे खात्यातून वजा झाल्याचा अधिकोषाकडून आलेला संदेश संग्रहित (सेव्ह) करा. या संदेशातील तपशील परताव्यासाठी आवश्यक ठरतात.
इ. ‘भारतीय रिझर्व्ह बँके’च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटल्यानुसार चुकीच्या खात्यावर पैसे पाठवल्यास, तुम्ही ‘bankingombudsman.rbi.org.in’ या ‘बँकिंग लोकायुक्त’ संकेतस्थळावर जाऊनही तक्रार करू शकता.
ई. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार चुकीच्या खात्यात पैसे हस्तांतरण झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर बँकेला ७ ते १५ दिवसांच्या आत तक्रार निकाली काढावी लागते.
उ. यासमवतेच बँकेत अर्जही देऊ शकता. ज्यामध्ये तुमच्या बँकेच्या तपशीलासह ज्या खात्यात चुकून पैसे पाठवले गेले आहेत, तो खाते क्रमांकही लिहावा लागेल.
ऊ. जर तुम्हाला ठाऊक असेल की, या व्यवहारांमधील चुकीचा लाभार्थी कोण आहे ? आणि पैस करण्याची विनंती करूनही ती व्यक्ती तुमचे पैसे परत करण्यास नकार देत असेल, तर तुम्ही ‘एन्.पी.सी.आय. (नॅशनल पेमेंट कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया)’च्या संकेतस्थळावर जाऊनही त्या व्यक्तीच्या विरोधात कायदेशीर तक्रार करू शकता.
३. ‘एन्.पी.सी.आय.’च्या संकेतस्थळावर तक्रार कशी करावी ?
अ. सर्वप्रथम ‘एन्.पी.सी.आय.’च्या https://www.npci.org.in/ संकेतस्थळाला भेट द्या.
आ. तेथे सर्वांत वर असणार्या पर्यायामध्ये उजव्या कोपर्यातील ‘गेट इन टच’ या ‘टॅब’वर संगणकाच्या माऊसचा ‘कर्सर’ नेल्यावर तेथे ‘यूपीआय कम्प्लेंट’ हा पर्याय दिसेल. त्यावर ‘क्लिक’ करा.
इ. त्यानंतर येणार्या अनेक पर्यायांपैकी ‘ट्रान्झॅक्शन्स’ या पर्यायाची निवड करा. त्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन नेचर (व्यवहाराचे स्वरूप), इश्यू (नेमके कारण), ट्रान्झॅक्शन आयडी (व्यवहाराचा क्रमांक), बँक, रक्कम, ट्रान्झॅक्शनचा (व्यवहाराचा) दिनांक, स्वतःचा ई-मेल पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक यांसारखे तपशील द्यावे लागतील. या समवेतच तुमचे अधिकोष खाते विवरण म्हणजेच ‘अकाऊंट स्टेटमेंट’ जोडून स्वतःची तक्रार प्रविष्ट (सबमिट) करावी.’
– श्री. अभिषेक मुरकटे, वरळी, मुंबई. (जानेवारी २०२३)