नागपूर-मडगाव विशेष एक्‍सप्रेस रेल्‍वे जुलैपर्यंत धावणार !

नागपूर – होळी आणि उन्‍हाळ्‍याच्‍या सुट्यांमध्‍ये प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्‍वे प्रशासनाने गोवा येथे जाणार्‍या प्रवाशांसाठी ‘नागपूर-मडगाव-नागपूर’ या विशेष रेल्‍वेगाडीचा विस्‍तार करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्‍वेगाड्या जुलै मासापर्यंत चालवण्‍यात येणार आहेत. उन्‍हाळ्‍याच्‍या सुट्या घालवण्‍यासाठी अनेकजण कुटुंबासह गोवा येथे जातात. त्‍यामुळे रेल्‍वे प्रशासनाने गोवा येथे जाणार्‍या विशेष रेल्‍वेगाडीचा विस्‍तार करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

रेल्‍वे प्रशासनाने घेतलेल्‍या निर्णयानुसार २५ फेब्रुवारीपर्यंत धावणारी रेल्‍वेगाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव द्विसाप्‍ताहिक विशेष रेल्‍वेगाडी १ जुलै २०२३ पर्यंत आणि २६ फेब्रुवारीपर्यंत धावणारी रेल्‍वेगाडी क्रमांक ०११४० मडगाव-नागपूर द्विसाप्‍ताहिक विशेष रेल्‍वेगाडी २ जुलैपर्यंत चालवण्‍यात येणार आहे. या दोन्‍ही गाड्यांच्‍या वेळेत आणि थांबा यांमध्‍ये कोणताही पालट करण्‍यात आलेला नाही. दोन्‍ही रेल्‍वेगाड्यांचे आरक्षण २२ फेब्रुवारीपासून चालू करण्‍यात आले आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन आपला प्रवास निश्‍चित करावा, असे आवाहन रेल्‍वे प्रशासनाने केले आहे.

मध्‍य रेल्‍वेच्‍या तांत्रिक कामामुळे गोंदिया-कोल्‍हापूर महाराष्‍ट्र एक्‍स्‍प्रेस कोल्‍हापूरऐवजी पुणे येथपर्यंतच धावणार आहे.