१२ परीक्षा केंद्राच्‍या ५० मीटर क्षेत्रातील झेरॉक्‍स दुकाने बंद !

सातारा, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – २१ फेब्रुवारीपासून इयत्ता १२ वीच्‍या परीक्षांना प्रारंभ झाला आहे. जिल्‍ह्यात ५१ परीक्षा केंद्रे असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वच परीक्षा केंद्रांबाहेर कडक पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे, तसेच सर्वच परीक्षा केंद्राबाहेरील ५० मीटर क्षेत्रातील झेरॉक्‍स दुकाने बंद ठेवण्‍यात आली आहेत, अशी माहिती सातारा जिल्‍हा परिषदेचे माध्‍यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.

कोळेकर पुढे म्‍हणाल्‍या की, जिल्‍ह्यातील ५१ परीक्षा केंद्रांवर ३६ सहस्र ८७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. अपंग विद्यार्थ्‍यांसाठी परीक्षा केंद्रांवर ‘व्‍हीलचेअर’ची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांची कसून तपासणी करूनच त्‍याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात आहे. याचे चलचित्रीकरणही (व्‍हिडिओ रेकॉर्डिंग) करण्‍यात येत आहे. परीक्षेतील अपप्रकार रोखण्‍यासाठी ५ भरारी पथके स्‍थापन करण्‍यात आली आहेत. ही प्रक्रिया २१ मार्चपर्यंत चालू राहील.

संपादकीय भूमिका 

मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीमुळे मुलांमधील प्रामाणिकपणा नष्‍ट होत असल्‍याचे उदाहरण !