मुंबई – गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देणार आहे. २२ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असे साहित्य दिले जाणार आहे. गुढीपाडव्यापासून पुढील १ मास कालावधीसाठी १०० रुपये प्रतिसंच शिधा देण्यात येणार आहे. राज्यातील १ कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे.
नगरमधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पासाठी ५ सहस्र १७७ कोटी रुपयांची तरतूद !अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी शासनाने ५ सहस्र १७७ कोटी ३८ लाख रुपये सुधारित निधीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अकोला, संगमनेर, राहुरी, राहता, कोपरगाव, तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रर्वण भागातील एकूण १८२ गावांना याचा लाभ होणार आहे. यातून एकूण ६८ सहस्र हेक्टर भूमीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे. हा प्रकल्प ९७ किलोमीटर अंतराचा असून वर्ष २०२७ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. |