‘बेळगाव येथील पू. विजया दीक्षितआजी (वय ९० वर्षे) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात निवासाला आल्या होत्या. मला त्यांच्या समवेत एकाच खोलीत रहाण्याची अनमोल संधी मिळाली. या कालावधीत मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे कृतज्ञतापूर्वक त्यांच्या चरणी अर्पण करते.
१. प्रेमभाव
१ अ. पू. आजींनी प्रतिदिन साधिकेला स्वतःच्या हाताने खाऊ भरवलेला पाहून भाव जागृत होणे : ‘पू. आजींमधील चैतन्याचा आश्रमातील साधकांना लाभ व्हावा; म्हणून प्रतिदिन साधकांसाठी त्या नामजपादी उपाय करतात. नामजपादी उपायांपूर्वी आणि संपल्यानंतर त्यांना उपायांना नेण्यासाठी अन् नंतर खोलीत पोचवण्यासाठी प्रतिदिन साधिका येते. तिला त्या न चुकता स्वतःच्या हाताने खाऊ भरवतात. ते दृश्य पुष्कळ सुंदर असते. त्या वेळी ‘पू. आजी मलाच खाऊ भरवत आहेत’, असे मला वाटते आणि माझी भावजागृती होते.
१ आ. पू. आजी त्यांच्या सुनांशी भ्रमणभाषवर बोलत असतांना अत्यंत प्रेमाने आणि मोकळेपणाने बोलतात. त्या वेळी मला त्यांच्यात ‘सासू-सून’, असे नाते जाणवत नाही.
२. इतरांचा विचार करणे
पू. आजींचा नातू त्यांना महाप्रसादासाठी बोलवायला आल्यावर त्या नामजप करत असतील, तर त्या लगेच हातातील जपमाळ बाजूला ठेवतात आणि दादांच्या समवेत जातात. ‘त्याची सेवा महत्त्वाची आहे. माझ्यासाठी थांबण्यात त्याचा वेळ जायला नको’, असे त्यांना वाटते.
३. शिकण्याची वृत्ती
एकदा मी भ्रमणसंगणकावर सेवा करत होते. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘मी एवढ्या दिवसांत संगणक शिकले नाही. आता घरी गेल्यावर शिकणार आहे. मी सुनेला ‘तुझा जुना संगणक माझ्यासाठी ठेवून दे’, असे सांगितले आहे.’’ यातून मला त्यांची जिज्ञासा आणि शिकण्याची तळमळ जाणवली.
४. पू. आजींमध्ये सातत्य हा गुण पुष्कळ प्रमाणात असणे
अ. त्या नियमित पहाटे उठून नामजप करतात. त्यामध्ये त्या कधीच सवलत घेत नाहीत.
आ. त्या प्रतिदिन सकाळी नियमितपणे अर्धा घंटा व्यायाम करतात. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांच्या शरिराची लवचिकता पाहून ‘त्या नियमित आसने करत आहेत’, हे लक्षात येते.
‘समाजात पू. आजींच्या वयाची अनेक मंडळी वार्धक्य, आजारपण आणि कौटुंबिक अडचणी यांमुळे त्रस्त असतात’, असे पहायला मिळते; परंतु ‘त्याच वयाचे संत मात्र त्यांच्यातील चैतन्यामुळे उत्साहाचे मूर्तीमंत उदाहरण असतात. तिथे त्यांचे अधिक वय हे सूत्र गौण ठरते’, हे पू. आजींकडे पाहून शिकता येते. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात ‘माझे विचार अल्प होऊन मन आनंदी होत आहे’, असे मला जाणवले.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेनेच मला पू. विजया दीक्षितआजींचा सहवास लाभत आहे. त्याबद्दल गुरुदेवांच्या प्रती कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१२.२०२२)