‘पेड न्यूज’प्रकरणी भाजपच्या अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस !

अश्विनी जगताप (उजवीकडे)

पिंपरी (जिल्हा पुणे) – चिंचवड मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी या दिवशी मतदान होणार आहे, तर २ मार्चला या दोन्ही पोटनिवडणुकांचा निकाल घोषित होणार आहे. भाजपच्या चिंचवडच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने ‘पेड न्यूज’ प्रकरणात नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. आयोगाकडून त्यांना लेखी खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. याची नोंद घेत अश्विनी जगताप यांच्याकडून आयोगाला तातडीने खुलासाही पाठवण्यात आला आहे. आता एम्.सी.एम्.सी. (‘मिडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी’) ही समिती सदर उत्तराची पडताळणी करणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया निश्चित केली जाईल.

अश्विनी जगताप यांच्याविषयीची एक बातमी ‘न्यूज पोर्टल’ आणि एका साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आली होती. हे एकूणच लिखाण ‘पेड न्यूज’सारखे असल्याचे एम्.सी.एम्.सी. समितीच्या निदर्शनास आले होते. यावरून सदर समितीने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला यासंबंधीचे पत्र पाठवले होते.