४०१ गोवंशियांचा मृत्यू
रत्नागिरी – जिल्ह्यात ‘लम्पी’च्या लागणमुळे एकूण ४०१ गोवंशियांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गोवंशियांच्या मालकांना हानी सहन करावी लागत आहे. शासनाच्या पशूसंवर्धन विभागाकडून लम्पीमुळे दगावलेल्या २०१ जनावरांच्या मालकांना हानीभरपाईचे ३७ लाख रुपयांचे वाटप केले आहे; मात्र अजुनही गोवंशियांच्या अन्य मालकांकडून हानीभरपाईची प्रतीक्षा केली जात आहे.
जिल्ह्यात एकूण २ लाख ३५ सहस्र गोवंशीय पशूधन आहे. यापैकी ३ सहस्र १०० गोवंशियांना लम्पीची लागण झाली होती. यामध्ये ४०१ गोवंशियांचा लम्पीमुळे मृत्यू झाला होता. या सर्व गोवंशियांच्या मालकांना हानीभरपाई देण्याचे शासनाने घोषित केले आहे.
राज्यात सर्वत्र लम्पीची लागण झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातही ३ सहस्र १०० गोवंशियांना लम्पीची लागण झाली होती. आतापर्यंत २ सहस्र २०० गोवंशियांवर उपचार होऊन ती आता बरी झाली आहेत. तर ४०० गोवंशियांवर अद्यापही उपचार चालू आहेत.
लम्पीला रोखण्यासाठी पशूसंवर्धन विभागाचे प्रयत्न !
याविषयी पशूसंवर्धन जिल्हा उपायुक्त डॉ. धनंजय जगदाळे म्हणाले की, शासनाने ९० पशूधन पर्यवेक्षकांची नियुक्ती केल्याने त्याचा जिल्ह्याला चांगला लाभ झाला. त्यामुळे जिल्ह्यात पशूंसाठी लसीकरणाला वेग आला. ९५ टक्के पशूंचे लसीकरण झाले आहे. शासनाकडून आलेली हानीभरपाईची रक्कम गोवंशियांच्या मालकांना वाटप करण्यात आली असून उर्वरित रकमेची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.