पुणे येथील ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा ‘सरकारवाड्या’चे १९ फेब्रुवारीला लोकार्पण !

पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’च्या वतीने नर्‍हे-आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी या दिवशी लोकार्पण होणार आहे. या सोहळ्यानंतर शिवप्रेमींकरता ‘शिवसृष्टी’चा सिद्ध झालेला ‘सरकारवाडा’ खुला होणार असल्याची माहिती ‘शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्यानंतर प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यात भवानीमाता स्मारक, राजसभा आणि डार्क राईड, रंगमंडल, तर तिसर्‍या टप्प्यामध्ये माची, गंगासागर, बहुविध आकर्षण केंद्र, कोकण आदींचा समावेश आहे. प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात बाजारपेठ, प्रेक्षागृह, वाहनतळ आणि अश्वारोहण (लँडस्केप-हार्डस्केप) आदी कामे पुढील २ वर्षांच्या काळामध्ये पूर्ण होतील, अशी माहितीही कदम यांनी दिली.