‘भुयारी गटार योजना’ म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा उद्योग ! – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून शहरांमध्ये चालू असणारी ‘भुयारी गटार योजना’ म्हणजे भविष्यात पांढरा हत्ती पोसण्याचा उद्योग ठरणार आहे. ही भुयारी गटार योजना पुढे चालवणे अवघड असून या योजनेत अनेक त्रुटी आहेत, तसेच ही योजना म्हणजे नागरिकांचे पैसे खाण्याचा उद्योग आहे, असा आरोप सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसल यांनी केला आहे. ‘सुरुची’ येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
आमदार भोसले पुढे म्हणाले की, शहरामध्ये सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून संमत झालेल्या भुयारी गटार योजनेची आजची परिस्थिती कुणीच सांगू शकत नाही. बोगदा परिसरातील काही भाग वगळला, तर अद्याप अनेक ठिकाणी पाईप टाकण्याचे काम तसेच अर्धवट राहिले आहे. सातारा विकास आघाडीने गडबडीमध्ये कंत्राटदाराला काम दिले. हे काम कसे होत आहे ? याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. या योजनेचे काम अद्यापही १० ते २० टक्क्यांच्या पुढे गेलेले नसून प्रतापगंज पेठ, बुधवार पेठ, चिमणपुरा पेठ परिसरातील अनेक रस्ते उकरून ठेवल्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाला त्रास होऊ लागले आहेत. भुयारी गटार योजना असो, घरकुल योजना असो अथवा कचरा डेपो असो कंत्राटदार नेमायचा, टक्केवारी घ्यायची एवढेच उद्योग चालू आहेत. यातून मला किती मिळतात ? याकडे सत्ताधार्‍यांचे सर्वाधिक लक्ष आहे.