अफगाणिस्तानच्या राजदूतांची महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे विनंती !
मुंबई – अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंदझाय यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. तालिबानी राजवटीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अफगाणी मुलींच्या शिक्षणासाठी भारताने साहाय्य करण्याची विनंती या वेळी मामुंदझाय यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली.
१. अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यानंतर तेथे इयत्ता ७ वी नंतर मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे. भारतात शिक्षण घेत असलेल्या अनेक मुली तालिबान्यांच्या राजवटीमुळे अफगाणिस्तानात अडकल्या आहेत. तालिबान्यांच्या शिक्षणबंदीच्या फतव्याचा या मुलींनाही फटका बसला आहे.
२. राज्यपालांकडे साहाय्य मागण्यासाठी आल्यावर मामुंदझाय यांच्या समवेत अफगाणिस्तानचे मुंबईतील वाणिज्यदूत, शिक्षणप्रमुख यांसह अन्य प्रशाकीय अधिकारी उपस्थित होते.
या वेळी मामुंदझाय म्हणाले, अफगाणिस्तानात तालिबानी राजवट असली, तरी आम्ही तालिबानचे प्रतिनिधी नाही, तर अफगाणिस्तानच्या जनतेचे प्रतिनिधी आहोत. अफगाणिस्तानचा भारताशी व्यापार अद्यापही चालू आहे. त्याला चालना देण्याची आवश्यकता आहे. राज्यपालांनी ‘भारत सदैव अफगाणिस्तानच्या पाठीशी राहील’, असे सांगून अफगाणिस्तानच्या प्रतिनिधींना आश्वासित केले.