रत्नागिरी – प्रतापगडावर अफझलखानाचा वध करतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेल्या पराक्रमानंतर हिंदवी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पहाणार्या शत्रूला मोठा धाक बसला होता. आताच्या काळातही भारताच्या विरोधात अनेक देशांनी कंबर कसली आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे धडे आजही गिरवण्याची आवश्यकता आहे; मात्र त्यासाठी आधी त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेली उपासना नीट समजून घेणे आवश्यक असून नंतरच ते धडे गिरवण्यासाठी कार्यवाही करावी, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.
मठ (ता. लांजा) येथील श्री भवानी सोमेश्वर मंदिरात जयवंत कामत यांनी ‘अतिरुद्र जप आणि महारुद्र स्वाहाकार’ अनुष्ठान आयोजित केले आहे. त्या निमित्ताने ‘अफझलखानवध’ या विषयावर केलेल्या कीर्तनातून ते बोलत होते.
भस्म उटी रुंडमाळा। हातीं त्रिशूळ नेत्रीं ज्वाळा॥ या संत नरहरी सोनारांच्या अभंगावर पूर्वरंगात आफळेबुवांनी निरूपण केले.
आफळेबुवा पुढे म्हणाले,
‘‘प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या ७ सहस्र मावळ्यांनी अफझलखानाच्या २२ सहस्र सैनिकांना गारद केले. साधनांची कमतरता असली, तरी आपल्याकडे असलेल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचा, प्रत्येक माणसाचा शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी खुबीने उपयोग करून घेतला. उपासनेची शक्ती आणि शक्तीच्या उपासनेतून अशी रुद्रशक्ती आपल्या मनात जागृत करण्याची आवश्यकता आहे.
(सौजन्य : Kokan Media Ratnagiri)
आताच्या काळात भारताविरोधात जैविक युद्ध, सांस्कृतिक युद्ध, आतंकवादी युद्ध, धर्माच्या श्रद्धांशी युद्ध, आर्थिक युद्ध या सर्व आघाड्यांवर विजयी होण्यासाठी उपासनेची शक्ती आणि शक्तीची उपासना आपल्या मनामध्ये भरण्याची आवश्यकता आहे. अफझलखानाच्या कबरीभोवती झालेल्या अनधिकृत बांधकामाचे उच्चाटन झाल्याबद्दल आनंद आहे. अफझलखानाबद्दलच्या असत्य, नादान प्रचारातून महाराष्ट्र पुन्हा बाहेर येईल की नाही, अशी भीती प्रत्येक इतिहास अभ्यासकाच्या मनात होती; मात्र त्या वाढवलेल्या वास्तूचे उच्चाटन करून शिंदे-फडणवीस सरकारने मराठशाहीचा प्रचंड मोठा स्वाभिमान दाखवला आहे. कुणाचाही अवमान न करता इतिहासाचा अवमान होऊ देणार नाही, अशा प्रकारची धार महाराष्ट्रात पुन्हा आलेली दिसत आहे.’’