देवरुख, जिल्हा रत्नागिरी, येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. ऐश्वर्य विशाल पारकर (वय ७ वर्षे) रुग्णाईत असतांना त्याचे वडील श्री. विशाल पारकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

देवरुख, जिल्हा रत्नागिरी, येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. ऐश्वर्य विशाल पारकर याला सर्दी ताप आणि त्यानंतर झालेल्या गंभीर आजारात वैद्यकीय उपचारासमवेत आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यामुळे  गुरुकृपेने तो पूर्ण बरा कसा झाला ? ते येथे पाहूया.

कु. ऐश्वर्य पारकर

१. कु. ऐश्वर्यला सर्दीचा त्रास होऊन ताप येणे आणि अनेक औषधोपचार करूनही त्रास वाढतच जाणे

‘१७.४.२२ या दिवसापासून कु. ऐश्वर्यला सर्दीचा त्रास चालू झाला. घरगुती उपचार करूनही त्याला बरे वाटत नसल्याने त्याला नेहमीच्या आधुनिक वैद्यांकडे नेले. त्यांच्या उपचारांनी त्याला बरे वाटले; परंतु पुढील सप्ताहात त्याला पुन्हा सर्दी होऊन ताप येऊ लागला. २९.४.२०२२ या दिवशी अकस्मात् त्याची मान कलंडू लागली आणि तो मलूल झाला. संध्याकाळी त्याला पुन्हा त्याच आधुनिक वैद्यांकडे नेले. आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार त्याची तपासणी करण्यासाठी दुसर्‍या दिवशी सकाळी त्याला रुग्णालयात घेऊन गेलो. त्याच्या रक्ताच्या अहवालात ‘CRP’चे (रक्तातील एका घटकाचे) प्रमाण वाढलेले दिसल्याने त्यांनी एक दिवस रुग्णालयात थांबण्यास सांगितले. या अवधीत त्यांनी ऐश्वर्यवर देवरुख येथील एका बालरोगतज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार चालू केले, तरी त्याचा त्रास वाढतच होता. आधुनिक वैद्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘त्याला लगेच बरे वाटणार नाही, सुमारे ७२ घंट्यांनी उतार पडू लागेल.’’ त्या रात्री आम्ही ऐश्वर्यची नारळाने दृष्ट काढली.

२. आम्ही कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील आमच्या ओळखीचे साधक आधुनिक वैद्य नितीन ढवण यांना भ्रमणभाषवरून संपर्क केला आणि त्यांना आजाराची लक्षणे सांगितली. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘हा त्रास बरा होण्यासाठी काही वेळ लागतो. त्यामुळे काळजी करू नये.’’

३. ऐश्वर्यची प्रकृती सुधारण्यापेक्षा बिघडतच जाणे, बालरोगतज्ञांनाही योग्य निदान न झाल्याने आधुनिक वैद्य ढवण यांच्या माध्यमातून अन्य आधुनिक वैद्यांना संपर्क करणे

श्री. विशाल पारकर

रुग्णालयात भरती करून २४ घंटे उलटून गेल्यावरही ऐश्वर्यची प्रकृती सुधारण्यापेक्षा बिघडतच गेली. त्याचा ताप न्यून होत नव्हता आणि अशक्तपणा वाढत होता. त्याला पाणी पिण्यासाठीही तोंड उघडता येत नव्हते. ज्या बालरोगतज्ञांच्या सल्ल्याने ते आधुनिक वैद्य उपचार करत होते, त्यांनाही या आजाराचे निश्चित निदान होत नव्हते; म्हणून परत आधुनिक वैद्य ढवण यांना संपर्क करून ऐश्वर्यच्या स्थितीची कल्पना दिली. तेव्हा त्यांना ऐश्वर्यचा आजार गंभीर असल्याची कल्पना आली. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कोल्हापूर येथील एका चांगल्या बालरोगतज्ञांना संपर्क केला आणि ऐश्वर्यला त्यांच्या चिकित्सालयात भरती करण्याचे नियोजन केले.

४. सदगुरु सत्यवान कदम यांना ‘ऐश्वर्यसाठी कोणता नामजप करावा ?’ ते विचारणे आणि त्याला कोल्हापूर येथील रुग्णालयात भरती करणे

सौ. वैष्णवी पारकर

दुसर्‍या दिवशी आम्ही ऐश्वर्यला अन्यत्र हालवण्याचे नियोजन केले. देवरुख येथील साधिका सौ. पानवळकरकाकू यांना मी याविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी सद्गुरु सत्यवानदादांना ‘ऐश्वर्यसाठी कोणता नामजप करावा ?’ ते विचारले. आम्ही तो नामजप केला. त्यानंतर आम्ही ऐश्वर्यला कोल्हापूर येथील रुग्णालयात भरती केले.

५. ऐश्वर्यवर वैद्यकीय उपचार लगेच चालू होणे

गुरुकृपेने तेथील आधुनिक वैद्यांनी ऐश्वर्यला अतीदक्षता विभागात भरती करण्याची सिद्धता करून ठेवली होती. त्याला तेथे भरती केल्यावर त्याच्यावर लगेचच वैद्यकीय उपचार चालू केले. तेथील आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘ऐश्वर्यच्या मेंदूला ‘बॅक्टेरिया’चे किंवा ‘व्हायरस’ जंतुसंसर्ग झाला असावा आणि त्यामुळे शरिरातील एखाद्या अवयवावरील नियंत्रण जाऊ शकते.’’ निदान करण्यासाठी प्रथम त्याच्या मेंदूची ‘एम्.आर्.आय्.’ (Magnetic Resonance Imaging) तपासणी आणि त्याच्या मणक्यातील पाण्याचे परीक्षण करण्याचे ठरले.

६. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडून नामजप घेणे

त्याला ‘एम्.आर्.आय्.’ तपासणीसाठी नेतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सौ. ढवणकाकू यांनी मला संपर्क केला आणि ऐश्वर्यसाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेला नामजप कळवला. ‘तो नामजप केल्यावर ऐश्वर्य साडेतीन घंट्यात बरा होईल’, असे सद्गुरु गाडगीळकाकांनी कळवल्याचे त्यांनी मला सांगितले. आतापर्यंत झालेले जागरण आणि मुलाच्या आजाराचे गांभीर्य ऐकून मी आणि माझी पत्नी (सौ. वैष्णवी पारकर) दोघेही गळून गेलो होतो; मात्र सद्गुरु गाडगीळकाकांच्या या आश्वासक शब्दांनी मला थोडा धीर आला. त्यानंतर ऐश्वर्यच्या मेंदूची ‘एम्.आर्.आय्.’ तपासणी होईपर्यंत मी तो नामजप केला.

७. सुट्ट्या असूनही गुरुकृपेने पाठीच्या कण्यातील पाण्याचा अहवाल नेहमीपेक्षा लवकर मिळणे आणि ऐश्वर्यच्या मेंदूला जिवाणूंचा संसर्ग असल्याचे समजणे

ऐश्वर्यच्या ‘एम्.आर्.आय्.’च्या परीक्षणात त्याच्या मेंदूच्या आवरणाला जंतूसंसर्ग (इन्फेक्शन) झाल्याचे निदान झाले. त्याच्या पाठीच्या कण्यातील पाण्याच्या स्थानिक प्रयोगशाळेतील प्राथमिक अहवालात ‘विषाणूंचा संसर्ग (व्हायरल इन्फेक्शन) असू शकतो’, असे सांगितले होते. आधुनिक वैद्यांनी ‘विषाणूंचा संसर्ग असल्यास धोका अधिक असतो आणि ‘जिवाणूंचा संसर्ग (बॅक्टेरिअल इन्फेक्शन) असल्यास धोका अल्प असतो’, असे सांगितले होते. त्याच पाण्याच्या दुसर्‍या एका प्रगत प्रयोगशाळेत चाचणी केली असता त्या अहवालात त्याच्या मेंदूला ‘बॅक्टेरिअल इन्फेक्शन’ असल्याचे दिसले. त्या वेळी सुट्ट्या असूनही गुरुकृपेने हा अहवाल नेहमीपेक्षा लवकर मिळाला.

८. चौथ्या दिवसापासून ऐश्वर्यच्या स्थितीत टप्प्याटप्प्याने सुधारणा होऊ लागणे

कोल्हापूर येथील साधक आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी रुग्णालयात येऊन आमची चौकशी केली आणि काही अडचण नसल्याची निश्चिती केली. तसेच ते तेथील मुख्य आधुनिक वैद्यांशी ऐश्वर्यच्या आजारपणाच्या संदर्भात बोलले. चौथ्या दिवसापासून ऐश्वर्यच्या स्थितीत टप्प्याटप्प्याने सुधारणा होऊ लागली. प्रथम त्याने डोळे उघडून आई-वडिलांना ओळखले आणि त्यांच्या म्हणण्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर त्याचे हालचाल करणे, बोलणे आणि उठून बसणे, असे अल्प प्रमाणात चालू झाले.

९. सद्गुरु गाडगीळकाका यांनी ऐश्वर्यसाठी रात्री-अपरात्रीही नामजप आणि न्यास शोधून सांगणे

ऐश्वर्यच्या आजारपणात त्याच्या प्रकृतीतील चढउतार रात्री-अपरात्री सौ. ढवणकाकूंना कळवल्यावर त्या पुढे सद्गुरु गाडगीळकाकांना कळवत असत. कितीही वेळ झाला असला, तरी सद्गुरु काका लगेचच त्यानुसार नामजप आणि न्यास शोधून सांगत असत. याविषयी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

१०. ऐश्वर्यला शिरेतून दिलेले ‘इंजेक्शन’ अकस्मात् त्याच्या शरिरात जाणे थांबणे आणि याविषयी सद्गुरु गाडगीळकाकांना कळवल्यानंतर शिरेतून ‘इंजेक्शन’ शरिरात जाऊ लागणे

सातव्या दिवसापासून त्याचा थकवा न्यून होऊन तो दिवसातील पुष्कळ वेळ जागा राहू लागला. नवव्या दिवशी ऐश्वर्यच्या शिरेतून दिलेले इंजेक्शन शरिरात जाणे अकस्मात् थांबले. याविषयी सद्गुरु गाडगीळकाकांना कळवल्यानंतर ते इंजेक्शन आपोआप शरिरात जाऊ लागले. मी सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेला नामजप, मुद्रा आणि न्यास करण्याचा प्रयत्न करत होतो. त्या वेळी माझी आई (श्रीमती वैशाली विजयकुमार पारकर, वय ७२ वर्षे) आणि बहीण सौ. भक्ती उपेंद्र महाजन, वय ३५ वर्षे) यांनी काही वेळ नामजप करण्यात साहाय्य केले.

११. रुग्णालयातून घरी आणणे

पंधराव्या दिवशी दुपारपासून ऐश्वर्यचा ताप उतरला. त्याच्या रक्त तपासणी अहवालही चांगला आला. गुरुकृपेने सतराव्या दिवशी ऐश्वर्यची स्थिती चांगली वाटल्याने त्याला रुग्णालयातून सोडले.

१२. कृतज्ञता

परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु डॉ. गाडगीळकाका आणि सद्गुरु सत्यवान कदम यांनी ऐश्वर्यला या गंभीर आजारातून पूर्ण बरे केले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो, तसेच साधक आणि नातेवाईक यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे साहाय्य केले, त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

या अनुभूती लिहून देण्यासाठी फारच विलंब केला. यासाठी परात्पर गुरु डॉक्टर, सद्गुरु डॉ. गाडगीळकाका आणि सद्गुरु सत्यवानदादा यांच्या चरणी क्षमायाचना करतो.’

– श्री. विशाल वि. पारकर (कु. ऐश्वर्यचे वडील), देवरुख, जिल्हा रत्नागिरी. (२.७.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक