नांदेड येथे तरुणीला प्रेयसी होण्‍यास सांगणार्‍या तरुणावर पॉक्‍सो अंतर्गत गुन्‍हा नोंद करून अटक !

नांदेड – येथील एका महाविद्यालयात शिकत असलेल्‍या एका विद्यार्थ्‍याने अल्‍पवयीन मुलीला ‘व्‍हॅलेंटाईन आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो’ असे म्‍हणून तिचा पाठलाग केला. या प्रकरणी पीडितेच्‍या तक्रारीवरून त्‍या तरुणावर पॉस्‍को अंतर्गत गुन्‍हा नोंद करून त्‍याला अटक करण्‍यात आली आहे. आदी आझाद बागडिया (वय १८ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे.

शहरातील वजिराबाद भागात असलेल्‍या एका महाविद्यालयात अल्‍पवयीन तरुणी शिक्षण घेत आहे. १३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८.३० वाजता ती महाविद्यालयात गेली होती. त्‍यानंतर दुपारी १२.३० वाजता महाविद्यालयाच्‍या पायर्‍या उतरत असतांना त्‍याच महाविद्यालयातील आदी या तरुणाने तिच्‍याजवळ येऊन ‘व्‍हॅलेंटाईन आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो । तुम मुझे बहोत पसंत हो’, असे म्‍हणत या तिचा पाठलाग केला. त्‍यानंतर पीडितेने ही गोष्‍ट आईला सांगितली. त्‍यानंतर आईने पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली. या प्रकरणाचे पुढील अन्‍वेषण पोलीस उपनिरीक्षक जयश्री गिरे करत आहेत.