फोंडा येथे सार्वजनिक ठिकाणी ‘बिलिव्हर्स’च्या प्रार्थना !

तक्रारीनंतर पोलिसांकडून प्रार्थना बंद

फोंडा, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील फोंडा कॉमर्स सेंटरमधील लायन्स क्लबच्या सभागृहात ‘बिलिव्हर्स’च्या प्रार्थना चालू होत्या. स्थानिक अधिवक्ता वामन कुट्टीकर आणि धर्मप्रेमी यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या बंद पाडल्या. फोंडा पोलिसांनी प्रार्थनांचे आयोजन करणार्‍या २ व्यक्तींना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन ‘पुढे असा कार्यक्रम करायचा असल्यास तो सर्व प्रकारच्या अनुज्ञप्ती घेऊन करणे बंधनकारक असेल’, अशी कठोर शब्दांत समज देऊन पाठवले.

फोंडा कॉमर्स सेंटरमधील लायन्स क्लबच्या सभागृहात ध्वनीक्षेपकावर ‘आलेलुया’ असे मोठ्या आवाजात म्हटले जात होते. स्थानिक अधिवक्ता वामन कुट्टीकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक, ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. मयूर कन्नवर आणि इतर धर्मप्रेमी यांना हे लक्षात आल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन संबंधितांना जाब विचारला. त्या वेळी सभागृहात अनेक जण बसलेले होते आणि त्यामध्ये लहान मुलेही होती. पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आल्यानंतर त्यांनी आयोजकांना समज दिली.