ताडी हे ताडफळापासून सिद्ध केले जाणारे पेय आहे. सूर्योदय झाल्यानंतर हे पेय आंबते. त्यामुळे त्यापूर्वीच पिणे श्रेयस्कर असते; मात्र सध्या रासायनिक ताडीची विक्री होत असल्याने शासनमान्य ताडीचे दुकान हे गरीब कामगार वर्गासाठी घातक ठरत आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरात ताडी दुकानात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. व्यक्तीचा मृतदेह ६ घंटे ताडीच्या दुकानातच पडून होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबर २०२२ मध्ये विषारी ताडी सिद्ध करणार्या ठिकाणावर धाड टाकून ती सिद्ध करण्याचे साहित्य जप्त केले. या धाडीमध्ये सापडलेले आरोपी हे शासनमान्य ताडी विक्री दुकानमालकांचे कुटुंबीय होते. मागील अनेक वर्षांमध्ये विषारी ताडीचे प्राशन केल्याने मोठ्या प्रमाणात कामगार दगावले, तर काही ताडी विक्री केंद्रांच्या परिसरात शाळा, मंदिर, प्रार्थनास्थळे आणि रुग्णालये आहेत. विषारी ताडीमुळे मृत्यूची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी केवळ एक दुकान बंद करणे पुरेसे नसून युवकांमधील, तसेच सर्वसामान्य कामगार वर्गांतील व्यसनाधीनता रोखण्यासाठी शहरातील सर्व ताडीची दुकाने बंद करणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्ह्यात ताडीची झाडेच नसल्याने वर्ष २०१७ मध्ये शहरातील सर्व शासनमान्य ताडीची दुकाने बंद केली होती. त्यानंतर शासनाने ताडी विक्री केंद्रांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ३२ सहस्र झाडांची नोंद असलेली संख्या पुढील ४ वर्षांत ३८ सहस्र झाली. केवळ ४ वर्षांत ६ सहस्र ताडी उत्पादनक्षम झाडे कुठून आणि कशी वाढली ? त्यामुळे प्रशासन जिल्ह्यात ३८ सहस्र ताडीची झाडे असल्याचे भासवत असून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचाच हा प्रकार आहे.
या पुढील काळात विषारी ताडीच्या प्राशनाने कुणाचा मृत्यू झाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभाग त्याचे दायित्व घेणार आहे का ? आणखी किती मृत्यू झाल्यानंतर प्रशासन जागे होणार ? एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जागे होऊन शहरातील सर्व दुकानांची पडताळणी करणारे प्रशासन विषारी ताडीची विक्री कायमस्वरूपी थांबवण्यासाठी कधी प्रयत्न करणार ? त्यामुळे ताडी विक्री केंद्र आणि त्यांना पाठीशी घालणारे प्रशासकीय अधिकारी यांचे लागेबांधे तर नाहीत ना ? असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधिक पारदर्शकपणे आणि तत्परतेने कारभार सांभाळणे आवश्यक !
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर