‘व्‍हॅलेंटाईन डे’ची विकृती बंद करा !

हिंदूंनो, ‘व्‍हॅलेंटाईन डे’सारखा दिवस साजरा करण्‍यापेक्षा हिंदु धर्माचे योग्‍य शिक्षण घेऊन धर्माचरण करा !

१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्‍हॅलेंटाईन डे’ म्‍हणून साजरा करण्‍याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा आपल्‍या देशातही मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. ज्‍या व्‍हॅलेंटाईनला ख्रिस्‍त्‍यांचे सर्वोच्‍च धर्मगुरु पोप यांनीच ‘या नावाचा कुणी संत नाही’, असे सांगून रोमन दिनदर्शिकेतून कधीच हटवले. खरेतर व्‍हॅलेंटाईनला त्‍याच्‍या राष्‍ट्रद्रोही कृत्‍याविषयी फाशी देण्‍यात आली होती. तिसर्‍या शतकात रोममधील क्‍लॉडीयस २ नावाच्‍या राजाच्‍या आज्ञेचे व्‍हॅलेंटाईनने उल्लंघन केल्‍यामुळे त्‍याने त्‍याला ठार मारण्‍याचा आदेश दिला होता. खरे पहाता व्‍हॅलेंटाईन डे ख्रिस्‍ती पंथाशी निगडित असून आपण हा दिवस साजरा करून एक प्रकारे वैचारिक धर्मांतरच करत असतो. त्‍यामुळे व्‍हॅलेंटाईनच्‍या नावाने भारतात ‘प्रेम दिवस’ साजरा करणे, हे दुर्दैवी आहे. ‘‘प्रेम दिवस’ म्‍हणून ‘व्‍हॅलेंटाईन डे’ साजरा करू नका आणि लैंगिक अत्‍याचारांपासून स्‍वतःच्‍या पाल्‍यांना वाचवा अन् युवतींवरील अत्‍याचाराला पूरक ठरणारी ‘व्‍हॅलेंटाईन डे’ची विकृती बंद करा’, असे आवाहन करण्‍याची आज आवश्‍यकता आहे.

… मग भारतात ‘व्‍हॅलेंटाईन डे’ कशासाठी ? – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

ज्‍या ‘व्‍हॅलेंटाईन’च्‍या नावे हा दिवस साजरा केला जातो, त्‍या कथित ‘संत व्‍हॅलेंटाईन’च्‍या अस्‍तित्‍वाचा कोणताही पुरावा नसल्‍याने वर्ष १९६९ मध्‍ये ‘रोमन कॅथॉलिक चर्च’ने संतांच्‍या दिनदर्शिकेतून आणि सूचीतून त्‍याचे नाव वगळले. रशियातील बेलग्रेड, अमेरिकेतील फ्‍लोरिडा विश्‍वविद्यालय, चीन, इटली, स्‍विडन, दक्षिण कोरिया, इथियोपिया आदी देशांत हा दिवस साजरा केला जात नाही; मग भारताच ‘व्‍हॅलेंटाईन डे’ कशासाठी ? केवळ युवकांना आकर्षित करत विविध कंपन्‍या स्‍वत:चा गल्ला भरत आहेत. याविरोधात हिंदूंनी शाळा-महाविद्यालयांत जाऊन युवकांचे प्रबोधन केले पाहिजे आणि अशी विज्ञापने करणार्‍या कंपन्‍यांना वैध मार्गाने विरोध केला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्‍हणजे ‘व्‍हॅलेंटाईन डे’सारख्‍या कुप्रथा रोखण्‍यासाठी आपल्‍या युवा पिढीला धर्मशिक्षण दिले पाहिजे.

१. ‘व्‍हॅलेंटाईन डे’ साजरा करूनहानीच होत आहे, हे लक्षात येत नाही का ?

१ अ. विदेशातही साजरे न होणारे ‘डे’ साजरे करणे : पाश्‍चात्त्यांनाही आश्‍चर्य वाटेल, असे ७ फेब्रुवारीपासून १४ फेब्रुवारीपर्यंत ‘रोझ डे’ (प्रिय व्‍यक्‍तीला गुलाब भेट देण्‍याचा दिवस), ‘प्रपोझल डे’ (प्रेम व्‍यक्‍त करण्‍याचा दिवस), ‘चॉकलेट डे’, ‘टेडी डे’ (खेळातील अस्‍वल भेट देण्‍याचा दिवस), ‘प्रॉमिस डे’ (प्रिय व्‍यक्‍तीला वचन देण्‍याचा दिवस), ‘किस डे’ (चुंबन घेण्‍याचा दिवस), ‘हग डे’ (आलिंगन दिवस) आणि ‘व्‍हॅलेंटाईन डे’ असे एकूण ८ दिवस लागोपाठ भारतात साजरे केले जातात. एवढे दिवस विदेशातही साजरे केले जात नाहीत. यावरूनच भारताची सामाजिक स्‍थिती किती खालवली आहे ? हे लक्षात येते.

१ आ. फुले देऊन खरे प्रेम व्‍यक्‍त होते का ? : पाश्‍चात्त्य देशांतील मुली आणि स्‍त्रिया यांना फुलांचा गुच्‍छ मिळणे अतिशय आवडते. त्‍यांना वाटते की, फुले देणारा खरोखर त्‍यांच्‍यावर प्रेम करतो. भारतातही या दिवशी प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठी तरुण मुले मुलींना गुलाबाचे फूल अथवा गुच्‍छ देतात. हिंदु धर्मात प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठी कधीही गुलाबाचे फूल किंवा फुलांचा गुच्‍छ दिला जात नाही. फुले देवतांना वाहिली जातात. दारावर फुलांचे तोरण बनवून लावले जाते. सात्त्विकता वाढवायला गजरा करून डोक्‍यात घालतात, तसेच ती शुभप्रसंगी वापरली जातात.

१ इ. व्‍हॅलेंटाईन डेच्‍या दिवशी अनैतिकतेने गाठलेली परिसीमा : कामवासनेची पूर्ती करण्‍याच्‍या उद्देशाने अधिकांश मुले-मुली व्‍हॅलेंटाईन डे साजरा करतात. एका सर्वेक्षणानुसार सुमारे ३० टक्‍क्‍यांहून अधिक मुले मुलींशी लैंगिक संबंध ठेवण्‍यासाठी हा दिवस साजरा करतात. गर्भनिरोधक बनवणार्‍या आस्‍थापनांच्‍या मतानुसार इतर दिवसांच्‍या तुलनेत या दिवशी गर्भनिरोधकांची विक्री अधिक होते. अर्थातच अविवाहित मुले-मुली या दिवशी लैंगिक संबंध ठेवतात. याचा परिणाम म्‍हणून अविवाहित मुलींना गर्भपातही करावा लागतो. थोडक्‍यात यामुळे सामाजिक स्‍वास्‍थ्‍य बिघडते. हिंदु धर्मात लग्‍नापूर्वी लैंगिक संबंध ठेवणे निषिद्ध मानले गेले आहे.

१ ई. मुलींना त्रास देऊन त्‍यांचा छळ करणारे रोडरोमिओ ! : बीबीसी संकेतस्‍थळावर प्रसिद्ध झालेल्‍या एका लेखानुसार व्‍हॅलेंटाईन डेच्‍या काही आठवड्यांपूर्वीच रोड रोमिओ बॉलीवूड चित्रपटातील नायक-नायिका यांच्‍या भेटीच्‍या गोष्‍टींप्रमाणे वागायला लागतात आणि मुलींना त्रास देतात.

मुलींना या काळात घरातून बाहेर निघणे कठीण जाते. मुलाच्‍या इच्‍छेला नाकारल्‍यास काही मुले शिव्‍या देणे, शारीरिक आणि मानसिक छळ करणे, बलात्‍कार करणे, पळवून नेणे, तोंडावर आम्‍ल फेकणे अशा प्रकारे मुलींना त्रास देतात. अशा प्रकारच्‍या घटना एरव्‍हीही होतात; पण या काळात त्‍या घटनांमध्‍ये वाढ होत असल्‍याचे समजते. (अशा प्रकारच्‍या त्रासांना सामोरे जाण्‍यासाठी मुलींनी स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अत्‍यावश्‍यक झाले आहे. मुलींनी अशा घटनांचा प्रतिकार न केल्‍यास येणार्‍या काळात अशा घटना आणखी वाढण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. – संपादक)

२. हिंदु धर्मात प्रेमाला निषिद्ध मानलेले नसणे

हिंदु धर्मात प्रेमाला किंवा प्रेम व्‍यक्‍त करण्‍याला कधीही निषिद्ध मानलेले नाही. हिंदु धर्मात मानसिक स्‍तराच्‍या प्रेमाच्‍याही पुढे असलेल्‍या आध्‍यात्‍मिक स्‍तराच्‍या (निरपेक्ष) प्रेमाला श्रेष्‍ठ मानले जाते. प्रेमभाव असल्‍याविना प्रीती हा गुण विकसित करता येत नाही; मग हिंदु धर्म प्रेमाचा निषेध कसा करणार ? (हिंदूंचा विरोध व्‍हॅलेंटाईन डेसारख्‍या असभ्‍य, असांस्‍कृतिक आणि असामाजिक प्रथेला आहे. असे डे साजरा केल्‍याविनाही मनुष्‍य आवश्‍यक ते साध्‍य करू शकतो. व्‍हॅलेंटाईन डे साजरा करून समाजात अनैतिकता पसरते, स्‍त्रियांचे शील भ्रष्‍ट होते, त्‍यांच्‍यावर अत्‍याचार होतात. यासाठी लोकांना त्‍याची जाणीव करून देणे, त्‍यांचे प्रबोधन करणे आणि अशा कुप्रथा थांबवणे, हेच स्‍वाभिमानी हिंदूंचे कर्तव्‍य आहे. – संकलक)

३. हिंदु युवक-युवतींनी पुढील कृती करायला हवी !

३ अ. आपले यौवन देशासाठी अर्पण करणार्‍या क्रांतीकारकांना विसरू नका ! : आपली संस्‍कृती सांगते की, व्‍यक्‍तीपेक्षा कुटुंब, कुटुंबापेक्षा समाज आणि समाजापेक्षा देश अधिक महत्त्वाचा आहे. हाच दृष्‍टीकोन ठेवून भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांसारख्‍या अनेक विरांनी स्‍वत:चे यौवन अर्पण केले आणि त्‍यामुळे आपल्‍याला स्‍वातंत्र्य मिळाले.

३ आ. हिंदु धर्माच्‍या आचरणाने जन्‍म-मृत्‍यूच्‍या पलीकडे जाता येते, हे लक्षात घेऊन धर्माचरण करा ! : व्‍हॅलेंटाईन डे आणि तशा प्रकारचे इतर डे पाश्‍चात्त्यांनी निर्माण केलेल्‍या कुप्रथा आहेत. आपण हिंदु धर्माचा अभ्‍यास करून त्‍याचे आचरण केल्‍यास केवळ एकच दिवस नव्‍हे, तर आपल्‍याला अनेक जन्‍म आणि जन्‍म-मृत्‍यूच्‍या पलीकडे जाता येते. जे सुख आपल्‍याला अशा प्रकारचे डे साजरा करून मिळते; त्‍या सुखाच्‍याही पुढचा आनंद मिळवून देण्‍याची क्षमता हिंदु धर्माच्‍या शिकवणीत आहे; म्‍हणूनच व्‍हॅलेंटाईन डेसारखा दिवस साजरा करण्‍यापेक्षा हिंदु धर्माचे योग्‍य शिक्षण घेऊन धर्माचरण करा आणि तुमच्‍या मित्र-मैत्रिणींनाही तसेच करायला उद्युक्‍त करा. लक्षात घेण्‍याचे सूत्र म्‍हणजे जो धर्माचे पालन करतो, त्‍याचे धर्म पालन (पोषण) करतो.

(साभार : हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्‍थळ)