पाक सरकारकडून विजेवरील अनुदान रहित करण्याचा निर्णय

महागाईमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटीशर्ती मान्य करण्यास नकार दिल्याने पाकला नाणेनिधीकडून कोणतेही कर्ज मिळू शकलेले नाही; मात्र आता पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या अटीशर्तींपैकी एक असणारी विजेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करण्याची अट पूर्ण केली आहे. शरीफ यांनी अनुदान रहित करून विजेचे दर वाढवण्यास संमती दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महागाईमध्ये आणखी वाढ होणार आहे. पाकमध्ये सध्या एक लिटर दूध २३० पाकिस्तानी रुपयांमध्ये (भारतात ६५ रुपये दराने), तर चिकन १ सहस्र १०० रुपये किलोने मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पेट्रोल, डिझेल यांचे दर वाढवण्यासह सैन्यावर करण्यात येणारा खर्चही न्यून करण्याची अट ठेवली होती. आता यावर पाक सरकार काय निर्णय घेते, हे पहावे लागणार आहे. नाणेनिधीच्या सर्व अटी मान्य करण्यात आल्या, तरच पाकला कर्ज मिळणार आहे.