रामनाथी आश्रमात झालेल्या ‘दैवी सत्संगा’त श्रीरामतत्त्व अनुभवतांना कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १३ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

‘सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात दैवी बालक आणि युवा साधक यांचा सत्संग होतो. ६.६.२०२२ या दिवशी या ‘दैवी सत्संगा’त श्रीरामतत्त्व अनुभवण्यास सांगितले होते. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. ‘आजच्या सत्संगात साक्षात् प्रभु श्रीराम आला आहे’, असे सांगितल्यावर माझे मन पुष्कळ आनंदी झाले.

२. सत्संगात भावप्रयोग करतांना बालसाधकांना ग्लानी येणे आणि नंतर सर्वांमध्ये उत्साह जाणवणे

कु. सायली देशपांडे

सत्संगात कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ११ वर्षे) हिने ‘आपण सर्व साधक अयोध्येला जात आहोत’, असा भावप्रयोग घेतला. त्या वेळी बर्‍याच बालसाधकांना ग्लानी येत होती. त्या वेळी ‘सत्संगात चैतन्य आणि श्रीरामतत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाल्यामुळे सर्वांना ग्लानी येत आहे’, असे मला वाटले. त्यानंतर सर्व साधकांमध्ये उत्साह जाणवला.

३. हनुमानाच्या कथा ऐकतांना ‘सत्संगात श्रीरामासह हनुमंत आला आहे’, असे अनुभवणे

कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे) हिने श्री हनुमानाच्या दोन कथा सांगितल्या. मी अनेक वेळा त्या कथा ऐकल्या होत्या; पण सत्संगात त्या कथा ऐकल्यावर माझी भावजागृती झाली. ‘सत्संगात श्रीरामासह हनुमंतही आला आहे’, असे मला अनुभवण्यास मिळाले.

४. भावप्रयोग करतांना हनुमंताने ‘माझ्या हृदयात प्रभु श्रीराम आहेत, तसे तुझ्या हृदयात तुझे गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर) आहेत’, असे सांगितल्याचे जाणवणे

अपालाने २ मिनिटे डोळे बंद करून ‘श्री हनुमंत आपल्याला काय सांगत आहे ?’, हे अनुभवण्यास सांगितले. हा भावप्रयोग करतांना ‘माझ्या हृदयात श्रीराम आहेत, तसे तुझ्या हृदयात तुझे गुरुदेव आहेत’, असे हनुमंत म्हणाल्याचे मला जाणवले. तेव्हा मला अत्यानंद झाला; पण ‘हा विचार माझ्या बुद्धीचा असेल का ?’, असा विचार माझ्या मनात आला.

५. हृदयावर हात ठेवल्यावर ‘गुरुदेव, गुरुदेव’, असा नामजप संथ गतीने ऐकू येऊन ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मनातील विकल्प नष्ट केला’, असे वाटणे

नंतर अपालाने प्रायोगिक भागामध्ये एक प्रयोग करण्यास सांगितला. ‘आपल्या हृदयावर २ मिनिटे हात ठेवून काय जाणवते ? कोणता नाद ऐकू येतो ? किंवा आणखी काही जाणवते का ?’, ते पहाणे. नंतर तिने सत्संगातील ३ साधकांना अनुभूती सांगण्यास सांगितले. त्या वेळी मी सांगितले, ‘‘मी हृदयावर हात ठेवल्यावर मला ‘गुरुदेव गुरुदेव’ असा नामजप संथ गतीने ऐकू येत होता.’ या प्रायोगिक भागातून ‘गुरुदेवांनी माझ्या मनातील विकल्प नष्ट केला’, असे मला वाटले.

६. ‘प्रभु श्रीरामाला बालसाधक प्रिय असून सत्संगातील आत्मनिवेदन तो ऐकत आहे’, असे जाणवणे आणि सत्संगात नवचैतन्य मिळणे

हा सत्संग नवचैतन्य देणारा होता. सत्संग चालू झाल्यापासून तो संपेपर्यंत ‘स्वये श्रीरामप्रभु ऐकती, कुश लव रामायण गाती ।’ या गीत रामायणाच्या ओळींप्रमाणे मला वाटत होते. ‘स्वतः श्रीराम सत्संगात आला आहे. आम्ही सर्व साधक त्याची बालके असून लव-कुशांप्रमाणे आम्ही त्याला प्रिय आहोत. आम्ही करत असलेले आत्मनिवेदन तो ऐकत आहे’, असे मला जाणवले.

‘हे गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळे आम्हा बालसाधकांना हा दैवी सत्संग लाभला आणि तुम्ही अनेक अनुभूतीही दिल्या, त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.६.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक