मेढा (जिल्हा सातारा), ९ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने नुकताच ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ पार पडला. ६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता एस्.टी. आगार मेढा येथून मोर्च्यास प्रारंभ झाला. या वेळी भाजपचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी मोर्च्याला संबोधित केले. या मोर्च्यात ७ सहस्रांहून अधिक विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि धर्माभिमानी हिंदू भगवे झेंडे घेऊन आणि टोपी घालून सहभागी झाले होते.
धर्मासाठी लढा देण्याची आपली सिद्धता हवी ! – छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार, भाजप
हिंदु धर्मावर येणार्या संकटांनी आज हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळेच लोक रस्त्यावर उतरून या मोर्च्याच्या माध्यमातून त्यांच्या भावना सरकारकडे व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रात असे अनेक मोर्चे निघत असून धर्मासाठी लढा देण्याची आपली सिद्धता असली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या मागण्या निश्चित पूर्ण करतील. राजकारणासाठी आणि कुणाला तरी खुश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. यापुढे जितेंद्र आव्हाड यांनी विचार करून बोलावे.
धर्मकार्य करणार्यांची अपकीर्ती करण्याचे पुरो(अधो)गाम्यांचे षड्यंत्र ! – धनंजय देसाई, हिंदु राष्ट्र सेना, संस्थापक
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, बागेश्वर धामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज हे सर्व संत प्रभावीपणे हिंदुत्वाचे, तसेच धर्मांतर रोखण्याचे निःस्वार्थी कार्य करत आहेत. यामुळेच पुरो(अधो)गामी अशा संतांची अपकीर्ती, तसेच त्यांच्या कार्याला विरोध करत आहेत.
हिंदु धर्माला नामशेष करण्यासाठी प्रयत्नरत धर्मांधांचे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती
केवळ श्रद्धा वालकरच नाही, तर अशा अनेक लव्ह जिहादच्या घटनांमध्ये हिंदु मुलींच्या क्रूरपणे हत्या झालेल्या आहेत. हिंदु धर्माला नामशेष करण्यासाठी प्रयत्नरत धर्मांधांचे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने कठोर कायदे करून त्याची कार्यवाही करावी.