आनंदी आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या प्रती अपार कृतज्ञताभाव असणारी कु. सुवर्णा श्रीराम !

कु. सुवर्णा श्रीराम

१. अपघात झाल्‍याने रुग्‍णालयात असतांनाही आनंदी असणे

‘कु. सुवर्णा श्रीराम हिचा अपघात झाल्‍याने ती रुग्‍णालयात होती. तेव्‍हा मी काही दिवस तिच्‍या समवेत होते. सुवर्णाकडे पाहून ‘ती रुग्‍णाईत आहे किंवा तिचा अपघात झाला आहे’, असे मला वाटत नव्‍हते. तिचा चेहरा आनंदी होता.

सौ. विद्या नलावडे

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या प्रती असलेला कृतज्ञताभाव !

ती मला म्‍हणाली, ‘‘काकू, माझे शस्‍त्रकर्म झाल्‍यावर काही वेळाने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा मला भ्रमणभाष आला होता. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ तिच्‍याशी जे बोलल्‍या, ते ती मला सांगत असतांना मला तिच्‍यामध्‍ये पुष्‍कळ कृतज्ञताभाव जाणवत होता. त्‍या वेळी ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे चैतन्‍य वातावरणात आहे’, असे मला जाणवले.

३. ‘गुरुदेव सहन करायला बळ देत आहेत’, असा भाव असल्‍याने हाताची बोटे कापावी लागली असतांनाही त्‍याचे काहीच न वाटणे

‘प.पू. डॉक्‍टरांचा (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) हात सतत सुवर्णाच्‍या डोक्‍यावर आहे’, असे मला जाणवत होते. मी तिच्‍या समवेत रुग्‍णालयात असतांना मला दाब जाणवत नव्‍हता. मला तेथे चैतन्‍य जाणवत होते. तेथे मला प.पू. डॉक्‍टरांचे अस्‍तित्‍व जाणवत होते. सुवर्णामध्‍ये प.पू. डॉक्‍टरांच्‍या प्रती अपार भाव आहे. तिने मला सांगितले, ‘‘माझा एवढा मोठा अपघात होऊनही मला काहीच वाटत नाही. ‘माझी बोटे कापावी लागली’, याचे मला दुःख होत नाही. गुरुदेव मला शक्‍ती देत आहेत. हे सगळे सहन करायला मला गुरुदेवच बळ देत आहेत.’’

४. दुसर्‍या हाताने गुरुदेवांविषयी भावपूर्ण लिखाण करणे

एक दिवस मी लिखाण करत होते. पूर्वी सुवर्णाला डाव्‍या हाताने लिहायची सवय होती; पण त्‍या हाताची बोटे कापावी लागल्‍याने ती मला म्‍हणाली, ‘‘काकू, मला उजव्‍या हाताने लिहिता येते का ? ते बघू का ?’’ तेव्‍हा मी तिला कोरा कागद दिला आणि म्‍हणाले, ‘‘यावर तुझे नाव लिहून बघ.’’ तेव्‍हा तिने त्‍या कागदावर ‘परम पूज्‍य यांची दासी कु. सुवर्णा ! परम पूज्‍य हेच माझे सर्वस्‍व आहेत. जय गुरुदेव. परम पूज्‍य माझे आणि मी केवळ त्‍यांची आहे’, असे लिहिले. तेव्‍हाही मला तिच्‍याबद्दल पुष्‍कळ कुतूहल वाटले की, तिच्‍यामध्‍ये गुरुदेवांच्‍या प्रती किती अपार भाव आहे !

५. कु. सुवर्णा आणि श्री. आकाश या बहीण-भावडांचे एकमेकांवरील प्रेम पाहून मला संत ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत मुक्‍ताई यांची आठवण झाली.

६. ‘देव आपल्‍यासाठी किती करतो ! तो दुःखाच्‍या वेळी कसा समवेत असतो ?’, हे मी या प्रसंगातून अनुभवले.’

– सौ. विद्या नलावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक