‘कु. सुवर्णा श्रीराम (वय १९ वर्षे) आणि श्री. आकाश श्रीराम (वय २४ वर्षे) रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत. एका अपघातात सुवर्णाच्या डाव्या हाताच्या पंज्याला मोठी दुखापत झाल्याने तिच्या हाताचा पंजा कापावा लागला. त्या कालावधीत सुवर्णा रुग्णालयात असतांना मला तिच्या समवेत ९ – १० दिवस रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला सुवर्णा आणि तिचा मोठा भाऊ श्री. आकाश यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. कु. सुवर्णा श्रीराम हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. शांत आणि स्थिर
१. सुवर्णा रुग्णालयात असतांनाही तिच्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताण जाणवत नव्हता.
२. तिच्या हाताला एवढी मोठी दुखापत होऊनही ती शांत आणि स्थिर होती.
१ आ. सत्मध्ये रहाण्याची तळमळ : सुवर्णाच्या हाताची ‘प्लास्टिक सर्जरी’ (हाताचे बाह्य स्वरूप सुधारण्यासाठी केलेले त्वचारोपण शस्त्रकर्म) झाल्यावरही ती प्रतिदिन शांतपणे ग्रंथांचे वाचन करत होती. यातून तिची सत्मध्ये रहाण्याची तळमळ लक्षात आली.
१ इ. परिस्थितीवर मात करण्याची तळमळ : सुवर्णाला रुग्णालयातून सोडल्यावर तिने लगेचच वही आणि पेन मागितले. पूर्वी ती डाव्या हाताने लिहायची; परंतु ‘आता डाव्या हाताने लिहिता येणार नाही’, हे तिच्या लक्षात आल्यावर तिने उजव्या हाताने लिहिण्याचा सराव करायला तत्परतेने आरंभ केला. यातून तिची परिस्थिती स्वीकारून पुढे जाण्याची तळमळ लक्षात आली.
१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव
अ. ‘ती सतत प.पू. गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) प्रती कृतज्ञताभावात आहे’, असे मला जाणवत होते. तिच्याकडे पाहून माझाही प.पू. गुरुमाऊलींच्या प्रती भाव जागृत होत होता.
आ. रुग्णालयात सुवर्णाच्या समवेत असतांना मला प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. त्यामुळे मला सतत गुरुदेवांचे स्मरण होत होते.
२. श्री. आकाश श्रीराम यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
अ. सुवर्णाचा मोठा भाऊ आकाश श्रीराम अत्यंत शांत आणि स्थिर राहून तिची सेवा करत होता.
आ. सुवर्णा सकाळी झोपेतून उठत असतांना आकाश तिला प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र दाखवायचा. गुरुदेवांचे मुखदर्शन करूनच सुवर्णाच्या दिवसाचा आरंभ व्हायचा.
इ. रुग्णालयात असतांना आकाश उपलब्ध वेळेत सनातनच्या ग्रंथांचे वाचन करायचा.
ई. रुग्णालयात सुवर्णा आणि आकाश यांचे वागणे आदर्श बहीण-भावासारखे होते.
‘सुवर्णा आणि आकाश यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांचा प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या प्रती भाव जाणवत होता.’
– सौ. विद्या अमर सांगळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.७.२०२२)