जीवनात ओढवलेल्‍या भीषण प्रसंगाला गुरुकृपेच्‍या बळावर सकारात्‍मक राहून सामोरे जाणारे रामनाथी आश्रमातील कु. सुवर्णा श्रीराम आणि श्री. आकाश श्रीराम !

‘कु. सुवर्णा श्रीराम (वय १९ वर्षे) आणि तिचा भाऊ श्री. आकाश श्रीराम रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत. एका अपघातामध्‍ये सुवर्णाच्‍या डाव्‍या हाताच्‍या पंज्‍याला मोठी दुखापत झाल्‍यामुळे तिच्‍या हाताचा पंजा कापावा लागला. सुवर्णा रुग्‍णालयात असतांना मी तिला भेटायला गेले होते. त्‍या वेळी कु. सुवर्णा आणि श्री. आकाश यांची मला लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

कु. सुवर्णा श्रीराम यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

कु. सुवर्णा श्रीराम

१ अ. मी सुवर्णाला तिच्‍या अपघातानंतर रुग्‍णालयात पाहिले, तेव्‍हा ‘तिच्‍या चेहेर्‍यावर सकारात्‍मक भाव आणि दैवी कवच आहे’, असे मला जाणवले.

१ आ. सहनशील : तिला अतिशय वेदना होत होत्‍या, तरी आम्‍हाला त्रास होईल; म्‍हणून ती आम्‍हाला तसे जाणवू देत नव्‍हती. तिला एवढा त्रास होत असतांनाही ती इतरांचा विचार करत होती.

१ इ. कु. सुवर्णा अनुभवत असलेली गुरुकृपा !

१. ‘देवच सुवर्णाला सर्व सहन करण्‍याची शक्‍ती देत आहे’, असे मला वाटत होते आणि माझा भाव जागृत होत होता.

२. सुवर्णाच्‍या जीवनात एवढ्या लहान वयात एवढा मोठा प्रसंग घडून ‘तिने स्‍थिर रहाणे’, ही गुरुकृपाच आहे. ‘तिच्‍यावर अशी गुरुकृपा होण्‍यासाठी तिच्‍यात गुरूंप्रती (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या प्रती) अपार भक्‍ती आहे’, असे मला जाणवले.

२. कु. सुवर्णा श्रीराम आणि तिचा भाऊ श्री. आकाश श्रीराम यांची जाणवलेली सामायिक गुणवैशिष्‍ट्ये

श्री. आकाश श्रीराम

अ. ‘गुरु आपल्‍याला प्रत्‍येक प्रसंगात स्‍थिर रहाण्‍यासाठी शक्‍ती देतात’, हे त्‍या बहीण-भावांकडे पाहून माझ्‍या लक्षात आले.

आ. शरिराचा एखादा अवयव निकामी झाल्‍यास दुसर्‍यांवर अवलंबून रहावे लागते. ‘पुढे कसे होईल ?’, याची चिंता असते; परंतु ‘त्‍या दोघांना याची काळजी आहे’, असे वाटले नाही.

इ. त्‍या दोघांना ‘गुरुदेवांच्‍या कृपेने मोठा प्रसंग टळला आणि प्रारब्‍ध न्‍यून झाले’, असे वाटते.

ई. त्‍या दोघांच्‍या वागण्‍यातून आणि बोलण्‍यातून कृतज्ञताभाव जाणवत होता.

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव, तुम्‍ही मला या भावंडांकडून जे शिकवले, त्‍याबद्दल मी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– सौ. साधना अशोक दहातोंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.७.२०२२)

सौ. साधना दहातोंडे

कु. सुवर्णा श्रीराम हिची गुरूंवरची श्रद्धा, निष्‍ठा आणि गुुरूंप्रतीचा भाव पाहून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांनी मला तिच्‍यावर कविता लिहिण्‍यास सुचवले. त्‍यांच्‍या कृपेने मला पुढील काव्‍यपंक्‍ति स्‍फुरल्‍या. त्‍या गुरुचरणी अर्पण करत आहे.

सगुणातूनी भेटले श्रीरामरूपी परब्रह्म ।

 येता भूमंडळी लाभले तिजला श्रीरामकुळ (टीप १) ।
सगुणातूनी भेटले श्रीरामरूपी परब्रह्म (टीप २) ॥ १ ॥

सुवर्णा म्‍हणते…

गुरूंमुळे संपले माझे प्रारब्‍धकर्म ।
ऐसे दयाळू आहेत भूमंडळी माझे गुरु
जरी होते माझे पूर्वकर्म झाली मजवरी गुरुकृपा ।
गुरूच दिसती मागेपुढे तुम्‍हीच माझे सर्वस्‍व आता ॥ ३ ॥

जीवन दिधले त्‍वा मज तव चरणी ।
समर्पिते तन मन धन तव चरणी ॥ ४ ॥

सत्-चित्-आनंद (टीप ३) लाभले गुरुचरणी ।
आठवू नये तुम्‍हावीण काही, हीच एक विनवणी ॥ ५ ॥

गुरुवाणी म्‍हणे…

ऐसी सुवर्णा श्रीराम असे गुरुगृही (टीप ४) ।
आदर्श ठरेल सर्वांस ती भूमंडळी ॥ ६ ॥

टीप १ – सुवर्णा यांचे आडनाव ‘श्रीराम’ आहे.

टीप २ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

टीप ३ – सत् – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, चित् – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि आनंद – आनंदस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

टीप ४ – सनातनच्‍या आश्रमात