|
मुंबई – वाचन संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन उपक्रम हाती घेतला आहे. महानगरपालिकेची ४ नाट्यगृहे आणि ५ जलतरण तलाव यांच्या आवारात पुस्तक विक्रीसाठी प्रकाशकांना सशुल्क जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने मराठी साहित्य विश्वातील प्रकाशकांकडून अर्ज मागवले आहेत. मराठी भाषादिनी म्हणजे २७ फेब्रुवारी या दिवशी या उपक्रमाला प्रारंभ करण्यात येईल.
१. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे. पुस्तक प्रदर्शन किंवा पुस्तकांच्या दुकानाकडे मोजक्या लोकांचेच पाय वळतात. पुस्तके लोकांपर्यंत पोचावीत, यासाठी महानगरपालिकेने प्रकाशकांना जागा आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
२. विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, बोरिवलीमधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह आणि मुलुंडमधील कालिदास नाट्यगृह यांच्या आवारात प्रकाशकांना पुस्तक विक्रीसाठी सशुल्क जागा उपलब्ध करण्यात येणार आहे, तसेच दादर, चेंबूर, कांदिवली, दहिसर (पूर्व) आणि अंधेरी पश्चिम येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावांच्या परिसरातही अशी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे.
३. अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या संकल्पनेतील या उपक्रमाला मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार महानगरपालिकेने या उपक्रमासाठी प्रकाशकांकडून अर्ज मागवले आहेत.
एका प्रकाशकाला दुसर्या प्रकाशकांचीही पुस्तके विक्रीस ठेवता येणार आहेत, तसेच २-३ प्रकाशकांनी मिळून जागा घेण्याची सिद्धता दर्शवल्यास त्याला मान्यता दिली जाणार आहे.
४. या ठिकाणी शैक्षणिक पुस्तकांची विक्री करता येणार नाही, तसेच मराठी साहित्यातील पुस्तकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तूंची येथे विक्री करता येणार नाही, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. या जागेसाठी ६ सहस्र रुपये भाडे आकारण्यात येणार आहे, तसेच वाचकांना १५ टक्के सवलतीत पुस्तके द्यावीत, अशीही अट घालण्यात आली आहे. त्यामुळे या उपक्रमातून वाचकांनाही लाभ होणार आहे.