माघ कृष्ण प्रतिपदा (६.२.२०२३) या दिवशी पू. (कै.) चंद्रसेन मयेकर यांच्या देहत्यागानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
‘राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे ७८ वे संत पू. चंद्रसेन शिवराम मयेकर यांनी माघ शुक्ल चतुर्थी (गणेश जयंती,२५.१.२०२३) या दिवशी देहत्याग केला. ६.२.२०२३ या दिवशी त्यांच्या देहत्यागानंतरचा १३ वा दिवस आहे.
पू. (कै.) चंद्रसेन मयेकर यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. पू. (कै.) चंद्रसेन मयेकर यांची राजापूर येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. श्री. प्रमोद लांजेकर
१ अ १. सेवेची तीव्र तळमळ : ‘पू. मयेकरकाका दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करायचे. त्यांच्या पायाला पावसाळ्यात जखमा व्हायच्या; पण सेवेत खंड पडू न देता पायाला कापड बांधून पू. काका सेवेला जायचे. यातून मला त्यांची सेवेची तळमळ शिकायला मिळाली.
१ अ २. इतरांचा विचार करणे : मी लांजा येथे नोकरी करत असतांना कामावरून आल्यावर पू. काकांकडे जायचो. नंतर आम्ही दोघे दुचाकी गाडीवरून प्रसारासाठी जायचो. राजापूरची भौगोलिक स्थिती उंच-सखल आहे. त्यामुळे पू. काका मला सांगायचे, ‘‘ज्या भागात साधिकांना प्रसाराला जाणे कठीण आहे, तेथे आपण दोघे गाडीने जाऊया.’’
१ अ ३. कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानंतर स्थिर रहाणे : पू. काकांवर अनेक कठीण प्रसंग आले. प्रथम त्यांच्या पत्नीचे, नंतर सूनबाईंचे आणि त्यानंतर त्यांच्या मुलाचे निधन झाले. या सर्व कठीण प्रसंगांत पू. काका स्थिर होते. त्यांच्या घरी गेल्यावर ते या प्रसंगांबद्दल न बोलता साधना आणि सेवा यांविषयी बोलायचे.’
१ आ. श्री. सुभाष विष्णु पवार
१ आ १. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रूपाने परात्पर गुरु डॉक्टर घरी आले’, असा भाव असणे : ‘माझ्याकडे राजापूर शहरातील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांची वितरण सेवा होती. मी पू. मयेकरकाकांच्या घरी दैनिक देण्यासाठी जायचोे. त्या वेळी पू. काका दैनिकाला उद्देशून पुष्कळ आनंदाने ‘माझी गुरुमाऊली आली’, असे म्हणायचे. दैनिकाप्रती कृतज्ञतेसह त्यांचा उच्च कोटीचा भावही होता.
१ आ २. साधकांमध्ये व्यष्टी साधनेचे गांभीर्य निर्माण करणे : पू. मयेकरकाकांशी माझी भेट व्हायची. तेव्हा ते भीषण आपत्काळाची जाणीव करून द्यायचे. ‘आपत्काळात तरून जायचे असेल, तर व्यष्टी साधना पुष्कळ महत्त्वाची आहे. व्यष्टी साधना चांगली झाली, तर हिंदु राष्ट्राच्या ईश्वरी कार्यात देव निवड करणारच आहे’, असे ते म्हणायचे. त्यांच्या सांगण्यामध्ये पुष्कळ तळमळ आणि वाणीमध्ये चैतन्य असायचे.’
१ इ. श्री. संजय माने
१ इ १. प्रेमभाव आणि साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी, ही तळमळ : ‘केंद्रातील एखादा साधक पुष्कळ दिवस भेटला नाही, तर पू. मयेकरकाका त्याची पुष्कळ प्रेमाने विचारपूस करायचे आणि साधकाला भेटण्यासाठी येण्याचा निरोप द्यायचे. मी ‘समष्टी सेवेत सहभागी आहे’, हे समजले, तरी ते आनंदी व्हायचे आणि मला प्रोत्साहन द्यायचे. ‘परम पूज्य गुरुमाऊलींना सनातनचा साधक प्राणप्रिय आहे. त्यामुळे साधकांची आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे’, अशी त्यांना तीव्र तळमळ होती.’
१ ई. श्रीमती सुहासिनी बाणे
१ ई १. शांत आणि नम्र स्वभाव : ‘पू. काकांचा स्वभाव शांत आणि प्रेमळ होता. ७० व्या वर्षीही ते दैनिक वितरणाची सेवा नियमित करायचे. ते वाचकांशी नम्रपणे बोलायचे.’
१ उ. श्री. श्रीकृष्ण नारकर
१. ‘पू. काकांकडे पाहिल्यानंतर ‘ते सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवायचे.
२. पू. काकांनी वयाच्या ७० वर्षापर्यंत ‘गुरुदेवांचा संदेशवाहक’, या भावाने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा केली.’
१ ऊ. सौ. पल्लवी लांजेकर
१ ऊ १. विरक्त होणे : ‘साधकांची प्रगती व्हायला पाहिजे’, अशी पू. काकांना तळमळ होती. त्यांची संसाराबद्दलची विरक्ती वाढू लागली होती. ते नेहमी म्हणायचे, ‘‘ही सर्व माया आहे. परमेश्वर हेच सत्य आहे. त्याला सोडू नका.’’
१ ऊ २. समष्टी तळमळ आणि प्रेमभाव : केंद्रात एखादी मोहीम, हिंदु राष्ट्र-जागृती सभा किंवा आंदोलन असेल, त्या वेळी पू. काका स्वतःहून नामजप करत. त्यांना भ्रमणभाष केल्यावर ते आम्हाला सांगायचे, ‘‘काही काळजी करू नका. मी नामजपादी उपाय चालू केले आहेत.’’ त्यांची ‘समष्टी तळमळ आणि साधकांबद्दल प्रेमभाव’, हे गुण मला शिकायला मिळाले.
१ ऊ ३. रुग्णाईत असूनही चेहर्यावर तेज जाणवणे : पू. काका रुग्णाईत असतांना मी आणि श्री. लांजेकर त्यांना भेटायला गेलो होतो. ते रुग्णाईत होते, तरी त्यांच्या चेहर्यावर पुष्कळ तेज दिसत होते. आम्हाला पाहिल्यावर त्यांनी श्री. लांजेकरांचा हात हातात घेतला. त्या वेळी ते पुष्कळ स्थिर होते आणि जणू आम्हाला सांगत होते, ‘माझ्याजवळ प.पू. गुरुदेव आहेत. तुम्ही तुमची साधना वाढवा !’
१ ए. सौ. स्मिता माने
१ ए १. प्रेमळ : ‘पू. काका पुष्कळ प्रेमळ आणि मायाळू होते. ‘प्रत्येक साधकाचे घर हे आपले कुटुंबच आहे’, असा त्यांचा भाव असायचा. ‘त्यांच्या चैतन्यमय वाणीमुळे आम्हाला आध्यात्मिक लाभ होत आहे’, असे जाणवायचे.
१ ए २. पू. मयेकरकाकांना पाहिल्यावर भावाश्रू येऊन ‘परम पूज्य, परम पूज्य’, असा नामजप चालू होणे : १८.१.२०२३ या दिवशी मी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यांना बघून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले आणि माझा ‘परम पूज्य, परम पूज्य’, असा नामजप चालू झाला. त्या वेळी माझी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना होत होती.’
१ ओ. श्री. बापुसाो पाटील, कोल्हापूर
१ ओ १. साधनेतील प्रत्येक गोष्ट शिकवणारे पू. मयेकरकाका ! : पू. काका मला नेहमी म्हणायचे, ‘‘तुमची व्यष्टी साधना चांगली होते ना, मग परात्पर गुरु डॉक्टर तुमच्याकडून समष्टी साधना करून घेणार.’’ त्यांचे बोलणे ऐकल्यावर मला व्यष्टी साधना करण्याचा उत्साह वाटायचा. मी साधनेत आल्यापासून प्रत्येक गोष्ट त्यांनी मला शिकवली आणि करवूनही घेतली. एखाद्या लहान बाळाला शिकवतात, त्याप्रमाणे त्यांनी मला प्रेमाने सर्व शिकवले. त्यांचा तो प्रेमभाव आणि आपुलकी पाहून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू यायचे आणि मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटायची.
१ ओ २. परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असणे : पू. काका आम्हाला सांगायचे, ‘‘तुम्ही झोकून देऊन सेवा करा. गुरुदेव सर्व करणारच आहेत. तुम्ही केवळ सकारात्मक रहा आणि गुरुदेवांवर श्रद्धा ठेवा. आपले गुरुदेव विश्वाचे पालक आणि मालक आहेत. त्यांना अशक्य असे काहीच नाही.’’
१ ओ ३. व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व साधकांच्या मनावर बिंबवणे : त्यांच्यामध्ये पुष्कळ लढाऊ वृत्ती होती. ते म्हणायचे, ‘‘आपल्याला हिंदु राष्ट्र आणायचे आहे. तुम्हाला समाजाचे नेतृत्व करायचे आहे. त्यासाठी तुमचा अभ्यास पाहिजे. तुम्ही परम पूज्य गुरुदेवांना अपेक्षित अशी व्यष्टी आणि समष्टी साधना केली, तर तुमचा याच जन्मात उद्धार होईल !’’
‘परम पूज्य गुरुदेवांनी पू. मयेकरकाकांसारखे संत देऊन आम्हाला आणि संपूर्ण राजापूर केंद्राला आनंद दिला अन् आमच्यावर कृपा केली. त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. मी पू. मयेकरकाकांच्या चरणी सदैव कृतज्ञ आहे.’
२. पू. मयेकरकाकांच्या देहत्यागानंतर राजापूर येथील साधकांना जाणवलेली सूत्रे
२ अ. श्री. भास्कर खडपे (२६.१.२०२३)
२ अ १. देहत्यागापूर्वी ४ दिवस व्यष्टी साधना चांगली होणे : ‘देहत्यागापूर्वी ४ दिवसांपासून पहाटे ४ च्या कालावधीत आपोआप जाग येऊन प.पू. गुरुमाऊलींना प्रार्थना करणे, आळवणे, गुरुस्मरण आणि नामजप करणे’, असे व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढले आहेत. त्यातील भावाचा आनंद प.पू. गुरुमाऊलींच्या कृपेने अनुभवता येत आहे.
२ अ २. पू. मयेकरकाकांच्या देहत्यागाच्या दिवशी सतत नामजप होणे : पू. काकांनी देहत्याग केला, त्या दिवशी सतत माझा नामजप झाला. मनात पू. काकांनी वेळोवेळी साधनेसंदर्भात केलेल्या मार्गदर्शनाच्या विचारांनी कृतज्ञता व्यक्त होत होती. ते नेहमी मला ‘‘तुझी कृती झाली पाहिजे. व्यष्टी साधना वाढव. साधनेत आता मागे रहायला नको. तुझ्यासाठी माझी प्रार्थना असते’’, असे सांगायचे. त्यामुळे मला प्रेरणा मिळून साधनेच्या प्रयत्नांमध्ये वाढ होत असे. त्याची मला काल प्रकर्षाने जाणीव झाली.
‘पू. काकांचे आचरण आणि शिकवण यांनुसार प.पू. तुम्हीच माझ्याकडून साधना करवून घ्यावी’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
२ आ. श्रीमती सुहासिनी बाणे
२ आ १. देहत्यागानंतर चेहरा तेजस्वी जाणवून पू. काकांच्या घरात चैतन्य जाणवणे : ‘२५.१.२०२३ या दिवशी पूज्य काकांनी देहत्याग केला. तेव्हापासून त्यांचा चेहरा तेजस्वी वाटत होता. ‘पू. काकांचे घर चैतन्याने भरून गेले होते. ते विश्रांती घेत आहेत’, असे मला जाणवत होते.’
२ इ. सौ. स्मिता माने, राजापूर
२ इ १. खोलीत थंडावा जाणवून पू. काकांची त्वचा तेजोमय दिसणे : पू. काकांनी देहत्याग केला. त्या दिवशी त्यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व साधिका गेलो होतो. त्याच्या चरणांना स्पर्श करून ‘आमच्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधना करून घ्या’, अशी प्रार्थना केली. त्या वेळी त्या खोलीमध्ये थंडावा जाणवत होता. ‘पूज्य काका झोपले आहेत’, असे जाणवत होते. त्यांची त्वचा पांढरीशुभ्र तेजोमय दिसत होती. पूज्य काकांकडे बघून सतत प्रार्थना होत होती, ‘त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा लाभ आम्हा सर्वांना होऊ दे.’ त्या वेळी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप माझा सतत चालू होता.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २६.१.२०२३)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |