दैवी सत्‍संगात कु. अपाला औंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १५ वर्षे) हिने महाकालीदेवीची केलेली भावपूर्ण स्‍तुती आणि सत्‍संगातील बालसाधकांना आलेल्‍या अनुभूती

१५.६.२०२२ या दिवशी दैवी सत्‍संग झाला. तो ‘महाकालीदेवी’च्‍या तत्त्वावर आधारित होता. सत्‍संगात प्रार्थना झाल्‍यानंतर कु. अपाला  औंधकर हिने देवीची स्‍तुती केली. ती स्‍तुुती पुढे दिली आहे.  

महाकालीदेवी
कु. अपाला औंधकर

१. दैवी सत्‍संगात कु. अपालाने महाकालीदेवीची केलेली स्‍तुती आणि तिला केलेली प्रार्थना !

‘हे देवी, ‘तू महादेवी आहेस. साक्षात् महादेवाची तू अर्धांगिनी आहेस. तू सर्वांना सतत आशीर्वाद देणारी जगन्‍माता आहेस. तूच आमच्‍या मनावर नियंत्रण ठेव. तू चिरंतन आहेस. प्रत्‍येक क्षणी तू आमच्‍या समवेत असतेस. तू आदी आणि अनंत आहेस. तुझेे रूप अत्‍यंत तेजस्‍वी आहे. तू अखिल ब्रह्मांडाचा भार घेणारी आहेस. तू रौद्र कालीचे रूप धारण केलेस, तरी तुझे हृदय चंद्राप्रमाणे अत्‍यंत शीतल आहे, तसेच ते विशालही आहे. त्‍या विशाल हृदयातून आमच्‍यावर कारुण्‍याचा वर्षाव होत आहे. तू करुणास्‍वरूपिणी आणि अभद्राचा नाश करणारी आहेस. तुझे भावपूर्ण ध्‍यान केल्‍याने तू सत्‍वर प्रसन्‍न होणारी आहेस. तू विष्‍णूची योगमाया आहेस. आमच्‍यासारख्‍या छोट्या छोट्या बालिकांचे साष्‍टांग दंडवत तू स्‍वीकार कर. हे जगन्‍माते, तुला त्रिवार वंदन असो !

२. ‘देवीची स्‍तुती करतांना सत्‍संगातील बालसाधिकांना आलेल्‍या अनुभूती

सत्‍संगाच्‍या नंतरच्‍या सत्रात ‘देवीची स्‍तुती करतांना काय जाणवले ?’, असे बालसाधिकांना विचारण्‍यात आले. त्‍यांनी सांगितलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती पुढेे दिल्‍या आहेत.

२ अ. कु. चैत्राली कुलकर्णी (वय १४ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ५५ टक्‍के)

२ अ १. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍यात दुर्गा, भवानी आणि महालक्ष्मी या देवींचे दर्शन होणे अन् परात्‍पर गुरु डॉक्‍टरांमध्‍ये देवीतत्त्व आहे’, असे जाणवणे : ‘सत्‍संगात देवीचा विषय चालू होण्‍यापूर्वी मला देवीची अंतर्मनापासून पुष्‍कळ आठवण येत होती. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यातच दुर्गादेवी, भवानीदेवी आणि महालक्ष्मीदेवी यांचे दर्शन होत आहेे’, असे मला जाणवले. ‘गुरुदेवांमध्‍ये (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सर्व देवता आहेत. त्‍यामुळे गुरुदेवांमध्‍येही देवीतत्त्व आहे’, असे मला जाणवले.’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

२ आ. कु. ऋग्‍वेदी गोडसे (वय ६ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के)

२ आ १. ‘मला देवीचे मारकतत्त्व जाणवून ‘माझ्‍या शरिरावर आलेले त्रासदायक आवरण नष्‍ट होत आहे’, असे जाणवले.

३. सत्‍संग चालू असतांना निसर्गात जाणवलेले पालट

सत्‍संग चालू असतांना आम्‍हा दोघींना (कु. अपाला औंधकर आणि कु. प्रार्थना पाठक यांना) पुढील पालट जाणवले.

अ. प्रार्थना झाल्‍यानंतर सत्‍संगाला आरंभ झाला आणि आकाशात एका गरुडाचे दर्शन झाले. त्‍या वेळी ‘सत्‍संगात साक्षात् महाविष्‍णु आले आहेत’, असे वाटले.

आ. महादेवीची स्‍तुती करत असतांना वातावरणातील उष्‍णता आणि तेज वाढले होते.

इ. उन्‍हाची तीव्रता काही प्रमाणात वाढली. त्‍या वेळी ‘सत्‍संगात देवीचे मारकतत्त्व अवतरित झाले आहे’, असे जाणवले.

४. साधकांना आलेल्‍या अनुभूती 

अ. ‘सत्‍संगाच्‍या शेवटच्‍या सत्रात देवीतत्त्व सर्वाधिक प्रमाणात वाढले आहे’, असे सर्वांना जाणवले. बर्‍याच बालसाधकांना ‘स्‍वतःवर नामजपादी उपाय होत आहेत’, अशी अनुभूती आली.

आ. सत्‍संगात मध्‍ये मध्‍ये सर्वत्र पांढरा प्रकाश दिसत होता.

‘हे नारायणीदेवी, हे महादेवी, तुझ्‍याच कृपेमुळेे आम्‍ही या सत्‍संगात तुझे अस्‍तित्‍व अनुभवू शकलो. आम्‍ही तुझी बालके आहोत. तुला अपेक्षित अशी गुरुसेवा तूच आमच्‍याकडून करून घे’, अशी आर्ततेने प्रार्थना करतो. तुझ्‍या कृपेने हा सत्‍संग पार पडला, यासाठी हे सत्‍संगरूपी कृतज्ञतापुष्‍प तुझ्‍या चरणी अर्पण करतो.’

– कु. अपाला औंधकर  (वय १५ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा आणि

– कु. प्रार्थना पाठक (वय ११ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के) सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२३.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक