आग्रा किल्ला (लाल किल्ला) येथे शिवजयंतीला अनुमती नाकारली !

संतप्‍त शिवप्रेमींची पुरातत्‍व विभागाच्‍या विरोधात देहली उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट !

संभाजीनगर – १९ फेब्रुवारी या दिवशी आग्रा येथील ऐतिहासिक किल्‍ल्‍यामध्‍ये शिवजयंतीच्‍या भव्‍य कार्यक्रमाचे नियोजन ‘अजिंक्‍य देवगिरी प्रतिष्‍ठान’ आणि ‘आर्.आर्. पाटील फाऊंडेशन’चे अध्‍यक्ष विनोद पाटील यांनी केले होते. त्‍यासाठी त्‍यांनी पुरातत्‍व विभागाकडे रितसर अनुमती मागितली होती; मात्र कोणतेही कारण न देता अनुमती नाकारण्‍यात आली आहे. त्‍या विरोधात ‘अजिंक्‍य देवगिरी प्रतिष्‍ठान’च्‍या वतीने देहली उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे.

अनुमतीसाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय सांस्‍कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांना शिफारस पत्रही दिले होते. रेल्‍वे राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय पुरातत्‍व विभागाच्‍या मंत्र्यांची ३ वेळा भेटही घेतली. तरीही अनुमती नाकारण्‍यात आली आहे. विशेष म्‍हणजे याच आग्राच्‍या किल्‍ल्‍यामध्‍ये यापूर्वी ‘आगाखान’ पुरस्‍कार कार्यक्रमासाठी अनुमती देण्‍यात आली होती. एवढेच नाही, तर गायक अदनान सामी याच्‍या कॉन्‍सर्टलाही (कार्यक्रमालाही) अनुमती देण्‍यात आली होती.

‘ज्‍यांचा ऐतिहासिक संबंध त्‍या किल्‍ल्‍याशी नाही, अशांना अनुमती दिली जाते. मग त्‍या किल्‍ल्‍याशी ऐतिहासिक संबंध असलेल्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जयंतीलाच अनुमती का नाकारली ?’, असा संतप्‍त प्रश्‍न विनोद पाटील यांनी उपस्‍थित केला आहे. शिवजयंतीला अनुमती नाकारतांना पुरातत्‍व विभागाने कोणतेही कारण दिलेले नाही. मुळात किल्‍ल्‍यामध्‍ये सांस्‍कृतिक कार्यक्रमाला अनुमती देण्‍याविषयी कुठलीही नियमावली नाही. त्‍यामुळेच पुरातत्‍व विभाग पक्षपातीपणा आणि मनमानीपणा करत आहे, असा आरोप विनोद पाटील यांनी केला आहे.