|
पुणे – अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजे नासाच्या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळतो, असे आमीष दाखवून आरोपींनी ६ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. १०० हून अधिक नागरिक या आमिषाला बळी पडले असून यासंदर्भात बाबासाहेब सोनवणे यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यावरून बंडगार्डन पोलीस ठाण्यात ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. राम गायकवाड, रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ आणि राहुल जाधव अशी संशयितांची नावे आहेत. आरोपींनी पुणे स्थानक परिसरातील साधू वासवानी चौकात एका हॉटेलमध्ये गुंतवणूकदारांसाठी कार्यक्रम ठेवला होता. त्यामध्ये ‘राईस पुलर’ या धातूच्या यंत्राला चांगली मागणी असून याच्या खरेदीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे आमीष दाखवून त्यांनी नागरिकांची फसवणूक केली. हा प्रकार जून २०१८ पासून चालू होता. साहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रुईकर हे या घटनेचे पुढील अन्वेषण करत आहेत.
सांगली जिल्ह्यातही म्हैसाळ येथेही अशाच प्रकारच्या फसवणुकीची घटना घडल्याने एकाच घरातील ९ जणांनी आत्महत्या केली होती.