परमात्‍म्‍याच्‍या प्राप्‍तीसाठी शरीर, वाणी आणि मन यांचे तप आवश्‍यक ! – प.पू. सद़्‍गुरु शिवकुमार महास्‍वामीजी

बिदर येथील प.पू. सद़्‍गुरु शिवकुमार स्‍वामीजी यांचे हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याला शुभाशीर्वाद !

प.पू. सद़्‍गुुरु शिवकुमार महास्‍वामीजी यांना ‘सनातन पंचांग २०२३’ भेट देतांना श्री. रघुनाथ ढोबळे

पुणे – परमात्‍म्‍याच्‍या प्राप्‍तीसाठी शरीर, वाणी आणि मन यांचे तप आवश्‍यक आहे; मात्र आज ‘रेडीमेड’चा जमाना असल्‍याने तपाची बुद्धी नाही, बुद्धीविना परमात्‍मा भेटू शकत नाही, असे प्रतिपादन बिदर येथील प.पू. सद़्‍गुरु शिवकुमार महास्‍वामीजी यांनी पुणे येथे केले. प.पू. सद़्‍गुरु शिवकुमार महास्‍वामीजी यांचा आध्‍यात्मिक सोहळा २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात पार पडला. त्‍या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात गुरुदर्शन आणि प्रवचन होते. या वेळी हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्यात कशी कार्यरत आहे ? याविषयीची माहिती सांगितल्‍यानंतर महाराजांनी ‘ही काळाची आवश्‍यकता आहे. आपणास पुष्‍कळ करावे लागणार आहे’, असे सांगून हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याला आशीर्वाद दिले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने श्री. रघुनाथ ढोबळे यांनी महाराजांना ‘सनातन पंचांग २०२३’ भेट दिले.

प.पू. सद़्‍गुरु शिवकुमार महास्‍वामीजी पुढे म्‍हणाले की, जी गोष्‍ट सत्‍य-असत्‍य निर्णय करू शकते, त्‍याला बुद्धी म्‍हणतात; मात्र शिक्षण घेतल्‍याने बुद्धी मिळतेच असे नाही. शिक्षण घेतलेला माणूस जनावरासारखा वागत असेल, तर त्‍याला बुद्धीमान कसे म्‍हणावे ? कुठे जेवावे ? काय जेवावे हे ज्‍याला कळत नाही, त्‍याला बुद्धीमान कसे म्‍हणावे ?

कार्यक्रमाचे आयोजन ‘श्री सद़्‍गुरु सिद्धारूढ आध्‍यात्मिक समिती, पुणे’चे प.पू. शंकरानंद स्‍वामीजी, संस्‍थापक, तसेच अध्‍यक्ष अमरनाथ माना, सचिव रमेश गंताले आदींनी केले होते.