‘भारतीय संस्कृती आज अस्तित्वात आहे का ?’, असा प्रश्न कुणी विचारल्यास ‘त्याची टक्केवारी अगदीच न्यून आहे’, असे खेदाने म्हणावे लागेल. संस्कृती टिकवण्यासाठी भारतियांना पुष्कळ संघर्ष करावा लागणे, हे भारताचे दुर्दैवच आहे. याच्या उलट घटना न्यूझीलंडमध्ये घडत आहे. तेथील शाळांमध्ये सर्वांना रामायण, भगवद़्गीता आणि भागवत यांच्या वाचनाचे धडे दिले जात आहेत. तेथील ऑकलंड आणि हॅमिल्टन या शहरांत ३ हिंदी भाषिक शाळाही चालू करण्यात आल्या आहेत. तेथे काही काळापूर्वी रामायण वाचणार्यांची संख्या ४० होती. ती वर्ष २०२२ पर्यंत २६० इतकी झाली आहे. हे पुष्कळ अचंबित करण्यासारखे आणि तितकेच अभिमानास्पदही आहे. तेथील शाळांमध्ये भारतीय संगीत अभ्यासक्रमाचाही समावेश करण्यात आला आहे. भारतातून तेथे गेलेले बसंत मधुर हे तेथील विद्यार्थ्यांना तबला आणि हार्मोनियम यांचे धडे देत आहेत. एकाच वर्गात ५ वर्षांच्या मुलांपासून ६३ वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ नागरिक हिंदी भाषा आणि संगीत शिकत आहेत. तेथील शाळांना हिंदी भाषा आणि संगीत यांच्या प्रसारासाठी अनुदानही दिले जाते. संस्कृती एका देशाची आणि जतन केली जात आहे दुसर्याच देशात, हे भारतासाठी लज्जास्पदच आहे.
भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचे प्रयत्न हवेत !
न्यूझीलंडमधील लोकांना भारतीय संस्कृतीचे मोल आहे; पण दुर्दैवाने भारतियांना ते नाही. भारतात तर रामायण, महाभारत, भगवद़्गीता यांना आज कोण विचारतो ? ही महाकाव्ये अडगळच झाली आहेत. ‘विदेशातील लोक येऊन आपल्याला भारतीय संस्कृती शिकवतील’, अशी वेळ भारतियांवर न येण्यासाठी वेळीच संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत. प्राचीन काळी विदेशांना विविध शास्त्रांची साधी तोंडओळखही नसतांना भारत त्या शास्त्रांमध्ये पारंगत होता. हीच भारताची महानता आहे आणि म्हणूनच भारताला ‘विश्वगुरु’ समजले जाते. हे महान असे पद संस्कृतीनेच भारताला बहाल केलेले आहे. त्याची दशा होऊ न देणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्यकर्तव्य आहे; पण तसे होत नसल्याने भ्रष्टाचार्यांचा किंवा बलात्कार्यांचा भारत म्हणून देश ओळखला जातो. ‘संस्कृतीचे माहेरघर’ ही प्रतिमाच आज लोप पावत चालली आहे. हे सर्व टाळण्यासाठी भारतियांनो, कृतीशील होऊन संस्कृतीचे पुनरुत्थान होण्यासाठी प्रयत्न करा ! (१.२.२०२३)
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
संपादकीय दृष्टिकोनन्यूझीलंडमधील लोकांना हिंदु संस्कृतीचे जे मोल कळते, ते भारतियांना न कळणे, हे हिंदूजनांना लज्जास्पद ! |