१. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत एक घायाळ कबूतर मरणासन्न अवस्थेत दिसणे
‘२८.६.२०२२ या दिवशी रात्री ८.१५ वाजता साधकांनी एक कबूतर रामनाथी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत, म्हणजे स्वागत कक्षातील पटलाजवळ येऊन पडल्याचे पाहिले. त्या वेळी ते मरणासन्न अवस्थेत होते. त्याला कोणत्यातरी प्राण्याने घायाळ केले होते.
२. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी हा जीव स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आश्रमात आला असल्याचे सांगणे
याविषयी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारले असता त्यांनी ‘मरणासन्न अवस्थेत कबूतर येऊन पडणे’, हे आध्यात्मिक त्रासाचे लक्षण नसून ‘हा जीव स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आश्रमात आला आहे’, असे सांगितले. सद़्गुरु गाडगीळकाका यांनी त्या कबूतराला एखाद्या झाडाजवळ सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सांगितले.
३. घायाळ कबूतराने भगवंताच्या दारात येऊन प्राण सोडणे
प्रत्यक्षात कबूतराला उचलायला गेल्यावर ‘त्याने प्राण सोडलेला आहे’, असे लक्षात आले. घायाळ झालेल्या कबूतरालाही ‘स्वतःचा प्राण भगवंताच्या दारात जावा’, असे वाटत असल्यामुळे तो जीव धडपडत भगवंताच्या दारात आला आणि त्याने प्राण सोडला.
४. अनेक लहानमोठ्या जिवांनी आश्रम परिसरात येऊन प्राण सोडणे आणि ते पशू-पक्ष्यांच्या योनीतून मुक्त होणे
पुष्कळ जणांच्या मनात ‘देवाच्या दारात प्राण जावा आणि साधनेत पुढची गती मिळावी’, अशी इच्छा असते. त्याप्रमाणे ‘काही जणांना तीर्थक्षेत्री, तर काही जणांना गुरुसेवेत असतांना मृत्यू येतो’, अशा काही गोष्टी आपण ऐकल्या आहेत. ‘कबूतराप्रमाणे अनेक लहानमोठे जीव आश्रम परिसरात किंवा आश्रमाच्या दारापाशी येेऊन प्राण सोडतात आणि पशू-पक्ष्यांच्या योनीतून मुक्त होतात’, हे वरील उदाहरणातून लक्षात आले. ‘सनातनच्या रामनाथी आश्रमात एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्राप्रमाणे पुष्कळ चैतन्य आहे’, हे पशू-पक्ष्यांनाही लक्षात येते.’