श्रद्धास्‍थानांवर आक्रमण केल्‍यास धर्मरक्षणासाठी ‘जशास तसे’ उत्तर देऊ !

योगी आदित्‍यनाथ यांची जामनेर येथील कुंभात चेतावणी !

जळगाव – सनातन धर्म हाच खरा मानवता धर्म आहे. सनातन धर्माच्‍या रक्षणासाठी हिंदु समाजाने एकवटले पाहिजे. गोद्री महाकुंभाच्‍या माध्‍यमातून गोर बंजारा, लबाना नायकडा आणि इतर पोटजाती यांचे एकत्रीकरण होईल. देशाच्‍या जडणघडणीत हिंदु समाजातील सर्वच लहान जाती-पोटजाती यांचा मोठा वाटा आहे. श्रद्धास्‍थानांवर आक्रमण केल्‍यास धर्मरक्षणासाठी ‘जशास तसे’ उत्तर देण्‍यात येईल, अशी चेतावणी उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी येथे दिली. जामनेर तालुक्‍यातील गोद्री येथे अखिल भारतीय हिंदु गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्‍या कुंभाचा समारोप ३० जानेवारी या दिवशी झाला. त्‍या वेळी ते बोलत होते.

योगी आदित्‍यनाथ म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देशाची अर्थव्‍यवस्‍था बळकट होत असून बळकट अर्थव्‍यवस्‍था असलेला भारत जगात पाचव्‍या क्रमांकावर आहे. येणार्‍या काळात भारत तिसर्‍या क्रमांकाकडे पोचेल. यात शंका नाही. योगगुरु बाबा रामदेव यांनी योगकलेची प्रात्‍यक्षिके करून दाखवली. ते म्‍हणाले की, तरुणांनी मद्याचा नाद सोडावा. प्रत्‍येकाने सकाळी उठून धावायला हवे. सकाळी मनाला  आनंद देतील, असे विविध खेळ खेळावेत. स्‍वास्‍थ्‍यासाठी प्रतिदिन योग-प्राणायाम करावे. याद्वारे शरिरावर नियंत्रण रहाते. प्रतिदिन सूर्यनमस्‍कार केल्‍याने शरिरात ऊर्जा निर्माण होते. या वेळी कुंभाच्‍या यशस्‍वी आयोजनासाठी अहोरात्र परिश्रम केल्‍याविषयी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचा धर्मपीठाच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला. कुंभ आयोजनासाठी ज्‍यांनी अथक प्रयत्न केले, अशा मान्‍यवरांचाही सत्‍कार करण्‍यात आला.