|
वर्धा, ३१ जानेवारी (वार्ता.) – येथील स्वावलंबी विद्यालयाच्या प्रांगणात ३ फेब्रुवारीला आरंभ होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील भव्यता ‘न भूतो न भविष्यति’ अशीच आहे. ७ सहस्र ५०० आसंद्यांची व्यवस्था असणार्या भव्य सभामंडपासमवेत आणखी ५ सभामंडप सिद्ध झाले आहेत. इतके सभामंडप असणारे हे पहिलेच साहित्य संमेलन आहे. ग्रंथ प्रकाशनासाठी स्वतंत्र सभामंडप आहे. संमेलनाचे तिन्ही दिवस ‘गझल कट्टा’ आयोजित केला आहे. त्यात २३८ गझलकार स्वत:च्या गझल प्रस्तूत करणार आहेत. ५०० कवी स्वत:च्या कविता प्रस्तूत करणार आहेत. सभामंडपासमवेत ३०० ग्रंथ दालने उभारण्यात आली आहेत. २६ एकरांचा परिसर ३ दिवस अक्षरश: गजबजणार आहे. एकूणच ‘भव्यता’ हे या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे.
२४ घंटे अविरत वैद्यकीय सेवा !
साहित्य संमेलनातील सारस्वतांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी विविध पाळ्यांमध्ये १०० आधुनिक वैद्यांची २४ घंटे स्वयंस्फूर्त सेवा लाभणार आहे. सेवाग्राम येथील कस्तुरबा, सावंगीचे आचार्य विनोबा भावे रुग्णालय आणि भारतीय वैद्यक संघटना येथील आधुनिक वैद्य ही सेवा देणार आहेत.
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ढगाळी वातावरणापासून सुरक्षा !वर्धा, ३१ जानेवारी (वार्ता.) – येथील मराठी साहित्य संमेलनाला राज्यातील ढगाळी वातावरणामुळे क्षती पोचू नये; म्हणून मंडप कंत्राटदार नितीन शिंदे यांनी वेधशाळेवर विश्वास ठेवून सुरक्षेचे काम चालू केले. मंडपावर ताडपत्री घालणे, मंडपाच्या सभोवती चर खोदणे असे सुरक्षेच्या दृष्टीने उपाय चालू केले आहेत. ‘संमेलनाची सिद्धता पूर्णत्वास जात असतांना त्रुटी राहू नयेत आणि संमेलन निर्विघ्नपणे पार पडावे, अशी प्रार्थना करत आहे’, असेही ते म्हणाले. |