लढाऊ विमानांचा अपघात भारतासाठी दुर्दैवी !

हवाई दलाचे अपघातग्रस्‍त ‘सुखोई-२०’ विमान

‘मध्‍यप्रदेशातील मुरैना येथे २८ जानेवारी या दिवशी सकाळी मोठी दुर्घटना घडली. भारतीय हवाई दलाचे ‘सुखोई-२०’ आणि ‘मिराज २०००’ या लढाऊ विमानांचा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच साहाय्‍य आणि बचाव पथक घटनास्‍थळी पोचले. या दोन्‍ही विमानांनी मध्‍यप्रदेशातील ग्‍वाल्‍हेर येथून उड्डाण केले होते. अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्‍यू झाला आहे.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

विमान अपघातांची संभाव्‍य कारणे

जेव्‍हा अशा विमानांचे अपघात होतात, तेव्‍हा त्‍यांची मुख्‍यत: ४ मोठी कारणे असू शकतात.

१. प्रतिकूल हवामान : धुके किंवा ढग असल्‍याने नीट दिसत नाही.

२. तांत्रिक अपयश : विमानाच्‍या इंजिनामध्‍ये तांत्रिक बिघाड होऊन ते बंद पडणे.

३. प्रासंगिक : गिधाडासारखा एखादा पक्षी उडत असतांना तो विमानाच्‍या मध्‍ये येणे.

४. वैमानिकाची चूक : विमान चालवतांना वैमानिकाची काहीतरी चूक होऊ शकते.

अशा प्रकारे अपघातांची विविध कारणे असू शकतात; पण या अपघाताला नेमके कारण काय होते ? हे वायूदलाची ‘कोर्ट ऑफ इन्‍क्‍वायरी’ (न्‍यायालयीन चौकशी) पूर्ण झाल्‍यावरच आपल्‍याला समजेल. विमानाचा ‘ब्‍लॅक बॉक्‍स’ (विमानामध्‍ये होत असलेल्‍या घडामोडी नोंदवणारे एक यंत्र) शोधला जाईल. त्‍यानंतर विमान नेमके कुठल्‍या उंचीवर उडत होते ? ते केव्‍हा खाली आले ? आणि केव्‍हा पडले ? याची सर्व माहिती त्‍या ‘ब्‍लॅक बॉक्‍स’मध्‍ये नोंद होते. त्‍यानंतर सर्व स्‍पष्‍ट होईल. एवढे मात्र निश्‍चित की, सुखोई हे अत्‍याधुनिक विमान समजले जाते. त्‍यामुळे या विमानाचा अपघात होणे, ही देशासाठी मोठी हानी आहे. या विमानाचे मूल्‍य ५०० ते ६०० कोटी एवढी असते. आपल्‍याला ठाऊक असेल की, भारताने पाकिस्‍तानच्‍या बालाकोटवर जो ‘सर्जिकल स्‍ट्राईक’ केला होता, त्‍यात ‘मिराज’ लढाऊ विमानांचा मोठा वाटा होता. भारतात त्‍याच्‍या १० स्‍क्‍वॉड्रन (तुकड्या) आहेत. यात आपल्‍याला वैमानिकही गमवावे लागतात. त्‍यामुळे अशा प्रकारचा अपघात होणे, ही देशासाठी दुर्दैवाची गोष्‍ट आहे. या दुर्घटनेचे अन्‍वेषण होऊन लवकरात लवकर अहवाल पुढे येईल, अशी मला खात्री आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.

संपादकीय भुमिका

शांततेच्‍या काळात लढाऊ विमानांचा अपघात होणे हे देशासाठी आर्थिकदृष्‍ट्या हानीकारक आणि लज्‍जास्‍पद !