मी आणि अन्य साधक केरळ राज्याच्या दौर्यावर असतांना केरळ कलामंडलम्, त्रिवेंद्रम्मधील पद्मनाभस्वामी मंदिर आणि आदिकेशव मंदिर येथे गेलो होतो. या तिन्ही ठिकाणी शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि जाणवलेल्या त्रुटी येथे देत आहोत.
१. कला आणि संस्कृती यांचे विद्यापीठ असलेले ‘केरळ कलामंडलम्’ !
१ अ. विविध पारंपारिक शास्त्रीय नृत्यप्रकार शिकवण्यासाठी वेगवेगळे विभाग असणे : ‘थ्रिसुर जिल्ह्यातील चेरुथुरुथी गावात ‘केरळ कलामंडलम्’ हे केरळमधील कला आणि संस्कृती यांचे विद्यापीठ आहे. येथे प्रत्येक नृत्यप्रकारासाठी वेगवेगळे विभाग आहेत आणि त्यांमध्ये ‘प्रत्येक दिवशी कोणते नृत्य करायचे ?’, याचे नियोजन चांगले आहे. आज या विद्यापिठामध्ये भारतीय कला आणि संस्कृती यांचे उत्तम रक्षण करून ती परंपरा पुढे चालू रहावी; म्हणून शेकडो विद्यार्थी अन् विद्यार्थिनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत. या विद्यापिठात कथकली, मोहिनीअट्टम्, कुडिअट्टम्, कुचीपुडी, भरतनाट्यम् आणि नांगिर कुथू यांसारखे भारतीय शास्त्रीय अन् पारंपरिक नृत्यप्रकार शिकवले जातात.
१ आ. शिक्षक येण्याआधी सर्व सिद्धता करून सराव करणारे आणि गुरु-शिष्य परंपरेचे पालन करणारे आदर्श विद्यार्थी ! : या विद्यापिठामध्ये साधारण ८ वर्षांचा नृत्यप्रकारांचा अभ्यासक्रम (कोर्स) आहे. तिथे साधारण १३ – १४ वर्षे वयोगटाची मुले शिक्षण घेत असून ती गुरु-शिष्य परंपरेला मानणारी आहेत. आम्ही सकाळी त्यांच्या नृत्याचा सराव पहाण्यासाठी गेल्यावर आम्हाला कळले, ‘सराव सकाळी ९ वाजता चालू होतो.’ आम्ही त्या ठिकाणी सकाळी ८ वाजता पोेचलो होतो. तेव्हा शिक्षिका येण्याअगोदर मुली नृत्याचा सराव करण्यासाठी सिद्ध झाल्या होत्या. ‘ज्या ठिकाणी त्यांचा सराव आहे, त्या ठिकाणची स्वच्छता, शिक्षकांना बसण्यासाठी आसंदी आणि ताल देण्यासाठी त्यांनी हातामध्ये घ्यायची काठी’, ही सर्व सिद्धता त्या विद्यार्थिनींनी केली होती. शिक्षिका आल्यानंतर सर्वांनी सराव करायला आरंभ केला. त्या मुलींच्या नृत्य करण्याच्या भावामुळे त्या ठिकाणचे वातावरण पुष्कळ आनंदी वाटले.
१ इ. विद्यापिठाचा परिसर नयनरम्य असणे, ही वास्तू शास्त्रीय पद्धतीने बांधलेली असल्यामुळे तेथे कला शिकण्यासाठी चांगले वातावरण असणे : या विद्यापिठामध्ये श्री. गोपकुमार हे प्राध्यापक आमच्या संपर्कात आले. त्यांनी ‘ही संस्था कला टिकवून ठेवण्याचे काम ते कशा प्रकारे करत आहेत ?’, याविषयीची माहिती आनंदाने सांगितली. या संस्थेमध्ये काही कार्यक्रम असेल, तर त्यासाठी एक सभागृह (हॉल) बांधले आहे. या सभागृहाची रचना पुष्कळ सुंदर केली आहे. प्रत्येक खांबावर वेगवेगळे नृत्यप्रकार दगडावर कोरले आहेत. काही ठिकाणी मूर्ती बनवून ठेवल्या आहेत. या सभागृहाचे वैशिष्ट्य होते की, तेथे उन्हाळ्यामध्येही उकडत नव्हते. आतमध्ये गारवा असायचा. याचे कारण म्हणजे ‘वास्तूकला’! ‘ही वास्तू शास्त्रीय पद्धतीने बांधली होती. त्यामुळे तिच्यामध्ये गारवा असायचा. संपूर्ण परिसर निसर्गरम्य आहे. या ठिकाणी कला शिकण्यासाठी पुष्कळ चांगले वातावरण आहे.
१ ई. ‘केरळ कलामंडलम्’ येथील लक्षात आलेल्या त्रुटी : या ठिकाणी आम्हाला काही त्रुटी लक्षात आल्या. नृत्यासाठीच्या सभागृहाची व्यवस्था आणि स्वच्छता वेळेवर होत नाही. तेथील छताला जळमटे आणि धूळ होती. पर्यटन क्षेत्राने यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राने ती पर्यटकांसाठी अधिकाधिक उपलब्ध करून दिली पाहिजे.
२. ‘केरळ राज्याला निसर्ग आणि मंदिरे यांची देवाने दिलेली देणगी’, हे केरळचे खरे वैभव !
या ठिकाणची सर्व मंदिरे पुष्कळ मोठमोठी आहेत आणि बरीच मंदिरे नदीकाठी आहेत. या ठिकाणच्या मंदिरांच्या छताची रचना बर्यापैकी एकसारखी आहे. ज्या ठिकाणी मूर्ती ठेवलेली असते, त्या मूर्तीच्या समोर एका रिकाम्या खोलीच्या आकाराची जागा सोडली जाते. असे प्रत्येक मंदिरामध्ये आहे. आम्ही केरळमध्ये पद्मनाभस्वामी मंदिर, आदिकेशव मंदिर, परशुराम मंदिर, त्रिप्रयार येथील राममंदिर, श्रीवडकुमनायन शिव मंदिर, आद्यशंकराचार्यांचे बालपणीचे ठिकाण, अशा वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनासाठी गेलो होतो.
२ अ. केरळ राज्यात देवदर्शनासाठी पारंपरिक वेशभूषा करणे आवश्यक असणे : या सर्व ठिकाणी देवाचे दर्शन घेण्यासाठी जायचे असेल, तर पुरुषांनी लुंगी किंवा धोतर आणि स्त्रियांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करणे आवश्यक असते. काही ठिकाणी पुरुषांना कमरेपासून वरचे कपडे काढून दर्शनासाठी जाण्यास सांगितले जाते.
२ आ. त्रिवेंद्रम्मधील पद्मनाभस्वामी मंदिर
२ आ १. पद्मनाभस्वामी मंदिरातील शेषशायी श्रीविष्णूची सुंदर मूर्ती ! : आम्ही त्रिवेंद्रम्मध्ये पद्मनाभस्वामी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो होतो. पहाटे ३.३० वाजता देवाच्या कृपेने आम्हाला पुष्कळ चांगले दर्शन झाले. त्या ठिकाणी श्रीविष्णूची मूर्ती शयनस्थितीत आहे. मूर्ती १६ फूट लांब असल्यामुळे ती ३ दरवाजांमधून पहावी लागते. मूर्ती पुष्कळ सुंदर आहे. ‘साक्षात् श्रीमन्नारायण त्या ठिकाणी बसून सर्व पहात आहेत’, असे वाटते.
२ आ २. येथे देवाचे दर्शन घेणार्यांना घाई केली जात नाही. आम्ही देवासमोर साधारण २० मिनिटे उभे होतो.
२ आ ३. पद्मनाभस्वामी मंदिरात आलेल्या अनुभूती
अ. देवाचे दर्शन घेतांना आम्हाला जाणवत होते, ‘देव आम्हाला गुरुकार्य आणखी वेगात होण्यासाठी शक्ती देत आहे आणि त्यासाठी देवाने आम्हाला एवढा वेळ थांबवून ठेवले.’
आ. त्या ठिकाणी पुरोहित देवाच्या मूर्तीला अभिषेक करत असतांना मला जाणवले, ‘परात्पर गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणांवर ते अभिषेक करत आहेत.’
– श्री. वाल्मिक भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०१९)
केरळ पर्यटन विभागाचे आदिकेशव मंदिराच्या व्यवस्थेच्या संदर्भात झालेले अक्षम्य दुर्लक्ष !‘पद्मनाभस्वामी मंदिरामध्ये पुष्कळ भक्तगण येतात. या मंदिराप्रमाणेे असलेले दुसरे मंदिर, म्हणजे पेरूमलम् येथील आदिकेशव मंदिर ! खरेतर हे स्थान मूळ असून येथे श्रीविष्णूची २२ फूट लांबीची मूर्ती आहे. या ठिकाणी येणार्या भक्तांची संख्या नगण्य आहे. पद्मनाभस्वामी मंदिरामध्ये सर्व सुविधा, सुरक्षाव्यवस्था आणि इतर साधनसामुग्री यांची रेलचेल आहे. तेथे ‘पूजा करण्यासाठी ३ पुरोहित, डमरू वाजवणारा एक जण आणि स्वच्छता करणार्या २ महिला’, असे एकूण ६ जण सेवा करतांना मला दिसले. ‘पर्यटन विभागाचे आदिकेशव मंदिराकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे’, असे मला वाटते; कारण या मंदिरांची व्यवस्था, स्वच्छता, पवित्रता (पावित्र्य) आणि सात्त्विकता मुळीच टिकवून ठेवलेली नाही. आदिकेशव मंदिरावर पक्षी बसतात. त्यांनी मंदिराच्या कळसाचा भाग अस्वच्छ केला आहे. त्या मंदिराच्या परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थित नाही. आपल्या पूर्वजांनी एवढे सुंदर नक्षीकाम करून आदिकेशव मंदिराचे बांधकाम केले आहे; परंतु कोरीव काम केलेले लाकडी आणि दगडी खांब मंदिराच्या एका बाजूला असेच पडले आहेत. खरेतर ते जतन करून ठेवणे अपेक्षित आहे. देवाच्या कृपेने पूर्वजांनी एवढी चांगली मंदिरे बांधली आहेत. ‘ती योग्य प्रकारे जतन करण्यात केरळ पर्यटन विभाग अयशस्वी झाला आहे’, असे मला वाटते. (केरळचे साम्यवादी सरकार हिंदु धर्मासाठी अतिशय संग्राह्य अशा अभिमानास्पद वास्तूंचे जतन करण्याऐवजी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आणि हे भारतात कुणाच्याही लक्षात येत नाही, हे सर्वांनाच लज्जास्पद आहे. – संपादक) ‘राज्याच्या पर्यटन विभागाने पद्मनाभस्वामी मंदिराचे महत्त्व वाढवून ठेवल्याने अशी स्थिती झाली आहे’, असे मला वाटते. त्यामुळे अधिक लोक त्या ठिकाणीच दर्शनाला जातात आणि धर्मदान करतात. असे झाल्याने एकाच ठिकाणी संपत्ती साठते. – श्री. वाल्मिक भुकन |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |