बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराज यांना नागपूर पोलिसांची ‘क्‍लिनचिट’ !

  • अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पाठवले उत्तर !

  • महाराजांच्‍या कार्यक्रमात अंधश्रद्धा मानता येईल, असे काहीही घडलेले नाही ! – पोलिसांचा निष्‍कर्ष

नागपूर – पंडित धीरेंद्र कृष्‍ण शास्‍त्री महाराज यांच्‍या दिव्‍य दरबारात ७ आणि ८ जानेवारी या दिवशी झालेल्‍या कार्यक्रमाचा ‘श्री रामचरित्र चर्चा’ या नावाचा व्‍हिडिओ पोलिसांकडून बारकाईने पडताळण्‍यात आला आहे. व्‍हिडिओ पाहिल्‍यानंतर त्‍या कार्यक्रमात अंधश्रद्धा मानता येईल, असे काहीही घडलेले नाही, असा निष्‍कर्ष पोलिसांनी काढला आहे. महाराजांनी केवळ त्‍यांच्‍या धर्माचा प्रचार केल्‍याचे पोलिसांना त्‍यांच्‍या अन्‍वेषणात आढळून आले आहे, असे सांगून येथील पोलीस आयुक्‍तांनी पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांना ‘क्‍लिनचिट’ दिली आहे.

पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराज यांच्‍या ‘प्रेत दरबार’ आणि ‘दिव्‍य दरबार’वर आक्षेप घेऊन अंधश्रद्धा पसरवला आहे, असा आरोप श्‍याम मानव यांनी केला होता. त्‍यांनी महाराजांच्‍या विरोधात पोलीस ठाण्‍यात तक्रारही प्रविष्‍ट केली होती. ‘दिव्‍यशक्‍ती’ आणि चमत्‍कार सिद्ध करून दाखवल्‍यास ३० लाख रुपयांचे पारितोषिक देण्‍याचे आव्‍हानही त्‍यांनी महाराजांना दिले होते; मात्र पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांनी आपल्‍या स्‍पष्‍टीकरणात हे आरोप निराधार असल्‍याचे सांगत स्‍वत:ला केवळ सनातन धर्माचा प्रचारक आणि ईश्‍वरभक्‍त असल्‍याचे सांगितले होते. या प्रकरणात शाम मानव यांनी धीरेंद्र शास्‍त्री यांच्‍यावर अंधश्रद्धा आणि जादूटोणा यांचे आरोप केले होते. पोलिसांनी व्‍हिडिओ काढून तो पडताळला आणि त्‍यात अंधश्रद्धेसारखे काहीही नसल्‍याचे सांगितले.