बॉलीवूडचे ‘बेशर्म’ रंग !

‘पठाण’ या हिंदी चित्रपटात ‘बेशर्म रंग’ या नावे एक गाणे चित्रित केले असून त्‍यात अनेक अश्‍लील हावभाव दाखवण्‍यात आले आहेत. त्‍यावर सामाजिक माध्‍यमांतून मोठ्या प्रमाणात विरोध करण्‍यात येत आहे. त्‍यावर ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

१. लोकांकडून हिंदी चित्रपटसृष्‍टीला आरसा दाखवण्‍याचा स्‍तुत्‍य प्रयत्न !

‘बेशर्म रंग…’ हे शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण अभिनित ‘पठाण’ या चित्रपटाचे केवळ एक गीत आहे, ज्‍यावरून मागील काही दिवसांमध्‍ये अनेक चर्चा झाल्‍या. तसे पाहिले, तर गेल्‍या काही वर्षांमध्‍ये बॉलीवूडचाही (हिंदी चित्रपटसृष्‍टीचाही) रंग ‘बेशर्म’ (निर्लज्‍ज) होत चालला आहे. एक वेळ होती की, त्‍यावेळी चित्रपटांना समाजाचा आरसा म्‍हटले जात होते. चित्रपट बनवणार्‍यांना समाजाच्‍या नाड्या ठाऊक होत्‍या. काल्‍पनिक असल्‍या, तरी त्‍यांच्‍या सशक्‍त अशा पटकथांवर लोक विश्‍वास ठेवत होते. त्‍यातून काही चांगल्‍या गोष्‍टी शिकत होते. आजच्‍या बहुतांश चित्रपटांकडे पाहिले, तर हे लोक जाणीवपूर्वक एका विशिष्‍ट अजेंड्याखाली भारतीय समाजाच्‍या भावनांना दुखावण्‍याचे कार्य करत आहेत, असे वाटते. त्‍यामुळे सध्‍या चित्रपट बनवणार्‍यांनाच आरसा दाखवण्‍याची वेळ आली आहे आणि हेच भारतीय समाज आता करत आहे. मग याने बॉलीवूडचा एक गट का तडफडत आहे ? अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या नावावर बॉलीवूडला वाटेल ते दाखवण्‍याचे स्‍वातंत्र्य कुणी दिले ? बॉलीवूडवाले हे कसे समजून बसले की, भारतीय प्रेक्षकांच्‍या भावना दुखावल्‍यानंतरही त्‍यांचे कौतुक होईल ? बॉलीवूड हे कसे विसरले की, प्रेक्षकांना जे आवडत नाही, त्‍याला ते खाली लोळवूही शकतात.

२. बॉलीवूडकडून भारतीय जनतेचा विश्‍वासघात !

आतापर्यंत असे होत आले; कारण मागील काही वर्षांमध्‍ये प्रेक्षकांनीही बॉलीवूडला त्‍यांच्‍या भावनांशी खेळण्‍याचे स्‍वातंत्र्य दिले होते. बॉलीवूड जे काही दाखवत होते, ते प्रेक्षक स्‍वीकारत होते. बॉलीवूडने विनोदाच्‍या नावावर हिंदूंच्‍या श्रद्धा दुखावल्‍या, तर प्रेक्षकांनी हसून दुर्लक्ष केले. बॉलीवूडने ‘रोमान्‍स’च्‍या नावावर अश्‍लीलता दाखवली, प्रेक्षकांनी डोळे मिटून घेतले. बॉलीवूडने विशिष्‍ट हेतूने मुसलमानांना स्‍वच्‍छ मनाचे, सर्वांना साहाय्‍य करणारे आणि एक अतिशय चांगली व्‍यक्‍ती म्‍हणून दाखवले, प्रेक्षकांनी कोणताही विचार न करता त्‍यावर विश्‍वास ठेवला, जेव्‍हा की वास्‍तविकता त्‍याच्‍या कोसो दूर होती. भारतीय प्रेक्षकांची सर्वांत मोठी चूक ही झाली की, ते केवळ काल्‍पनिक समजून मनोरंजनाच्‍या उद्देशाने चित्रपट पहात राहिले आणि बॉलीवूड मात्र त्‍यांच्‍यावर मानसशास्‍त्रीय प्रभाव टाकत राहिले. थोडे उशिरा का होईना, भारतीय समाज जागृत होत आहे. त्‍याला बॉलीवूडच्‍या एक विशिष्‍ट गटाचा ‘अजेंडा’ (कार्यसूची) लक्षात यायला लागला आहे. तो बॉलीवूडकडून दाखवण्‍यात येणार्‍या चुकीच्‍या गोष्‍टींना नाकारत आहे.

३. भारतात सांस्‍कृतिक राष्‍ट्रभावाचे पुन:र्जागरण झाल्‍याने लोकांच्‍या दृष्‍टीकोनात परिवर्तन !

याचे असेही एक कारण आहे की, भारतीय समाजाचा स्‍वत:च्‍या जीवनाशी संबंधित सर्व गोष्‍टींकडे पहाण्‍याचा दृष्‍टीकोन आता पालटत आहे; कारण की, बॉलीवूड हेही आपल्‍या जीवनाशी संबंधित आहे. अर्थात् त्‍याच्‍या संदर्भात लोकांचा दृष्‍टीकोन पालटणे स्‍वाभाविक आहे; पण मग संपूर्ण समाजाचा दृष्‍टीकोन कसा पालटला ? त्‍याच्‍या भावनांशी खेळले जात असल्‍याची जाणीव त्‍याला अचानक व्‍हायला लागली. आता त्‍याला अयोग्‍य गोष्‍टींचा प्रतिकार करण्‍याचे बळ मिळू लागले आहे. तसेच आता भारतात सांस्‍कृतिक राष्‍ट्रभावाचे पुन:र्जागरण झाले आहे.

लोकशाही व्‍यवस्‍थेत ‘यथा राजा तथा प्रजा’ ही म्‍हण उद़्‍धृत केली जाते. जनताच शासनकर्त्‍यांना निवडते आणि त्‍याच्‍या बदल्‍यात सुरक्षा आणि विकास यांची अपेक्षा ठेवते. आता  भारतीय समाज त्‍याची संस्‍कृती, श्रद्धास्‍थाने आणि मान्‍यता यांवर प्रहार झाल्‍याने प्रतिकार करत असेल, तर त्‍याला शासनकर्त्‍यांनी संरक्षण दिले पाहिजे. सध्‍या केंद्रात असे सरकार आहे, जे भारतीय समाजाचे प्रत्‍येक प्रकारचे संरक्षण करण्‍यासाठी कटीबद्ध आहे. भारतीय समाजालाही हा विश्‍वास आहे की, शासनकर्त्‍यांकडून त्‍याच्‍या भावना समजून घेतल्‍या जातील. त्‍याचेच एक जुळणारे रूप आपण पहात आहोत की, भारतीय समाज चुकीच्‍या गोष्‍टी नाकारण्‍याच्‍या स्‍थितीत आला आहे आणि तो प्रतिकारही करत आहेे.

४. लोकांनी बॉलीवूडचा बहिष्‍कार करतांना चोखंदळपणा दाखवणे आवश्‍यक !

दुसरी बाजू अशी आहे की, या जागृत सांस्‍कृतिक राष्‍ट्रभावाचा विरोध करणारेही मोर्चाबंदी करत आहेत. त्‍यांच्‍यासाठी बॉलीवूड हे एक सशक्‍त शस्‍त्र आहे, ज्‍याचे परीक्षण त्‍यांनी इतकी वर्षे केले आणि यशस्‍वीही झाले आहेत. त्‍यामुळे बॉलीवूडही दोन गटांत विभागलेला दिसत आहे. आता जनतेचे हे दायित्‍व आहे की, त्‍यांनी केवळ अंधानुकरण किंवा केवळ विरोधासाठी विरोध करू नये. ‘बॉयकॉट बॉलीवूड’ हा या समस्‍येवरील उपाय नाही.

जनतेला हे ओळखावे लागेल की, जो चित्रपट ते पहायला जात आहेत, त्‍याचे निर्माते-दिग्‍दर्शक, अभिनेते-अभिनेत्री कोणत्‍या विचारसरणीचे अनुसरण करतात, त्‍यांनी त्‍यांच्‍या पूर्वीच्‍या चित्रपटांत काय दर्शवले आहे ? आता चित्रपटांना केवळ मनोरंजनाचे माध्‍यम समजून चालणार नाही, तर त्‍यांच्‍या माध्‍यमातून समाजात ज्‍या चर्चा घडवण्‍यात येत आहेत, त्‍या समजणे आवश्‍यक आहे. तेव्‍हाच त्‍यांचा विरोध करणे शक्‍य होणार आहे.’