बाँबच्या धमकीमुळे मॉस्को येथून येणारे विमान उझबेकिस्तानकडे वळवले

दाबोळी प्रशासनाला पुन्हा मेल

पणजी, २१ जानेवारी (वार्ता.) – मॉस्को येथून गोव्याला येणारे अझूर एअरलाईन्सचे प्रवासी विमान बाँबने उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे हे प्रवासी विमान ऐनवेळी उझबेकिस्तानच्या दिशेने वळवावे लागले आहे. २३८ प्रवाशांना घेऊन हे विमान दाबोळी विमानतळावर उतरणार होते. मागील १२ दिवसांत दुसर्‍यांदा विमानात बाँब असल्याची माहिती देणारा मेल दाबोळी विमानतळ प्रशासनाला मिळताच धावपळ उडाली.

हे विमान दाबोळी विमानतळावर शनिवारी पहाटे ४.५५ वाजता उतरणार होते; परंतु त्यापूर्वीच मध्यरात्री १२.३० वाजता दाबोळी विमानतळ प्राधिकरणाला विमानात बाँब असल्याचा मेल आला. त्यामध्ये हे विमान बाँबने उडवून देण्यात येणार असल्याचे म्हटले होते. बाँब विमानात पेरण्यात आल्याचेही म्हटले होते. यानंतर दक्षतेचे उपाय म्हणून हे विमान इतरत्र वळवण्याची सूचना दाबोळी विमानतळावरून देण्यात आली. यापूर्वी १० जानेवारी या दिवशी मॉस्को-गोवा विमानाच्या संदर्भात अशी धमकी देण्यात आली होती. या वेळी हे विमान गुजरात येथील जामनगर विमानतळावर उतरवण्यात आले होते आणि बाँब नसल्याची निश्चिती झाल्यानंतर या विमानाने गोव्यासाठी उड्डाण केले होते.

गुप्तचर संस्था आणि आपत्कालीन व्यवस्थापन गट सक्रीय ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

 डॉ. प्रमोद सावंत

पणजी – विमान बाँबने उडवून देण्याच्या धमकी प्रकरणी चौकशीसाठी गुप्तचर संस्था आणि आपत्कालीन व्यवस्थापन गट सक्रीय झाला आहे. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने अशा स्वरूपाच्या अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.