मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील हिंदु महाविद्यालयात गणवेशऐवजी बुरखा घालून येणार्‍या विद्यार्थिंनीना प्रवेश नाकारल्याने तणाव !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील हिंदु महाविद्यालयात काही विद्यार्थिनी गणवेशाऐवजी बुरखा घालून आल्याने त्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना प्रवेशद्वाराबाहेरच बुरखा काढून नंतर आत जाऊ देण्यात आले. या वेळी काही विद्यार्थिनींनी त्यांच्या वर्गापर्यंत बुरखा घालून जाऊ देण्याची मागणी केली; मात्र ती नाकारण्यात आली. या घटनेची माहिती समाजवादी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेला मिळाल्यावर तिचे कार्यकर्ते येथे पोचले. तेव्हा त्यांच्यात आणि महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्यात हाणामारी झाल्याचेही वृत्त आहे. १ जानेवारीपासून या महाविद्यालयाने गणवेश घालणे अनिवार्य केले आहे. यावर समाजवादी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेने बुरख्याला यात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. ए.पी. सिंह यांनी सांगितले की, महाविद्यालयाचा गणवेश निर्धारित करण्यात आला आहे. याचे कुणी पालन करत नसेल, तर त्याला महाविद्यालय परिसरात प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

गणेवश घालून येण्याचा नियम असतांना त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली, तरच ते ठिकाणावर येतील !